नवी दिल्ली 08 जून : धडाकेबाज कामासाठी प्रसिद्ध असलेले केंद्रीय रस्तेवाहतूक मंत्री नितीन गडकरी (Nitin Gadkari) यांच्या अखत्यारीत येणाऱ्या रस्तेबांधणीच्या कामाने आणखी एक विक्रम केला आहे. ‘नॅशनल हायवेज असोसिएशन ऑफ इंडिया’च्या (NHAI) कन्सल्टंट्सनी सलग 75 किलोमीटर्स लांबीचा बिटुमिनस काँक्रीट रस्ता (Bituminous Concrete Road) 105 तास आणि 33 मिनिटांच्या कालावधीत बांधून पूर्ण केला. या विक्रमाची नोंद ‘गिनेस बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड्स’मध्ये (Guinness Book of World Records) झाली आहे. राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 53वरच्या अमरावती ते अकोला (Amaravato to Akola Section) या शहरांदरम्यानचा रस्त्याचा भाग (सिंगल लेन) यात बांधण्यात आला. नितीन गडकरींनी ट्विटरवर व्हिडिओ पोस्ट करून या कामाशी संबंधित सर्वांचं अभिनंदन केलं आहे. ‘हिंदुस्तान टाइम्स’ने याबद्दलचं वृत्त प्रसिद्ध केलं आहे. या रस्त्याचं काम 3 जून 2022 रोजी सकाळी 7 वाजून 27 मिनिटांनी सुरू झालं आणि ते 5 जून रोजी सायंकाळी पाच वाजता संपलं, अशी माहिती नितीन गडकरींनी दिली. PM Modi in Maharashtra : पीएम मोदी पुणे, मुंबई महापालिकेच्या निवडणुका तोंडावर असताना तीन महिन्यात दुसऱ्यांदा येणार महाराष्ट्र दौऱ्यावर बिटुमिनस काँक्रीटचा रस्ता सलग बांधण्याचा यापूर्वीचा विक्रम 27.25 किलोमीटर्सचा होता. कतारमधल्या (Qatar) अशगलमध्ये 27 फेब्रुवारी 2019 रोजी तो विक्रम नोंदवला गेला होता. तो रस्ता अल खोर एक्स्प्रेस-वेचा भाग होता आणि ते काम पूर्ण होण्यास 10 दिवस लागले होते. आताचा विक्रम भारताच्या नावाने झाला असून, 105 तास 33 मिनिटांत सलग 75 किलोमीटर्स लांबीचा बिटुमिनस काँक्रीट रोड बांधल्याबद्दल या विक्रमाची नोंद झाली आहे.
Proud Moment For The Entire Nation!
— Nitin Gadkari (@nitin_gadkari) June 8, 2022
Feel very happy to congratulate our exceptional Team @NHAI_Official, Consultants & Concessionaire, Rajpath Infracon Pvt Ltd & Jagdish Kadam, on achieving the Guinness World Record (@GWR) of laying 75 Km continuous Bituminous Concrete Road... pic.twitter.com/hP9SsgrQ57
‘हा साऱ्या देशासाठी अभिमानाचा क्षण आहे. गिनेस वर्ल्ड रेकॉर्ड केल्याबद्दल NHAIमधली उत्तम टीम, कन्सल्टंट्स, राजपथ इन्फ्राकॉन प्रा. लि. आणि जगदीश कदम यांचं अभिनंदन करताना मला खूप आनंद होत आहे,’ असं गडकरींनी म्हटलं आहे. ‘ही असामान्य कामगिरी साध्य करण्यासाठी रात्रंदिवस राबलेले इंजिनीअर्स आणि कामगार यांचे मी विशेष आभार मानतो,’ असंही त्यांनी सांगितलं. केंद्राकडून ‘टूर ऑफ ड्युटी’च्या घोषणेची शक्यता, 4 वर्षांसाठी सैन्यात सामील होण्याची संधी, काय असेल पगार आणि सुविधा? ‘महत्त्वाचा पूर्व-पश्चिम कॉरिडॉर असलेल्या NH53 वरचा अमरावती-अकोला हा महत्त्वाचा भाग आहे. कोलकाता, रायपूर, नागपूर, अकोला, धुळे आणि सुरत अशी महत्त्वाची शहरं या महामार्गामुळे जोडली जातात. हा महामार्ग आपल्या देशातल्या खनिजसमृद्ध भागांतून जातो. मला मिळालेल्या माहितीनुसार, अमरावती ते अकोला या टप्प्यातलं 35 टक्के काम झालं असून, अकोला ते चिखली या टप्प्यातलं 65 टक्के काम झालं आहे. आताच्या या कामामुळे या रस्त्यावरून प्रवास करणाऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे. वाहतूक सुरळीत राहील आणि प्रवासाचा वेळ घटेल,’ असंही गडकरी यांनी स्पष्ट केलं.