केवडिया, 20 ऑक्टोबर : पंतप्रधान नरेंद्र मोदी दोन दिवसीय गुजरात दौऱ्यावर आहेत. पंतप्रधान मोदींनी आज गुजरातमधील केवडिया येथील स्टॅच्यू ऑफ युनिटी संकुलात संयुक्त राष्ट्राचे सरचिटणीस अँटोनियो गुटेरेस यांच्यासमवेत 'मिशन लाइफ' (पर्यावरणासाठी जीवनशैली) लाँच केले. यादरम्यान, पीएम मोदींनी आपल्या भाषणात लोकांना निसर्गाप्रती जबाबदारी समजून घेण्याचे आवाहन केले आणि मिशन लाइफ आपल्याला पर्यावरणाचे रक्षण करण्यासाठी प्रेरित करते, असेही सांगितले.
काय म्हणाले पंतप्रधान नरेंद्र मोदी -
"हवामानातील बदल हे धोरण ठरवण्यापलीकडे आहे" यावर भर देत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बुधवारी स्पष्ट केले की, “आपल्यापैकी काहीजण 16 किंवा 18 अंशांवर एसी चालू ठेवण्यास प्राधान्य देतात आणि नंतर ब्लँकेट देखील वापरतात. प्रत्येक घसरत्या तापमानासह, ऊर्जेचा वापर वाढतो. आपण एअर कंडिशनर अशा तापमानात ठेवण्याचा प्रयत्न केला पाहिजे ज्यामुळे आपल्याला ब्लँकेटशिवाय आनंददायी वाटेल.
हेही वाचा - पंतप्रधान राष्ट्रीय बाल पुरस्कार : 1 लाख रुपयांचं बक्षीस, कोण आणि कसं करू शकतं अप्लाय? जाणून घ्या
तसेच आपल्यापैकी काहींना जिममध्ये कसरत करायला आवडते पण त्या वर्कआउटसाठी आपण गाडी चालवून व्यायामशाळेत किंवा जिममध्ये जातो. आपण फक्त पायी का चालत नाही किंवा सायकल का वापरू शकत नाही?", असा सवालही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केला आहे. कारने जिमला जाण्यापेक्षा पायी जाणे चांगले. यामुळे आरोग्य तर सुधारेलच, पण इंधन आणि उर्जेची बचत होईल, असेही ते म्हणाले.
पंतप्रधान मोदी म्हणाले की, आज आपल्या हिमनद्या वितळत आहेत, समुद्राची पातळी वाढत आहे, नद्या कोरड्या पडत आहेत, हवामान अनिश्चित होत आहे. हे बदल लोकांना असा विचार करण्यास भाग पाडत आहेत की हवामानातील बदल केवळ धोरणावर सोडले जाऊ शकत नाहीत. या पृथ्वीवर आपली जबाबदारी आहे, अशी भावना लोकांना होत आहे. या मिशनचे उद्दिष्ट तीन-पक्षीय धोरण राबवून हवामान बदलाच्या परिणामांशी लढा देण्याचे आहे, असेही त्यांनी सांगितले.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Gujrat, Narendra modi, PM narendra modi