नवी दिल्ली, 24 मार्च : काही दिवसांपूर्वी उत्तरप्रदेश, पंजाब, उत्तराखंड, गोवा आणि मणिपूरमध्ये विधानसभा निवडणुका झाल्या. पंजाब वगळता इतर चार राज्यांमध्ये भाजपानं बहुमत आणि सत्ता मिळवली. भाजपानं (BJP) यंदा गोव्यात 40 जागांपैकी विक्रमी 20 जागांवर विजय मिळवला आणि डॉ. प्रमोद सावंतांना (Pramod Sawant) पुन्हा मुख्यमंत्रिपदाची जबाबदारी दिली. पण या 20 आमदारांपैकी 12 आमदार आधी दुसऱ्या पक्षात होते. या 12 जणांनी निवडणुकांपूर्वी भाजपात प्रवेश केला होता. यापैकी सर्वाधिक 8 आमदार काँग्रेस पक्षाचे होते. सुभाष शिरोडकर, बाबूश मोन्सेरात, जेनिफर मोन्सेरात, नीळकंठ हळदणकर, रवी नाईक, रोहन खंवटे, मोविन गोडिन्हो हे आयाराम माजी काँग्रेस आमदार आहेत आणि आता भाजपचे आमदार आहेत. याबद्दल बोलताना गोव्यातील ज्येष्ठ पत्रकार संदेश प्रभुदेसाई सांगतात की, माजी मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांच्या निधनानंतर काँग्रेसमधून भाजपमध्ये आलेल्या 10 आमदारांपैकी 3 आमदार यावेळी पुन्हा निवडून आले आहेत. काँग्रेसने 2017 मध्ये गोव्यात 17 जागा जिंकल्या होत्या, परंतु निवडणुकीपूर्वी त्यांचे फक्त दोन आमदार पक्षाकडे राहिले होते. वाचा : मालमत्ता कर वसूलीसाठी गेलेल्या BMC च्या टीमवर प्राणघातक हल्ला, मनपा अधिकाऱ्याचा डोळा थोडक्यात बचावला केवळ गोवाच (Goa) नाही तर मणिपूरमध्येही (Manipur) असाच प्रकार पाहायला मिळाला. मणिपूरमध्येही 60 जागांच्या पैकी 32 जागा भाजपाने जिंकल्या. यापैकी 8 आमदार काँग्रेसमधून (congress) आलेले आहेत. भाजपानं ज्या एन. बिरेन सिंह यांना पुन्हा मुख्यमंत्रिपदाची संधी दिली आहे, ते स्वतः 2004 ते 2016 पर्यंत म्हणजेच 12 वर्षे काँग्रेसमध्ये होते. 2017 मध्ये त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला होता. मणिपूरमध्ये मुख्यमंत्री एन. बिरेन सिंग, टीएचएम श्यामकुमार, के. गोविंदासी, नेमचा किपजेम, डॉ. सपम रंजन, राजकुमार इमो, पोनम ब्रोजेन हे सर्वजण पूर्वाश्रमीचे काँग्रेसचे आमदार आहेत. आता या निवडणुकीत ते भाजपच्या तिकिटावर निवडून आले. दैनिक भास्कर ने यासंदर्भात वृत्त दिलंय. भाजपानं जिंकलेलं तिसरं राज्य म्हणजे उत्तराखंड (Uttarakhand). उत्तराखंडमध्येही भाजपने काँग्रेसला खिंडार पाडलं. सुबोध उनियाल, रेखा आर्य, सतपाल महाराज, उमेश शर्मा कौ, सौरभ बहुगुणा यांसारखे नेते 2017 मध्येच भाजपमध्ये सामील झाले होते. तर सरिता आर्य आणि किशोर उपाध्याय यांनी यंदाच्या निवडणुकापूर्वी भाजपमध्ये प्रवेश केला. योगींची सत्ता असलेल्या उत्तरप्रदेशातील काँग्रेसचा बालेकिल्ला असलेल्या रायबरेली येथील काँग्रेसचे दिग्गज नेते अखिलेश सिंह यांची मुलगी अदिती सिंह (Aditi Singh) भाजपात सामील झाली. ही निवडणूक त्या भाजपाच्या तिकीटावर जिंकल्या आणि निवडून आल्या. वाचा : IPL स्पर्धेच्या दरम्यान घातपाताचा कट! वानखेडेची रेकी करणाऱ्या दहशतवाद्याला अटक पक्ष बदलणाऱ्या नेत्यांबद्दल काँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते गौरव वल्लभ पंत (Gaurav Vallabh Pant) यांनी नाराजी व्यक्त केली. ते म्हणतात, “काही लोक राजकारणाला व्यवसाय म्हणून पाहतात. लोक नोकरीसाठी कंपन्या बदलतात तसे ते पक्ष बदलतात. अशा लोकांची कोणत्याही पक्षाशी वैचारिक बांधिलकी नसते, हे लोक भ्याड आहेत,” अशी टीका त्यांनी केली. दरम्यान, यंदाच्या निवडणुकांपूर्वीही दोन राज्यांमध्ये भाजपाने काँग्रेसचे आमदार फोडत सत्ता मिळवली होती. कर्नाटक आणि मध्यप्रदेशमध्ये सत्तेत असलेल्या काँग्रेसला आमदारांनी भाजपात प्रवेश केल्यानं पायउतार व्हावं लागलं होतं. तर, राजस्थानमध्येही सचिन पायलट यांची नाराजी समोर आली होती. मात्र पक्षश्रेष्ठी त्यांना मनवण्यात यशस्वी झाल्याने तिथलं सरकार टिकून राहिलं.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.