नवी दिल्ली, 20 ऑक्टोबर : आपल्या देशात विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कामगिरी केलेल्या व्यक्तींना केंद्र सरकारच्या वतीने नागरी सन्मान देऊन गौरवण्यात येतं. या शिवाय, लहान मुलांनाही केंद्र सरकारच्या वतीने पुरस्कार दिले जातात. दरवर्षी प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला या पुरस्कारांचं वितरण होतं. केंद्र सरकारकडून दरवर्षी सहा श्रेणींमध्ये विशेष कर्तृत्व, धाडस आणि उत्तुंग यश संपादन केल्याबद्दल मुलांना पुरस्कार दिला जातो. 1996 साली पंतप्रधान राष्ट्रीय बाल पुरस्कारांची सुरुवात झाली होती. 2018 मध्ये राष्ट्रीय बाल पुरस्काराचं नाव बदलण्यात आलं. पुरस्काराचं नाव बदलून ‘बाल शक्ती पुरस्कार’ असं ठेवण्यात आलं आहे. नाव बदलण्यासोबतच धाडसी कामगिरी करणाऱ्या मुलांना पुरस्कार देण्याची भरही त्यात घालण्यात आली. देशभरात अनेक मुलं आपला जीव धोक्यात घालून धाडसाने इतरांचे प्राण वाचवतात. त्यांचा उचित गौरव व्हावा म्हणून हा आयाम या पुरस्कारांमध्ये जोडण्यात आला आहे. ज्या मुलांना हा पुरस्कार दिला जातो त्यांना पदकाव्यतिरिक्त रोख रक्कम दिली जाते. पंतप्रधान राष्ट्रीय बाल पुरस्कार कसा मिळवावा आणि त्यासाठी कसा अर्ज करावा, याबाबत आपण जाणून घेऊया. पंतप्रधान राष्ट्रीय बाल पुरस्कार कोणत्या मुलांना मिळतो? पंतप्रधान राष्ट्रीय बाल पुरस्कारासाठी मुलांची निवड ‘महिला आणि बाल कल्याण मंत्रालया’कडून केली जाते. यासाठी मंत्रालयाकडून मार्गदर्शक सूचनाही जारी करण्यात आल्या आहेत. मार्गदर्शक तत्त्वांनुसार, भारताचे नागरिक असलेल्या मुलांना हा पुरस्कार मिळू शकतो. मुलाचे वय पाच वर्षांपेक्षा जास्त आणि 18 वर्षांपेक्षा कमी असावं. सहा श्रेणींमध्ये हा पुरस्कार दिला जातो. पंतप्रधान राष्ट्रीय बाल पुरस्कारासाठी अर्ज कसा करावा? पंतप्रधान राष्ट्रीय बाल पुरस्कारासाठी इच्छुक उमेदवार ‘नॅशनल अवॉर्ड पोर्टल’चा वापर करू शकतात. पोर्टलवर नोंदणी करून अर्ज भरू शकतात. पुरस्कारांसाठी ऑफलाइन अर्ज करण्याचीही सुविधा उपलब्ध आहे. त्यासाठी जिल्ह्याच्या बाल कल्याण परिषदेमध्ये जावं लागेल. तेथील अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार नावनोंदणी प्रक्रिया पूर्ण करावी लागेल. संशोधन, सोशल वर्क, शिक्षण, क्रीडा, कला आणि संस्कृती, शौर्य अशा श्रेणींमध्ये उल्लेखनीय कामगिरी केलेल्या मुलांची निवड पंतप्रधान राष्ट्रीय बाल पुरस्कारासाठी केली जाते. देशातील सर्व राज्यं आणि केंद्रशासित प्रदेशांतील मुलं या पुरस्कारासाठी अर्ज करू शकतात. पंतप्रधान राष्ट्रीय बाल पुरस्कार विजेत्यांना एक लाख रुपयांचं रोख बक्षीस दिलं जातं. या शिवाय एक डिजिटल प्रमाणपत्र व पदक दिलं जातं. दरवर्षी 26 जानेवारीला प्रजासत्ताकदिनी नवी दिल्लीतील राजपथावर होणाऱ्या संचलनामध्येसुद्धा ही मुलं सहभागी होतात.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.