नवी दिल्ली, 20 ऑक्टोबर : सणासुदीच्या या दिवसांमध्ये बाजारातसुद्धा अनेक दिवसांनी उत्साह दिसत आहे. पण विसरू नका, लॉकडाऊन संपला असला तरी व्हायरस गेलेला नाही, अशा शब्दांत पंतप्रधान नरेंद्र मोदींनी (PM Narendra Modi speech) देशवासीयांना सावध केलं. प्रत्येक भारतीयाच्या प्रयत्नामुळे कित्येक महिन्यानंतर भारतात साथ आटोक्यात येत आहे. ही परिस्थिती बिघडू द्यायची नाही. मृत्यूदर कमी आहे, बरं होण्याचं प्रमाण जास्त आहे. साडेपाच हजार लोकांना Coronavirus ची लागण झाली आहे. हे प्रमाण इतर देशांच्या मानाने कमी आहे. पण ही वेळ सावध राहायची आहे, असं पंतप्रधान म्हणाले. लस येईपर्यंत लढा सुरूच राहणार जोपर्यंत या विषाणूवर लस येत नाही, तोवर आपला लढा बंद करून चालणार नाही, असं पंतप्रधानांनी सांगितलं. अनेक देश लशीसाठी प्रयत्न करत आहेत. आपल्या देशातले वैज्ञानिकही जीवाची बाजी लावून युद्ध पातळीवर संशोधन करत आहेत. Corona vaccine जेव्हा येईल, तेव्हा ती लवकरात लवकर प्रत्येत भारतीयापर्यंत कशी पोहोचेल यासाठीसुद्धा सरकार प्रयत्न करत आहे, असं मोदी म्हणाले. हात जोडून प्रार्थना हात जोडून प्रार्थना करतो, तुम्ही आणि तुमचा परिवार सुरक्षित बघू इच्छितो. सणासुदीचं उत्साहाचं वातावरण कायम ठेवा, पण निष्काळजीपणा नको. मोदींनी केलं सावध ‘व्हायरस वाढू नये यासाठी खबरदारी घ्यावी लागेल. बेफिकीर होण्याची ही वेळ नाही. कोरोना गेला असं समूज नका. कोरोनाचा धोका अजूनही कायम आहे. काही देशांमध्ये Covid-19 ची प्रकरणं कमी झालेली दिसली आणि नंतर पुन्हा वाढली, अशी उदाहरणं आहेत. त्यामुळे ही वेळ निष्काळजीपणाची नाही. बेजबादार लोक स्वतःबरोबर कुटुंबालाही धोक्यात टाकतात’, असं मोदी म्हणाले. त्यामुळे दो गज की दूरी, मास्क आणि सतत साबणाने हात धुणे बंद करू नका. यापासूनच Coronavirus ला दूर ठेवता येईल, अशी आठवण पंतप्रधानांनी करून दिली. आतापर्यंतचं सहावं भाषण Coronavirus च्या साथीला भारतात मार्चमध्ये सुरुवात झाली, त्यानंतर सुरुवातीला पंतप्रधान नरेंद्र मोदी नियमितपणे नागरिकांशी संवाद साधत होते. आता Unlock ला सुरुवात झाल्यानंतर जवळपास 4 महिन्यांनी ते देशातल्या नागरिकांना संबोधित करत आहेत. Covid-19 शी लढा, लॉकडाऊनचे नियम, दो गज की दूरी, आत्मनिर्भर भारत यापासून देशाची अर्थव्यवस्था आणि त्यासंबंधी प्रश्नांसंदर्भात मोदींनी आतापर्यंत देशवासीयांशी थेट संवाद साधला आहे. पंतप्रधान मोदींनी सर्वात पहिल्यांदा 19 मार्चला जनता कर्फ्यूचं आवाहन करत संवाद साधला. त्यानंतर 24 मार्चला 21 दिवसांचा देशव्यापी लॉकडाऊन जाहीर करायला ते माध्यमांतर्फे लोकांसमोर आले. तिसऱ्यांदा 3 एप्रिलला 9 मिनिटांसाठी दिवे बंद करून मेणबत्त्या आणि पणत्या लावायचं आवाहन करत त्यांनी कोरोनाविरोधातल्या लढ्यासाठी देशवासीयांना एक केलं. 14 एप्रिलला लॉकडाऊन आणखी 3 मे पर्यंत वाढवण्यात येत असल्याची घोषणा त्यांनी देशवासींयांसमोर केली. मग 12 मे रोजी आत्मनिर्भर भारताची घोषणा करताना त्यांनी काही आर्थिक पॅकेज जाहीर केली. आज देशवासीयांसमोर येण्याअगोदर त्यांनी 30 जूनला त्यांनी देशवासीयांना संबोधित करत गरिबांसाठी मोफत धान्य आणि रेशन देण्याची योजना जाहीर केली होती. मोदींचे संदेश: कधी कशासाठी? 19 मार्च : जनता कर्फ्यू 24 मार्च : 21 दिवसांचा लॉकडाउन 3 एप्रिल : 9 मिनिटांसाठी लाइट्स बंद करून पणत्या, मेणबत्त्या लावण्याचं आवाहन 14 एप्रिल : लॉकडाउन-2 ची घोषणा 12 मे : 20 लाख कोटींचं आर्थिक पॅकेज आणि आत्मनिर्भर भारताची घोषणा 30 जून : गरिबांना मोफत रेशन योजना नोव्हेंबरपर्यंत वाढवण्याचा निर्णय 20 ऑक्टोबर : सण साजरे करा पण सावध राहून, लॉकडाऊन संपला, कोरोना नाही
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.