• Home
 • »
 • News
 • »
 • national
 • »
 • आंदोलनजीवी कसं म्हणू शकतो? अमोल कोल्हेंनी केलं पंतप्रधान मोदींच्या भाषणाचं 'पोस्टमार्टम'

आंदोलनजीवी कसं म्हणू शकतो? अमोल कोल्हेंनी केलं पंतप्रधान मोदींच्या भाषणाचं 'पोस्टमार्टम'

जी आई आपल्या मुलाला सांगते की जर देशावर शत्रुची गोळी आली तर तुला तुझी छाती पुढे करायची आहे, तर हा असा बाप,आई देशद्रोही कसे असू शकतात?

 • Share this:
  नवी दिल्ली, 09 फेब्रुवारी : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशात आंदोलन करणाऱ्या आंदोलकांना आंदोलनजीवी अशी उपमा दिल्यामुळे विरोधकांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे. राष्ट्रवादीचे खासदार अमोल कोल्हे यांनी लोकसभेत तुफानी भाषण करत भाजपवर जोरदार प्रहार केला आहे. 'भाजप नेते राज्यात उठसूठ आंदोलन करतात, त्यांना काय म्हणायचे ते आता कळले आहे', असा सणसणीत टोला कोल्हे यांनी लगावला. अमोल कोल्हे यांनी लोकसभेत आपल्या भाषणात थेट पंतप्रधान मोदी यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला. 'आजतर देशाला दोन नवे शब्द मिळाले आहेत, त्यातला एक आहे आंदोलनजीवी. मी या शब्दाबद्दल अतिशय आभारी आहे. कारण महाराष्ट्रातील भाजपाचे नेते उठसूठ आंदोलन करीत होते, त्यांना काय म्हणायचं हे आम्हाला या शब्दामुळे समजलं. पण ज्या कष्टकरी वर्गासाठी बाबा आढाव वयाच्या नव्वदीतही ठामपणे उभे राहतात ते मात्र महाराष्ट्राचा अभिमान आहेत. ज्या देशाच्या स्वातंत्र्याचा पायाच आंदोलन आहे त्या देशात या शब्दाचा प्रयोग कसा काय केला जाऊ शकतो? असा संतप्त सवाल अमोल कोल्हे यांनी उपस्थितीत केला. परदेशातील लोकांनी आपल्याबद्दल काय गौरवोद्गार काढले हे अभिमानाने सांगितलं. ब्राझिलचे राष्ट्राध्यक्ष संजीवनी म्हणतील तर आम्ही खुश होऊ, अमेरिकेचे माजी अध्यक्ष 'हाऊडी मोदी' म्हणतील तर आम्ही टाळ्या वाजवू, एखादा परदेशी व्यक्ती मानवतावादी दृष्टीकोनातून शेतकरी आंदोलनाच्या बाबतीत एखादी टिपण्णी करीत असेल तर ती फॉरेन रिस्टक्टीव्ह आयडॉलॉजी होते! हे बॅरीकेडस् लावणे, तटबंदी उभारणे, रस्त्यावर खिळे ठोकणे हे कोणत्या लोकशाहीचे लक्षण आहे? असा थेट सवाल कोल्हे यांनी मोदी सरकारला विचारला. राष्ट्रपती महोदयांनी आपल्या अभिभाषणात चाणक्याची वचने उद्धृत केली आहेत. पण मी या सभागृहाला सांगू इच्छितो की याच आर्य चाणक्यांनी असंही म्हटलं आहे की,जेंव्हा राजाचा अहंकार प्रजेच्या हितापेक्षा मोठा होतो तेंव्हा समजून जा की त्याच्या शासनकाळाचा अंत होणार हे निश्चित आहे, असा निशाणाही अमोल कोल्हे यांनी नरेंद्र मोदींवर साधला. प्रजासत्ताक दिनी दिल्लीत जी घटना घडली त्याचा निषेध करण्यात आला. हिंसेचे कसलेही समर्थन होऊ शकत नाही ना केले जाऊ शकते. परंतु, या माध्यमातून शेतकरी आंदोलनाला बदनाम करण्याचा जो कट रचण्यात आला तो अतिशय निषेधार्ह आहे. अगोदर सांगण्यात आलं की हे पंजाबचे शेतकरी आहेत, नंतर सांगण्यात आलं की, ते आडते आहेत, नंतर सांगण्यात आलं की ते खलिस्तानी आहेत. त्यानंतर तथाकथित आयटी सेल आणि मीडियातील काहींनी त्यांना देशद्रोही घोषीत करुन टाकले. पण जो बाप आपल्या अठरा वर्षांच्या मुलाला सांगतो की उठ, तुला लष्करात भरती व्हायचंय, जी आई आपल्या मुलाला सांगते की जर देशावर शत्रुची गोळी आली तर तुला तुझी छाती पुढे करायची आहे, तर हा असा बाप,आई देशद्रोही कसे असू शकतात? असा संतप्त सवाल कोल्हे यांनी उपस्थितीत केला. 'मुलगा आज उणे अंश सेल्सिअस तापमानात सियाचीनमध्ये कर्तव्यावर आहे. त्याचवेळी त्याचा ७० वर्षांचा म्हातारा बाप कडाक्याच्या थंडीत दिल्लीच्या सीमांवर आपल्या न्याय हक्कांसाठी आंदोलन करतोय. या अशा परिस्थितीत 'जय जवान,जय किसान' कसं म्हणायचं? असाही संतप्त सवाल कोल्हे यांनी उपस्थित केला.
  Published by:sachin Salve
  First published: