नवी दिल्ली, 29 मे : आज पंतप्रधान नरेंद्र मोदी
(PM Narendra Modi) यांनी आपल्या 'मन की बात'
(PM Modi Man ki Baat) या कार्यक्रमाच्या माध्यमातून देशाला संबोधित केले. 'मन की बात' या त्यांच्या कार्यक्रमाचा आज 89वा भाग होता. यावेळी त्यांनी योग दिन, सेल्प हेल्प ग्रुप आणि चार धामच्या यात्रेसह महाराष्ट्रातील आगामी पंढरपुरच्या वारीवरही भाष्य केले.
सध्या देशात चारधामची यात्रा सुरू -
सध्या आपल्या देशातील उत्तराखंडमध्ये चार धामची यात्रा सुरू आहे. चारधाममध्ये विशेषत: केदारनाथ येथे प्रत्येक दिवशी हजारोंच्या संख्येने भाविक दर्शन घेत आहेत. लोक आपल्या चारधाम यात्रेचे सुखद अनुभव शेअर करत आहेत. मात्र, काही जणांकडून करण्यात आलेल्या अस्वच्छतेमुळे काही भाविकांना वाईटही वाटल्याचे मी पाहिले. याबाबत सोशल मीडियावर अनेक जणांनी आपले मत मांडले. आपण पवित्र यात्रेच्या ठिकाणी जावे आणि तिथे अस्वच्छता असावी, हे योग्य नाही. मात्र, या तक्रारींदरम्यान, काही चांगल्या गोष्टीही समोर येत आहेत, असेही त्यांनी यावेळी सांगितले.
हेही वाचा - भारताच्या 6 क्षेपणास्त्रांची देशात आणि जगात चर्चा, जी क्षणात करू शकतात शत्रूला उद्ध्वस्त
पंढरपुरच्या वारीबाबत काय म्हणाले पंतप्रधान नरेंद्र मोदी?
पुढे ते म्हणाले की, जिथे श्रद्धा आहे, तिथे सकारात्मकता देखील आहे. काही भाविक बाबा केदारनाथच्या दर्शनाबरोबरच तिथे स्वच्छता देखील करत आहेत. स्वच्छ भारत मिशनच्या टीमसोबत अनेक संस्था याठिकाणी काम करत आहेत. आपल्या इथे तीर्थयात्रेसोबत तीर्थसेवेचेही महत्त्व सांगितले गेले आहे. आगामी काळात अनेक यात्रा आहेत. चारधाम यात्रेसोबत आगामी काळात अमरनाथ यात्रा, पंढरपूर वारी, जगन्नाथ यात्रा, अशा अनेक यात्रा होतील. श्रावणात तर प्रत्येक गावात यात्रा असते. त्यामुळे या तीर्थक्षेत्रात जात असताना, येथील पावित्र्यता जपली गेली पाहिजे. याठिकाणी स्वच्छता कायम स्वरुपी ठेवावी, यासाठी प्रयत्न करावे, असे आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशवासियांना केले.
2 वर्षांनंतर नेहमीसारखी होणार आषाढीवारी -
Coronavirus च्या दहशतीमुळे असलेले निर्बंध शिथिल झाले असल्याने यंदाच्या आषाढी वारीचा मार्ग मोकळा झाला आहे. यंदा पंढरपूरची वारी निर्धोक वातावरणात भक्तांच्या मेळाव्यात व्हावी, असं चित्र आहे. पांडुरंगाच्या दर्शनासाठी लाखो भक्तांना ओढ लागलेली असते. दोन वर्षं इच्छा असूनही अनेकांना वारीत सहभागी होता आलं नाही. पायी चालत वारी झालीच नाही. यंदा मात्र प्रथेप्रमाणे पायी वारी आणि सर्व संतांच्या पालख्या पारंपरिक पद्धतीने विठ्ठलनामाच्या गजरात निघू शकणार आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.