‘भारताची जमीन चीनच्या ताब्यात’, राहुल गांधींच्या आरोपांना संरक्षण मंत्रालयानं दिलं ‘हे’ उत्तर

‘भारताची जमीन चीनच्या ताब्यात’, राहुल गांधींच्या आरोपांना संरक्षण मंत्रालयानं दिलं ‘हे’ उत्तर

भारतानं पूर्व लडाख (East Ladakh) मधील कोणताही भूभाग चीनला दिलेला नाही, असं स्पष्टीकरण केंद्रीय संरक्षण मंत्रालयानं (Defence Ministry) दिलं आहे.

  • Share this:

नवी दिल्ली, 13 फेब्रुवारी : भारतानं पूर्व लडाख (East Ladakh) मधील कोणताही भूभाग चीनला दिलेला नाही, असं स्पष्टीकरण केंद्रीय संरक्षण मंत्रालयानं (Defence Ministry) दिलं आहे. पँगाँग (Pangong tso) सरोवराच्या परिसरातून सैन्य मागं घेण्यावर चीनशी सहमती झाली आहे. देपसांग, हॉट स्प्रिंग आणि गोगरासह अन्य प्रलंबित समस्यांवर दोन्ही देशांच्या सैन्य कमांडरांमध्ये होणाऱ्या आगामी बैठकीत चर्चा केली जाईल असं संरक्षण मंत्रालयानं स्पष्ट केलं आहे. ‘मोदी सरकारनं भारताची जमीन चीनला दिली,’ असा आरोप काँग्रेस खासदार राहुल गांधी यांनी केला होता. त्यावर संरक्षण मंत्रालयानं हे स्पष्टीकरण दिलं आहे.

'पूर्व लडाखचं संरक्षण केलं'

‘पूर्व लडाख सेक्टरमध्ये देशाचे राष्ट्रीय हित आणि भूभागाचं प्रभावी संरक्षण करण्यात आलं आहे. सरकारनं सशस्त्र दलाच्या शक्तीवर पूर्ण विश्वास दाखवला आहे. ज्यांना जवानांच्या बलिदानावर शंका आहे, ते त्यांचा (हुतात्मा सैनिकांचा) अपमान करत आहेत’,  असं संरक्षण मंत्रालयानं स्पष्ट केलं आहे. पँगाँग सरोवराच्या परिसरातून सैन्य हटवण्याच्या बाबतीत काही मीडिया आणि सोशल मीडियावर (Social Media) चुकीच्या पद्धतीनं टिप्पणी करण्यात आली आहे, याची मंत्रालयानं माहिती घेतली आहे. केंद्रीय संरक्षण मंत्र्यांनी संसदेच्या दोन्ही सभागृहांना योग्य परिस्थितीची माहिती दिली आहे.

भारतानं कोणताही दावा सोडलेला नाही, उलट LAC वर कोणत्याही प्रकारच्या एकतर्फी बदलांना रोखलं आहे,’ या स्पष्ट शब्दात केंद्रीय संरक्षण मंत्रालयानं भारताचा भूभाग चीनच्या ताब्यात असल्याचा दावा फेटाळला आहे.

(वाचा - 'मोदी सरकारनं भारताची जमीन चीनला दिली,' राहुल गांधींचा मोठा आरोप)

भाजपाची टीका

भाजपा अध्यक्ष जेपी नड्डा (JP Nadda) यांनीही राहुल गांधी यांच्या टीकेला उत्तर दिलं आहे. सैन्य मागे हटवण्यात देशाचं नुकसान आहे, असा खोटा आरोप राहुल गांधी का कारत आहेत? त्यांचा हा आरोप काँग्रेस-चीन एमओयूचा भाग आहे का? असा प्रश्न नड्डा यांनी विचारला आहे.

राहुल गांधींनी केला होता आरोप

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारतीय जमिनीचा भाग चीनला दिला, असा गंभीर आरोप राहुल गांधी यांनी केला होता. भारताची जागा फिंगर 4 वर आहे, तर भारतीय लष्कर फिंगर 3 वर का आले? असा प्रश्न त्यांनी यावेळी विचारला. 'पंतप्रधानांनी फिंगर 4 चीनला का दिलं? आपल्या सैनिकांनी कैलास रेंजवर ताबा मिळवला होता. मात्र ते आता तिथून मागे येत आहेत, हे असं का होत आहे? नरेंद्र मोदी यांनी चीनपुढे शरणागती पत्कारली आहे,असा दावाही राहुल यांनी केला होता.

Published by: News18 Desk
First published: February 13, 2021, 8:51 AM IST

ताज्या बातम्या