नवी दिल्ली, 27 एप्रिल : पंतप्रधान नरेंद्र मोदी
(PM Narendra Modi) यांनी कोविड संदर्भात राज्यांच्या मुख्यमंत्र्यांसमवेत दूरदृश्य प्रणालीद्वारे बैठक घेतली. कोविडबाबतीत
(Covid) पंतप्रधान घेत असलेली ही 24 वी बैठक होती. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे
(CM Uddhav Thackeray) या बैठकीत सहभागी झाले होते. सहभागी झालेल्या मुख्यमंत्र्यांपैकी कोविड संसर्गात लक्षणीय वाढ झालेल्या दिल्ली, उत्तर प्रदेश, मिझोराम, कर्नाटक, हरियाणा या पाच राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी त्यांच्या उपाययोजनांची माहिती दिली. त्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संबोधित केलं. कोरोना परिस्थिती, इंधनावरील कर आणि वाढत्या तापमानाच्या मुद्द्यावर यावेळी त्यांनी भाष्य करत खास आवाहन केलं आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले, लसीकरण ही आपली प्राथमिकता आहे. त्यामुळे पूर्वप्रमाणे आताही शाळांमध्ये विशेष अभियान राबवण्याची आवश्यकता आहे. लसीकरण हे सुरक्षा कवच आहे. तिसऱ्या लाटे दरम्यान आपण दररोज तीन लाखांहून अधिक रुग्णसंख्या पाहिली आहे. आपल्या देशातील सर्व राज्यांनी ही परिस्थिती हाताळली. आपले वैज्ञानिक, एक्सपर्ट आंतरराष्ट्रीय परिस्थितीवर लक्ष ठेवून आहेत. संसर्गाला सुरुवातीलाच रोखणं ही आपली प्राथमिकता आधीही होती आणि आताही असणार आहे.
देशात पुन्हा कोरोना रुग्ण वाढत आहेत. कोरोना रुग्ण वाढल्यानं काळजी घ्या, लहान मुलांना कोरोनाचा अधिक धोका आहे. लहान मुलांच्या लसीकरणाला प्राधान्य, मुलांसाठी शाळांमध्ये लसीकरण अभियान राबवावे. केंद्र आणि राज्यांनी मिळून लढा द्यायचा आहे.
वाचा : वैद्यकीय तपासणीचा अहवाला आला समोर, सोमय्यांच्या दुखापतीबाबत मोठी माहिती उघड
इंधन दरवाढीवरुन महाराष्ट्र, पश्चिम बंगालला आवाहन
पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले, केंद्र सरकारने इंधनावरील कर कमी केला. गेल्या वर्षी नोव्हेंबर महिन्यात व्हॅट कमी करण्याचं आवाहन मी सर्व राज्यांना केलं होतं. पण काही राज्यांनी तसं केलं नाही. सहा महिन्यांपूर्वी काही राज्यांनी ऐकलं तर काहींनी ऐकलं नाही. महाराष्ट्र, पश्चिम बंगाल, तमिळनाडू, तेलंगना, आंध्रप्रदेश, केरळ, झारखंड यांनी काही ना काही कारणांमुळे हे ऐकलं नाही आणि परिणामी नागरिकांवर इंधन वाढीचं ओझं कायम राहिलं. या काळात राज्यांनी किती उत्पन्न कमावलं मी त्यात पडणार नाही. आता माझी तुमच्याकडे प्रार्थना आहे की, देशहितासाठी आत्ता तुम्ही हे करु शकता.
भाजपशासित राज्यांमध्ये इंधन दर किती आहे आणि भाजपची सत्ता नसलेल्या राज्यांत किती दर आहे याची तुलना पंतप्रधान नरेंद्र मोदींनी करत दरातील तफावत सुद्धा वाचून दाखवली आहे.
आत्ता व्हॅट कमी करुन तुम्ही नागरिकांना त्याचा लाभ द्या. माझं सर्व राज्यांना आवाहन आहे की, वैश्विक संकटाच्या काळात एक टीम म्हणून आपण काम करावं. आज चेन्नईत पेट्रोल 111 रुपयांच्या घरात आहे, जयपूरमध्ये 118 रुपये प्रति लिटर, हैदराबाद 119 हून अधिक, कोलकातामध्ये 115 हून अधिक, मुंबईत 120 हून अधिक आहे. तर ज्यांनी कपात केली आहे त्या ठिकाणी म्हणजेच मुंबईच्या शेजारी दीव दमण मध्ये 102 रुपये इतका दर आहे. कोलकातात 115 तर लखनऊमध्ये 105 रुपये दर आहे. जयपूरमध्ये 118 तर गुवाहाटीत 105 रुपये प्रति लिटर आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.