पाकिस्तानकडून अजित डोवाल यांच्या जीवाला धोका? NSA ने सुरक्षा वाढवली

पाकिस्तानकडून अजित डोवाल यांच्या जीवाला धोका? NSA ने सुरक्षा वाढवली

2016 मधील उरी सर्जिकल स्ट्राइक आणि 2019 मधील बालाकोट हल्ल्यानंतर डोवाल पाकिस्तानी दहशतवाद्यांच्या हिट लिस्टवर आहेत

  • Share this:

नवी दिल्ली, 13 फेब्रुवारी: जैश-ए-मोहम्मदच्या दहशतवाद्याने चौकशीदरम्यान पोलिसांना दिलेल्या माहितीनुसार पाकिस्तानी दहशतवादी संघटनांच्या हिटलिस्टवर भारताचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल आहेत. त्यांची आधीपासूनची सुरक्षा व्यवस्था आता अधिक कडक करण्यात आली आहे. हिदायत उल्ला- मलिक नावाच्या जैश-ए-मोहम्मदच्या दहशतवाद्याला जम्मू-काश्मीर पोलिसांनी अटक केली आहे. त्याच्याकडे चौकशी केल्यावर त्यानी काही महत्त्वाची माहिती दिली. डोवाल यांच्या ऑफिसमधील व्हिडिओ शूटिंग जैशच्या हँडलरला पाठवल्याचंही मलिकनी सांगितलं आहे त्यामुळे डोवाल यांच्या ऑफिसमध्येही सुरक्षा व्यवस्था वाढवण्यात आली आहे. राष्ट्रीय सुरक्षेसंबंधी सूत्रांनी नाव जाहीर न करण्याच्या बोलीवर ही माहिती दिली आहे, असं हिंदुस्थान टाइम्सच्या वृत्तात म्हटलं आहे.

2016 मधील उरी सर्जिकल स्ट्राइक आणि 2019 मधील बालाकोट हल्ल्यानंतर डोवाल पाकिस्तानी दहशतवाद्यांच्या हिट लिस्टवर आहेत. त्यामुळे तेव्हापासूनच त्यांना उच्च दर्जाची सुरक्षा पुरवली जाते. डोवाल यांच्या जीवाला धोका असल्याची माहिती केंद्रीय गृह मंत्रालय आणि सुरक्षा यंत्रणांना देण्यात आली आहे.

(हे वाचा-राज्यपालांना सरकारी विमान नाकारल्यानंतर मुख्यमंत्र्यांच्या योजनेत बदल)

जम्मू-काश्मीरमधील शोपियाँमध्ये राहणाऱ्या हिदायत उल्लाह मलिक या जैशच्या ऑपरेटरला 6 फेब्रुवारीला पकडण्यात आलं. त्याच्याकडे चौकशी केल्यानंतर त्याने सरदार पटेल भवन आणि दिल्लीतील महत्त्वाच्या ठिकाणी आपण रेकी केल्याचं सांगितलं. त्याचबरोबर डोवाल यांच्या ऑफिसचा व्हिडीओ तयार करून पाकिस्तानला पाठवल्याचंही त्यानी सांगितलं, अशी माहिती दिल्ली आणि श्रीनगरमधील सूत्रांनी दिली.

जैशचा फ्रंट ग्रुप लष्कर-ए-मुस्तफाचा म्होरक्या असलेला मलिक याला पोलिसांनी अनंतनागमध्ये ताब्यात घेतलं तेव्हा त्याच्यासोबत मोठ्या प्रमाणात शस्त्रास्त्र आणि दारुगोळाही सापडला होता. त्याच्याविरुद्ध  यूएपी कायद्याच्या 18 आणि 20 कलमांतर्गत जम्मूतील गंगायल पोलीस ठाण्यात एफआयआर (15/2021) दाखल केला आहे.

'एनएसए ऑफिसचा व्हिडीओ तयार करण्यासाठी मी 24 मे ला इंडिगोच्या विमानाने श्रीनगरवरून नवी दिल्लीला गेलो. ते शूटिंग करून तिथं तैनात असलेल्या केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलाच्या (CISF) सुरक्षा व्यवस्थेचाही मी व्हिडीओ तयार केला आणि तो व्हॉट्सअपवरून पाकिस्तानातील ‘डॉक्टर’ नावाने ओळखल्या जाणाऱ्या दहशतवादी हँडलरला पाठवला. त्यानंतर मी बसने काश्मीरला परतलो,'असं मलिकने चौकशीदरम्यान जम्मू-काश्मीर पोलिसांना सांगितलं अशी माहिती सूत्रांनी दिली.  2019 च्या उन्हाळ्यात साथीदार समीर अहमद दारसोबत आपण सांबा सेक्टरमधील सीमाभागातील रेकी केल्याचंही मलिकने सांगितलं. दारला 2019 मधील पुलवामा दहशतवादी हल्ल्यांशी संबंध असल्याने 21 जानेवारी 2020 ला अटक करण्यात आली आहे.

(हे वाचा-Shaheen Bagh : फेरविचार याचिकेवर सर्वोच्च न्यायालयाचा मोठा निर्णय!)

मीडिया अहवालात सूत्रांचा हवाला देत असे म्हटले आहे की, मलिकला आत्मघाती दहशतवादी हल्ला करण्यासाठी मे 2020 मध्ये सँट्रो कार देण्यात आली होती. तसंच त्याने जैशच्या तीन दहशतवाद्यांसोबत जम्मू-काश्मीर बँकेच्या कॅश व्हॅनमधून 60 लाख रुपये लुटले होते. नोव्हेंबर 2020 मध्ये झालेल्या या लुटीत जैशचा इरफान थोकार, उमर मुश्ताक आणि रईस मुस्तफा यांचा समावेश होता.

मलिकने पाकिस्तानातील त्याच्या हँडलरसोबत 10 जणांची नावं फोन नंबर कोड नेम पोलिसांना सांगितले आहेत. पोलिसांनी ती माहिती सुरक्षा दलांना दिली आहे. त्यापैकी दोघं शोपियाँ आणि सोपोरमध्ये झालेल्या चकमकींत मारले गेले. मलिकने 31 जुलै 2019 ला हिज्बुल मुजाहिदिन गट जॉइन केला आणि फेब्रुवारी 2020 ला तो जैशसोबत काम करू लागला असंही त्याने सांगितलं.

जैशचा म्होरक्या मसूद अझहरला 1994 मध्ये अटक करण्यात आल्यानंतर एनएसए डोवाल यांनी आयबीचे सहसंचालक म्हणून त्याची चौकशी केली होती. तसंच 1999 मध्ये आयसी-814 या विमानाचं दहशतवाद्यांनी अपहरण केल्यानंतर कंदाहार एअरपोर्टवर मसूद अझहरला सोडायला डोवालच गेले होते.

Published by: Janhavi Bhatkar
First published: February 13, 2021, 3:59 PM IST
Tags: Uri attack

ताज्या बातम्या