मराठी बातम्या /बातम्या /देश /'‘मोदी’ आडनावावरून केलेल्या टिप्पणीवर माफी मागण्याचा प्रश्नच नाही', राहुल गांधींची कोर्टात भूमिका

'‘मोदी’ आडनावावरून केलेल्या टिप्पणीवर माफी मागण्याचा प्रश्नच नाही', राहुल गांधींची कोर्टात भूमिका

2019 च्या लोकसभा निवडणूक प्रचारात राहुल गांधी यांनी मोदी या आडनावावरून एक टिप्पणी केली होती. सुरतच्या न्यायालयात याबाबत सुरु असलेल्या सुनावणीवेळी माफी मागायला राहुल गांधींनी नकार दिला.

सुरत, 24 जून : जेव्हा 2019 च्या लोकसभा निवडणुकांचा (2019 Lok Sabha Elections) प्रचार सुरू होता, तेव्हा काँग्रेस नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनी मोदी (Modi) या आडनावावरून एक टिप्पणी केली होती. त्याला आक्षेप घेत सूरतच्या न्यायालयात (Surat Court) मानहानीचा खटला (Defamation case) दाखल करण्यात आला होता. त्यावर आज झालेल्या सुनावणीत (Hearing) राहुल गांधी हजर राहिले. माफी मागण्याचा प्रश्नच नसल्याचं सांगत हे प्रकरण आपल्याला नीट आठवतही नसल्याचा दावा राहुल गांधींनी केला.

प्रचार करत असताना शाब्दिक विनोद करण्याचा आपला प्रयत्न होता, असं राहुल गांधींनी म्हटलंय. कुठल्याही जातीवर किंवा समुदायावर टीका करण्याचा आपला उद्देश नव्हता, तर पंतप्रधान मोदींच्या कारभारावर राजकीय टीका करण्याच्या उद्देशानेच आपण बोलत असल्याचं राहुल गांधींनी म्हटलं आहे. राहुल गांधींनी माफी मागण्याचा प्रश्नच येत नाही, असं त्यांच्या वकिलांनी न्यायालयाला सांगितलं. या प्रकरणी आता पुढील सुनावणी 11 जुलैला होणार आहे.

काय होते प्रकरण?

2019 च्या लोकसभा निवडणूक प्रचारात मोदी आडनावावरून टिप्पणी केल्याप्रकरणी गुजरातमधील भाजप आमदार पूर्णेश मोदी यांनी राहुल गांधींविरुद्ध न्यायालयात धाव घेतली होती. भारतीय दंडविधानाच्या कलम 499 आणि 500 नुसार त्यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता. या प्रकरणी राहुल गांधींनी स्वतः हजर राहून स्पष्टीकरण देण्याचे आदेश गेल्या आठवड्यात न्यायालयाने दिले होते.

हे वाचा - 5G फोन, पाउण लाख जॉब्ज... Reliance च्या AGM मध्ये झाल्या 10 मोठ्या घोषणा

कर्नाटकमधील सभेत केली होती टिप्पणी

लोकसभा निवडणूक प्रचारादरम्यान 13 एप्रिल 2019 या दिवशी कर्नाटकमधील कोलारमध्ये राहुल गांधींची सभा आयोजित करण्यात आली होती. ‘सभी चोरों का उपनाम एक ही मोदी कैसे हो सकता है?’ असा सवाल उपस्थित करत राहुल गांधींनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि फरार हिरे व्यापारी नीरव मोदी यांच्या आडनावांचा वापर करत टीका केली होती. त्याला आक्षेप घेत राहुल गांधींविरुद्ध मानहानीचा दावा ठोकण्यात आला होता. आता या प्रकरणी पुढील सुनावणीत काय होतं आणि न्यायालय याबाबत काय अंतिम निर्णय देतं, याबाबत सर्वांनाच उत्सुकता आहे.

First published:

Tags: Election 2019, Pm modi, Rahul gandh