नवी दिल्ली : तीन लाटांनी हादरवून सोडल्यानंतर आता कोरोना विषाणू संसर्गाची चौथी (Corona Fourth Wave) लाट देशात येण्याची चाहूल लागल्याचं आकडेवारीतून स्पष्ट झालं आहे. बुधवारी, 8 जून रोजी देशात कोरोनाच्या 5233 नव्या रुग्णांची आणि सात जणांच्या मृत्यूची नोंद झाली होती. तेव्हा दैनंदिन पॉझिटिव्हिटी रेट 1.67 टक्के, तर साप्ताहिक पॉझिटिव्हिटी रेट (Weekly Positivity Rate) 1.12 टक्के एवढा होता. गुरुवारी म्हणजेच 9 जून रोजी संपलेल्या 24 तासांत भारतात कोरोनाच्या 7 हजारांहून अधिक नव्या रुग्णांची नोंद झाली. एवढी रुग्णसंख्या 99 दिवसांनंतर आढळून आली आहे. बुधवारच्या तुलनेत दैनंदिन रुग्णसंख्येत 39 टक्के वाढ नोंदवली गेली. तसंच, पॉझिटिव्हिटी रेट 111 दिवसांनंतर 2 टक्क्यांच्या वर गेला आहे, असं केंद्रीय आरोग्य मंत्रालयानं म्हटलं आहे. काय आहे परिस्थिती? देशभरात रुग्णांची संख्या वाढली असली, तरी त्यात लक्षणं नसलेल्या म्हणजेच Asymptomatic रुग्णांची संख्या खूप जास्त असल्याने भारतात संहारक, घातक अशी चौथी लाट येण्याची शक्यता खूपच कमी असल्याचं तज्ज्ञांचं म्हणणं आहे. रुग्णसंख्या वाढण्यात महाराष्ट्र आघाडीवर असून, मुंबई-पुण्यात रुग्णसंख्या वाढत आहे. या रुग्णसंख्येत गेल्या वेळप्रमाणेच महाराष्ट्र आघाडीवर असून, राज्यात 2701 नव्या रुग्णांची नोंद एका दिवसात झाली आहे. हा गेल्या चार महिन्यांतला उच्चांक आहे; मात्र या रुग्णसंख्येचं बारकाईने विश्लेषण केल्यास असं लक्षात येतं, की यातले बहुतांश रुग्ण लक्षणं नसलेले आहेत. तसंच, कोविड-19 झालेले रुग्ण बरे होण्याचं प्रमाणही 98 टक्के आहे. दुसऱ्या लाटेत मृत्यूचं प्रमाण सर्वाधिक होतं. त्या तुलनेत आत्ताची स्थिती खूपच दिलासादायक आहे. बुधवारी (8 जून) मुंबईत कोविड-19चे (Covid-19) 1765 नवे रुग्ण आढळले, तर एकाही मृत्यूची नोंद झालेली नाही. 26 जानेवारीनंतर एका दिवसातली ही सर्वाधिक रुग्णसंख्या आहे. या 1765पैकी 1682 रुग्ण लक्षणं नसलेले आहेत. लक्षणं असलेले अन्य 83 रुग्ण हॉस्पिटलमध्ये असून, त्यापैकी 11 रुग्ण ऑक्सिजनवर आहेत. मुंबईत कोरोना रुग्णांसाठी 24,598 बेड्स उपलब्ध असून, त्यापैकी 293 बेड्सवर सध्या रुग्ण उपचार घेत आहेत. पुण्यात (Pune) ओपीडीमध्ये येणाऱ्या पेशंट्समध्ये 5-10 टक्के वाढ नोंदवली गेल्याचं तिथल्या हॉस्पिटल्सचं म्हणणं आहे; मात्र त्यापैकी बहुतांश रुग्ण लक्षणं नसलेलेच असल्याचं डॉक्टर्सनी सांगितलं. तसंच, बहुतांश रुग्णांना ताप येण्याचा कालावधी कमी असून, तो जास्तीत जास्त 48 ते 72 तासांपर्यंतचाच असल्याचं निरीक्षण आत्ता नोंदवण्यात आलं आहे. त्याचप्रमाणे बहुतांश जणांना श्वसन संस्थेच्या वरच्या भागातली म्हणजेच घसा खवखवणं, नाक चोंदणं आणि कफ अशी लक्षणं दिसत आहे. बहुतांश पेशंट्सना कोविड-19ची सौम्य लक्षणं दिसत असून, ते घरच्या घरीच बरे होत आहेत. Men Health Tips: पुरुषांनी नक्की घ्यायला हव्यात या लसी; गंभीर आजारांचा राहत नाही धोका राज्याबाहेर परिस्थिती काय? बेंगळुरूमध्ये (Bengaluru) गेल्या पंधरवड्यात कोविड-19ची रुग्णसंख्या दुप्पट झाली आहे; मात्र त्यात हॉस्पिटलमध्ये दाखल कराव्या लागणाऱ्या रुग्णांची संख्या नगण्य आहे. सात दिवसांच्या सरासरीनुसार बेंगळुरूमधला पॉझिटिव्हिटी रेट 1.62 टक्के असून, राज्याचा सरासरी पॉझिटिव्हिटी रेट 1.11 टक्के आहे. म्हणजेच शहरात येत्या काही दिवसांत रुग्णसंख्या वाढण्याचे संकेत असले, तरी त्यात लक्षणं नसलेल्यांची संख्या जास्त असेल, असं डॉक्टर्सचं मत आहे. चेन्नईत 24 तासांत 95, तर शेजारच्या कांचीपुरम जिल्ह्यात 24 तासांत 30 रुग्ण आढळले. आरोग्य सचिव जे. राधाकृष्णन यांच्या म्हणण्यानुसार, हॉस्पिटलमध्ये दाखल रुग्णांच्या संख्येतली वाढ मोठी नसून, बहुतांश जणांना लक्षणं सौम्य आहेत. PLOS Medicine या जर्नलमध्ये प्रकाशित करण्यात आलेल्या अभ्यासात असं म्हटलं आहे, की लक्षणं नसलेल्यांकडून कोव्हिड पसरला जाण्याची भीती अनाठायी आहे. कोरोना विषाणू अर्थात SARS-CoV-2 चा संसर्ग झालेल्या आणि लक्षणं नसलेल्या व्यक्तींकडून दुसऱ्या व्यक्तींना कोरोनाचा संसर्ग होण्याची शक्यता 66 टक्के कमी आहे. 42 देशांतल्या 28,426 कोरोनाबाधितांवर केलेल्या 130 वेगवेगळ्या अभ्यासांतून शास्त्रज्ञांनी काढलेल्या निष्कर्षांनुसार, लक्षणं असलेल्यांच्या तुलनेत लक्षणं नसलेल्या कोरोनाबाधितांकडून संसर्ग होण्याची शक्यता खूप कमी आहे. ‘नॅशनल सेंटर फॉर डिसीज कंट्रोल’चे डॉ. सुजितकुमार सिंग म्हणतात, की सध्या देशात दिसून येत असलेली रुग्णसंख्येतली वाढ म्हणजे चौथ्या लाटेची सुरुवात आहे असं म्हणण्याचं काहीही कारण नाही. अनेक राज्यांत BA.4 आणि BA.5 या सब व्हॅरिएंट्समुळे कोरोना रुग्णसंख्येत वाढ झाली असावी; मात्र ओमिक्रॉनच्या सबव्हॅरिएंट्समुळे देशातली हायब्रिड इम्युनिटी वाढली असून, लसीकरणही मोठ्या प्रमाणावर झालं आहे. जीवघेण्या कॅन्सरवरही आलं औषध? रुग्ण पूर्णपणे बरे झाल्याचा दावा घाबरण्याची गरज नाही, पण… कोविड-19 वर्किंग ग्रुपचे अध्यक्ष डॉ. एन. के. अरोरा यांनीही असंच मत व्यक्त केलं. ‘बऱ्याच खंडानंतर भारतीयांनी देशांतर्गत आणि देशाबाहेरचा प्रवास मोठ्या प्रमाणावर सुरू केला आहे. त्यामुळे रुग्णसंख्येत वाढ दिसत आहे. आत्ता तरी पॅनिक होण्याची काहीच गरज नाही,’ असं ते म्हणतात. असं असलं तरी, वाढत्या रुग्णसंख्येकडे दुर्लक्ष करून उपयोग नाही. मास्क वापरणं, गर्दी न करणं, सोशल डिस्टन्सिंग पाळणं आदी बाबी अत्यंत महत्त्वाच्या आहेत. पावसाळा सुरू होत असल्याने आजार होण्याचं प्रमाण नैसर्गिकरीत्याही जास्त असतं. त्यामुळे काळजी घेणं आवश्यक आहे, असं तज्ज्ञांचं म्हणणं आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.