गाझियाबाद, 24 मार्च: भारताचे मिसाईल मॅन (Missile Man of India) म्हणून ओळखले जाणारे माजी राष्ट्रपती भारतरत्न दिवंगत डॉ. एपीजे अब्दुल कलाम (Dr. APJ Abdul Kalam) यांच्याबद्दल भारतातील प्रत्येक व्यक्तीच्या मनात आदर आहे. त्यांचे भारताच्या विज्ञान क्षेत्रातील योगदान अमूल्य आहे. अत्यंत निगर्वी, निस्पृह व्यक्तिमत्त्व अशी ओळख असणाऱ्या डॉ. एपीजे कलाम यांच्यावर 'जिहादी' असल्याचा आरोप एका मंदिराच्या पुजाऱ्यानं (Priest) केला आहे. त्यामुळं सर्वत्र खळबळ माजली असून, या वादग्रस्त विधानाचे पडसाद सर्वत्र उमटायला सुरुवात झाली आहे.
नुकतीच गाझियाबादमधील (Ghaziabad) दासना देवीच्या ज्या मंदिरात पिण्याचे पाणी मागणाऱ्या एका मुस्लीम मुलाला मारहाण केल्याची घटना घडली, त्या मंदिराचे पुजारी नरसिंहनाद सरस्वती (Narsihanand Saraswati) यांनीच हे वादग्रस्त विधान केलं आहे. त्यांनी अलिगढमध्ये (Aligarh) माध्यमांशी बोलताना, माजी राष्ट्रपती डॉ. एपीजे अब्दुल कलाम यांच्या धर्माचा उल्लेख करत, देशातील केंद्रस्थानी असलेल्या परिवारांमधील कोणताही मुसलमान भारताचा समर्थक असू शकत नाही आणि डॉ. कलाम हेदेखील जिहादीच होते, असा बेछूट आरोप केला.
एवढेच नव्हे तर डीआरडीओचे (DRDO) प्रमुख म्हणून काम करत असताना डॉ. एपीजे अब्दुल कलाम यांनी पाकिस्तानला (Pakistan) अणुबॉम्ब (Atom Bomb) बनविण्याचा फॉर्म्युला दिल्याचा बेछूट आणि बिनबुडाचा आरोपदेखील या पुजारी महाशयांनी केला आहे. डॉ. कलाम यांनी राष्ट्रपती भवनात कोणतीही मुस्लीम व्यक्ती आपली तक्रार दाखल करू शकेल यासाठी एक खास विभाग निर्माण केला होता, असा दावाही या पुजाऱ्यानं केला आहे.
(हे वाचा-CCTV VIDEO: बॅडमिंटन खेळताना आला हृदयविकाराचा झटका, पोलिसाचा जागीच मृत्यू)
दरम्यान, या मंदिरात पाणी पिण्यासाठी गेलेल्या मुस्लीम तरुणाला मारहाण करणाऱ्या व्यक्तीचं नाव शिरांगी नंद यादव असल्याचं पोलीस चौकशीत निष्पन्न झालं आहे. पोलिसांनी त्याला अटक केली आहे. असिफ नावाचा मुलगा पाणी मागण्यासाठी मंदिरात गेला असताना यादव यानं त्याला नाव विचारलं आणि तो मुसलमान आहे असं लक्षात आल्यावर त्याला अमानुषपणे मारहाण केली. याचा व्हिडीओही सगळीकडे व्हायरल झाला आहे. ही घटना ताजी असतानाच त्याच मंदिराच्या पुजाऱ्यानं देशाच्या माजी राष्ट्रपतींविरुद्ध बेछूट आरोप केल्यानं या प्रकरणाला वेगळं वळण लागण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
(हे वाचा-CCTV VIDEO: बॅडमिंटन खेळताना आला हृदयविकाराचा झटका, पोलिसाचा जागीच मृत्यू)
भारताला अणुऊर्जा (Atomic Energy) क्षेत्रातील ताकदवान देश बनवण्याचे सगळे श्रेय डॉ. एपीजे अब्दुल कलाम यांना जाते. देशाचे अकरावे राष्ट्रपती (President) असलेल्या डॉ. कलाम यांचा कार्यकाळ सर्वात सफल कार्यकाळ मानला जातो. मिसाईल मॅन अशी ओळख असणाऱ्या डॉ. एपीजे अब्दुल कलाम यांचं निधन 27 जुलै 2015 रोजी शिलॉंगमध्ये विद्यार्थ्यांना व्याख्यान देत असताना हृदयविकाराचा झटका आल्यानं झालं. परदेशांत अनेक संधी उपलब्ध असतानाही केवळ मातृभूमीवरील प्रेमापोटी आणि भारतातील संशोधनाचा विकास करण्यासाठी कलाम भारतात थांबले होते. अशा महान व्यक्तीवर त्यांच्या मृत्युनंतर असे आरोप करणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याची मागणी समाजाच्या सर्वच स्तरांतून होत आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Aligarh, Apj abdul kalam, India, President, Space