नवी दिल्ली, 13 फेब्रुवारी : सर्वसाधारण अर्थसंकल्प हा ‘क्रोनी कॅपिटालिस्ट’ हिताचा असल्याचा आरोप विरोधी पक्षांनी केला होता. विरोधी पक्षांच्या या आरोपांना केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन (Nirmala Sitharaman) यांनी उत्तर दिलं आहे. गरीब आणि सर्वसामान्य लोकं हे आमचे मित्र आहेत. सरकार हे त्यांच्यासाठीच काम करते, असं सीतारामन यांनी स्पष्ट केले आहे. लोकसभेत झालेल्या केंद्रीय अर्थसंकल्पावरील चर्चेमध्ये त्या बोलत होत्या.
सीतारामण यांनी यावेळी नाव न घेता सांगितले की, 'आमचे मित्र (क्रोनीज) हे जावई नाहीत. हे सरकार फक्त काही उद्योगपतींच्या हिताचं काम करत असल्याचा आरोप काँग्रेस नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनी केला होता. त्यावर, पंतप्रधान घरकुल योजना, स्वच्छ भारत मिशनच्या अंतर्गत शौचालयाचं निर्माण, पंतप्रधान ग्राम सडक योजना या सर्व योजनांचा कोणत्या उद्योगपतीला नाही, तर सामान्य जनतेला फायदा झाल्याचं सीतारामण यांनी सांगितले.
( वाचा : ‘भारताची जमीन चीनच्या ताब्यात’, राहुल गांधींच्या आरोपांना संरक्षण मंत्रालयानं दिलं ‘हे’ उत्तर )
पंतप्रधान स्वनिधी योजनेचा उल्लेखही त्यांनी यावेळी केला. “जी लोकं आमच्यावर क्रोनीज व्यक्तींशी डील केल्याचा आरोप करतात त्यांना मी सांगू इच्छिते की, या योजनेचा फायदा हा 50 लाख छोट्या व्यापाऱ्यांना होणार आहे. कोणत्याही क्रोनीजच्या खात्यात हा पैसा जाणार नाही. त्या पक्षाचं सरकार होतं त्या राज्यात पूर्वी जावायाला जमीन मिळत असे. राजस्थान, हरयणामध्ये या गोष्टी पूर्वी झाल्या आहेत,’’ अशी तिखट टीका सीतारामन यांनी केली.
PM SVANidhi Yojana, for those who are constantly accusing us of dealing with cronies - SVANidhi doesn't go to cronies. Damads get land in states which are governed by some parties - Rajasthan, Haryana once upon a time: FM Nirmala Sitharaman in Lok Sabha#Budget2021 pic.twitter.com/JhV5bQmoSR
— ANI (@ANI) February 13, 2021
संरक्षण बजेटमध्ये वाढ
“या बजेटमध्ये आरोग्य आणि कुटुंब कल्याणासाठी 71, 269 कोटींची तरतूद करण्यात आली आहे. ही गेल्या वर्षीपेक्षा अधिक रक्कम आहे. आयुष मंत्रालयाच्या तरतूदीमध्येही 40 टक्के वाढ करण्यात आली आहे. काही सदस्यांनी संरक्षण खात्याच्या बजेटमध्ये कोणतीही वाढ केली नसल्याचा दावा केला होता. बजेटच्या भाषणामध्ये त्याबद्दल उल्लेख नसला तरी संरक्षण खात्यासाठी असलेल्या तरतूदींमध्ये वाढ करण्यात आली आहे,’’ असं सीतारामन यांनी स्पष्ट केले.