चंदिगढ, 22 नोव्हेंबर : पंजाबच्या (Punjab) पठाणकोट (Pathankot) येथून एक वाईट बातमी समोर आली आहे. पठाणकोट येथे भारतीय सैन्याच्या कॅम्पजवळ (Indian Army camp) सोमवारी रात्री ग्रेनेड हल्ला (Grenade blast) झाल्याची माहिती समोर आली आहे. पण सुदैवाने या हल्ल्यात कोणत्याही प्रकारची जीवितहानी झालेली नाही. या हल्ल्यामुळे भारतीय सैन्य आणि पंजाब पोलीस (Punjab Police) अलर्ट (Alert) झाले आहेत. तसेच या हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर पठाणकोट एअरफोर्स स्टेशन आणि सैन्यदलाच्या इतर छावण्या असलेल्या परिसरात अधिकचा फौजफाटा तैनात करण्यात आला आहे.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, पठाणकोटमध्ये धीरा पुलाजवळ सैन्यदलाच्या एका छावणीजवळ असलेल्या त्रिवेणी द्वार गेटवर सोमवारी रात्री ग्रेनड हल्ला झाला. अज्ञात आरोपी हे दुचाकीवरुन आले होते. त्यांनीच हा ग्रेनेड हल्ला केल्याचा प्राथमिक अंदाज बांधला जातोय. पण याबाबत अद्याप खात्रीशीर माहिती समोर आलेली नाही. पंजाब पोलीस या प्रकरणाचा तपास युद्ध पातळीवर करत आहेत. पंजाब पोलीस संबंधित परिसरातील तसेच आजूबाजूच्या परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासत आहेत. तसेच घटनेनंतर लगेच पंजाबच्या सर्व पोलीस ठाण्यांमध्ये हायअलर्टचा मेसेज जारी करण्यात आला आहे.
हेही वाचा : महाविकास आघाडीच्या नेत्यांवर शेकडो कोटींच्या आरोपांनंतर सोमय्या आता दिल्लीत
पोलिसांना घटनास्थळी ग्रेनेडचे काही तुकडे सापडले आहेत. घटनास्थळी तपासासाठी दाखल झालेले पठाणकोटचे एसएसपी सुरेंद्र लांबा यांनी माध्यमांना प्रतिक्रिया दिली. "आम्ही जेव्हा इथे पोहोचलो तेव्हा प्राथमिक दृष्ट्या इथे ग्रेनेड हल्ला झाल्याचं निदर्शनास आलं. याबाबत सध्या तपास सुरु आहे. घटनेच्या वेळी या भागातून एक दुचाकी गेलीय. आम्ही सीसीटीव्हीच्या आधारे देखील तपास करत आहोत. तपासादरम्यान आम्हाला सीसीटीव्हीत चांगले पुरावे मिळतील अशी आशा आहे", अशी प्रतिक्रिया पोलीस अधिकारी सुरेंद्र लांबा यांनी दिली.
Punjab | A grenade blast took place near Triveni Gate of an Army camp in Pathankot. Further investigation is underway. CCTVs footage will be probed: SSP Pathankot, Surendra Lamba pic.twitter.com/NsVSQxz0eF
— ANI (@ANI) November 22, 2021
विशेष म्हणजे याआधी सहा वर्षांपूर्वी 2 जानेवारी 2016 रोजी पठाणकोटच्या वायूसेना बेसवर अतिरेकी हल्ला झाला होता. या हल्ल्यात एअरफोर्सच्या एका कमांडोसह 6 जवान शहीद झाले होते. या हल्ल्यानंतर झालेल्या ऑपरेशनमध्ये भारतीय जवानांनी 5 हल्लेखोरांना कंठस्नान घातलं होतं. विशेष म्हणजे सर्वच आरोपींनी भारतीय सैन्याचा पोशाख परिधान केला होता. त्याच पोशाखात ते एअरफोर्स स्टेशनमध्ये घुसले होते.
पठाणकोटची 2016 ची जखम ताजी असताना याच वर्षी जून महिन्यात जम्मू विमानतळाच्या एअरफोर्स स्टेशन क्षेत्रात दोन ड्रोन हल्ले झाले होते. त्यात दोन जवान जखमी झाले होते. संबंधित घटना ही अतिरेकी हल्ला असल्याचं जम्मू-काश्मीरचे डिजीपी दिलबाग सिंह यांनी म्हटलं होतं.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Punjab