मो. महमूद आलम, प्रतिनिधी नालंदा, 12 जुलै : अनेकदा भोपळ्याचं नाव ऐकताच लोक नाक-तोंड मुरडायला लागतात. मात्र भोपळा ही अतिशय पौष्टिक भाजी आहे. साधारणतः भोपळा वेलीवर येतो, परंतु बिहारच्या नालंदामध्ये मात्र झाडाला भोपळा आल्याचं पाहून लोकांनी आश्चर्य व्यक्त केलं आहे. अनेकजण याला ‘परदेशी भोपळा’सुद्धा म्हणत आहेत. त्याला कारणही तसंच आहे. सेंट लुसिया या देशाचं हे राष्ट्रीय झाड आहे. महत्त्वाचं म्हणजे या झाडाला वर्षभर भोपळा येतो. त्यामुळे सध्या लोक अतिशय कुतूहलाने या झाडाकडे पाहत असतात. 20 वर्षांपूर्वी रोपवाटिकेच्या सजावटीसाठी या झाडाची लागवड करण्यात आली होती. मात्र आता त्यावरील भोपळे विकत घेण्यासाठी रांगा लागतात. ‘खरंतर हा भोपळा थोडाफार नेहमीच्या भोपळ्यासारखा दिसत असला, तरी दोन्हींच्या चवींमध्ये भिन्नता आढळते’, असं तेथील लोकांनी सांगितलं आहे.
मंडळकाराजवळील भावना रोपवाटिकेत असलेल्या या झाडाची उंची 20 ते 30 फूट इतकी आहे. भोपळ्याच्या अशा झाडाला ‘कलाबस’ म्हटलं जातं, असं शेतकरी सुरेंद्र राम यांनी सांगितलं. प्रामुख्याने अमेरिका आणि त्याच्या शेजारील देशांमध्ये हे झाड पाहायला मिळतं. म्हणूनच भारतात ते पाहून लोकांना फार आश्चर्य वाटतंय.
परदेशात हे फळ अत्यंत आवडीने खाल्लं जातं. यात लोह भरपूर प्रमाणात असल्याने महिलांसाठी ते उपयुक्त मानलं जातं. रक्ताची कमतरता भरून काढण्यासाठीही हे फळ फायदेशीर ठरतं. कुपोषित बालकांसाठीदेखील त्याचा फायदा होतो. त्याचबरोबर या फळामुळे शरीरास थंडावा मिळतो, असंही म्हटलं जातं.