नवी दिल्ली, 12 फेब्रुवारी : देशाच्या सीमांवरची परिस्थिती लक्षात घेता नव्या धोक्यांसाठी सज्ज रहावं लागेल, असा इशारा लष्करप्रमुख मनोज मुकुंद नरवणे (Manoj Mukund Naravane) यांनी दिला आहे. भारताला आणखी आक्रमक आणि मजबूत राहणं आवश्यक असल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं आहे. विशेष म्हणजे, भारत आणि चीन (India and China) यांच्यात लडाखमधून सैन्य मागं हटवण्याबाबत सहमती झाल्याचं वक्तव्य केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंह (Rajnath Singh) यांनी संसदेत केलं होतं. त्यानंतर लगेच लष्करप्रमुखांनी हे वक्तव्य केलं आहे.
काय म्हणाले लष्करप्रमुख?
‘सेंटर फॉल लँड वॉरफेअर’ यांनी आयोजित केलेल्या एका कार्यक्रमात लष्करप्रमुख बोलत होते. “आपल्या देशाच्या उत्तर सीमेवर निर्माण झालेल्या परिस्थितीमुळे आपल्याला गंभीर विचार करणं भाग पडले आहे. आपल्या सीमांचं योग्य प्रकारे संरक्षण करणे आणि अखंडता आणि सार्वभौमत्व कायम राखणे हे आपल्यापुढचे आव्हान आहे,’’ असं त्यांनी स्पष्ट केलं.
नव्या आव्हानांचा उल्लेख
21 व्या शतकात बदललेल्या युद्धाच्या स्वरुपाचाही लष्करप्रमुखांनी यावेळी उल्लेख केला. रणगाडे आणि फायटर जेट हे विसाव्या शतकातील युद्धामधील मुख्य शस्त्र होते. आता नवी आव्हानं समोर आली आहेत, असे सांगत त्यांनी आर्मेनिया आणि अझरबैजानमध्ये झालेल्या युद्धाचा त्यांनी यावेळी उल्लेख केला.
संरक्षण मंत्र्यांनी काय सांगितलं?
केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी या विषयावर संसदेत माहिती देताना सांगितले होते की, 'दोन्ही बाजूंकडून साउथ बँकमध्येही सैन्य मागे घेतलं जाईल. एप्रिल 2020नंतर नॉर्थ बँक आणि साऊथ बँकमध्ये दोन्ही बाजूंकडून काही बांधकाम केलं गेलं असेल, तर ते काढून टाकून जागा पूर्ववत केली जाईल.'
पँगाँग तलाव परिसरातील सैन्य दोन्ही बाजूंनी पूर्णपणे मागे घेतलं गेल्यानंतर 48 तासांनी वरिष्ठ कमांडर्सची बैठक होईल आणि काही मुद्दे शिल्लक राहिले असतील, तर त्याविषयीची चर्चा त्यात होईल, असंही राजनाथ सिंह यांनी स्पष्ट केले होते.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: India, India china, Indian army, Military, PM Naredra Modi