नवी दिल्ली, 17 सप्टेंबर : सौदी अरेबियात झालेल्या ड्रोन हल्ल्यानंतर या देशातून होणाऱ्या तेल पुरवठ्यावर परिणाम झाला आहे. सौदीतल्या अराम्को तेल कंपनीला या हल्ल्यांत लक्ष्य करण्यात आलं. ही कंपनी भारताला मोठ्या प्रमाणावर तेलपुरवठा करते. भारत सरकार जरी देशात मंदीसदृश परिस्थिती नाही, असं म्हणत असले तर येत्या पंधरा दिवसात वाईट बातमी येऊ शकते. पेट्रोल- डिझेलच्या दरात किमान लीटरमागे 5 ते 6 रुपयांनी वाढ होऊ शकते. इंधनदर भडकल्यामुळे महागाईत वाढ होऊ शकते. गेल्या आठवड्यात पेट्रोल-डिझेल 4 वेळा महाग झालंय. मंगळवारी पेट्रोल डिझेलच्या किमतीत किरकोळ वाढ झाली. पेट्रोल 14 पैसे आणि डिझेल 16 पैसे प्रति लीटर महाग झालंय. पण हे दर आणखी वाढू शकतात.
जागतिक बाजारात इंधनाचे दर भडकले आहेत. आधीच उद्योगांनी माना टाकायला सुरुवात झाली आहे. त्यात असा महागाईचा भडका उडाला तर उद्योगधंद्यांचं कामकाज आणखी बिकट होऊ शकतं. भारतीय उद्योगांवर असलेलं मंदीचं सावट घट्ट होण्याची शक्यता आहे.
हे वाचा - दलित असल्यानं BJPच्या खासदाराला गावात येण्यापासून रोखलं, पोलीस चौकशी सुरू
महागाई आणखी डोकं वर काढणार आणि अर्थव्यवस्था धोक्यात येणार या चर्चेनेच सेन्सेक्ससुद्धा मंगळवारी आपटला. रुपयाही डॉलरच्या तुलनेत घसरला. सेन्सेक्स तब्बल 700 अंकांनी आपटला. ही सगळी अर्थव्यवस्था धोक्यात येत असल्याची लक्षणं आहेत.
देशाचे पेट्रोलियम मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी खरं तर स्पष्ट केलं आहे की, सौदी अरेबियातल्या ड्रोन हल्ल्यांचा भारतात होणाऱ्या तेल पुरवठ्यावर परिणाम होणार नाही. सौदी अरेबियाने तसं आश्वासन भारताला दिलेलं आहे.
हे वाचा - आर्थिक मंदीसाठी सुप्रीम कोर्ट देखील जबाबदार - हरीश साळवे
पण व्यापार क्षेत्रातले अभ्यासक सांगतात की भारताची गरज आहे त्यातला 80 टक्के तेलपुरवठा बाहेरच्या देशातून होतो. यामध्ये सौदीचाच वाटा सगळ्यात मोठा आहे. त्यामुळे सौदी अरेबियात तेलनिर्मिती थांबली असेल तर त्याचा परिणाम भारतात येणाऱ्या इंधनावर होणारच. त्यामुळे येत्या काही काळात इंधनाच्या किमती वाढणार हे निश्चित आहे.
--------------------------------------------------------------------------------------------
VIDEO: पुराच्या विळख्यात अडकली शाळा; पत्त्यांसारखी कोसळली इमारत
बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा