नवी दिल्ली, 1 ऑक्टोबर : प्रत्येक स्त्रीमध्ये निग्रह, अपार मेहनत ही गुणवैशिष्ट्यं असतात. आपल्या कुटुंबासाठी ती रात्रंदिवस कष्ट घेत असते. कुटुंबातल्या व्यक्तींची स्वप्नं पूर्ण करण्यासाठी घरातली स्त्री प्रयत्नांची पराकाष्ठा करते. मारवाडमधल्या उषा छापेला (Usha Chapela) यादेखील त्यापैकीच एक. मारवाडच्या (Marwad) मदर तेरेसा म्हणून त्या ओळखल्या जातात.
त्यांच्या पतीचा अपघाती मृत्यू झाला. परंतु, पतीचं स्वप्न प्रत्यक्षात यावं यासाठी त्यांनी आपलं संपूर्ण आयुष्य पणाला लावलं. आज त्यांच्या पतीचं स्वप्न प्रत्यक्षात उतरलं आहे. हेच स्वप्न त्यांचा त्याग, परिश्रम आणि समाजकार्याची ओळख ठरलं आहे. त्यांच्या कार्याचा आढावा घेणारं वृत्त दैनिक भास्करने दिली आहे. आज एक ऑक्टोबर, अर्थात आंतरराष्ट्रीय ज्येष्ठ नागरिक दिन ( International Day of Older Persons). त्या निमित्ताने उषा छापेला यांच्या कार्याविषयी जाणून घेऊ या...
पाली जिल्ह्यातल्या मारवाड जंक्शन येथील रहिवासी असलेल्या उषा छापेला या नरसिंहपुरा येथे शासकीय शाळेत शिक्षिका (Teacher) आहेत. 13 जून 2003 रोजी एका अपघातात त्यांच्या पतीचं निधन झालं. त्यांचे पती राधेश्याम छापेला हेदेखील शासकीय शाळेत शिक्षक होते. वृद्धाश्रम सुरू (Old age Home) करण्याचं स्वप्न राधेश्याम छापेला यांनी पाहिलं होतं. पतीचं स्वप्न प्रत्यक्षात उतरवण्याचा निश्चय उषा यांनी केला. हे स्वप्न पूर्ण होण्यासाठी त्यांनी 13 वर्ष अन्नग्रहणही केलं नाही. केवळ फलाहार करून राहिल्या. पतीच्या मृत्यूनंतर मिळालेल्या विमा रकमेतून त्यांनी जमीन खरेदी केली. बचत केलेली सर्व रक्कम वृद्धाश्रमाच्या उभारणीसाठी वापरली आणि अखेरीस वृद्धाश्रमाचं राधेश्याम छापेला यांचं स्वप्न प्रत्यक्षात आलं; पण ही वाटचाल उषा यांच्यासाठी सोपी नव्हती.
हे ही वाचा-बिहारमधील एका अफवेमुळे Parle-G कंपनी फायद्यात; काय आहे नेमका प्रकार?
`माझे पती राधेश्याम छापेला हे शिक्षक होते. एक दिवस बोलताना त्यांनी वृद्धाश्रम सुरू करण्याची इच्छा व्यक्त केली होती. निवृत्त झाल्यानंतर मला उर्वरित आयुष्य वृद्धांच्या सेवेत घालवयाचं असं ते कायम म्हणत. परंतु, अपघातात त्यांचा मृत्यू झाला. या घटनेचा मला जबर मानसिक धक्का बसला आणि मी डिप्रेशनमध्ये (Depression) गेले. कुटुंबातील व्यक्तींची मदत आणि उपचार यामुळं मी या आजारातून सावरले. पतीच्या स्वप्नातला वृद्धाश्रम उभारत नाही तोपर्यंत अन्न ग्रहण करणार नाही, असा संकल्प मी केला. 2004 मध्ये पतीच्या विमा रकमेतून विकास नगर येथे जमीन खरेदी केली. परंतु, वृद्धाश्रम उभारण्यासाठी लाखो रुपयांची गरज होती. याला वेळही खूप लागणार होता. त्यामुळे 2014 मध्ये मारवाड जंक्शनमधल्या वीर दुर्गादास नगरमधल्या माझ्या घरातच वृद्धाश्रम सुरू केला. त्यानंतर तीन वृद्ध आमच्या या वृद्धाश्रमात दाखल झाले. त्यानंतर घरातली जागा अपुरी पडू लागली. त्यामुळे अजून पैशांची जमवाजमव केली, नातेवाईकांकडून काही रक्कम घेतली आणि विकासनगरमधील जमिनीवर वास्तू उभारणी सुरू केली,` असं उषा छापेला यांनी सांगितलं.
`वृद्धाश्रमाचं बांधकाम पूर्ण झाल्यानंतर पतीच्या स्मरणदिनी म्हणजेच 13 जून 2015 रोजी वृद्धाश्रम सुरू केला. या वृद्धाश्रमाचं नाव ज्ञानुषा असं ठेवण्यात आलं. सध्या या वृद्धाश्रमात 10 वृद्ध राहतात. येथे महिला-पुरुषांसाठी वेगळी स्वच्छतागृहं, हॉल, झोपण्यासाठी पलंग, स्वतंत्र कपाटं, फिरण्यासाठी बाग, मनोरंजनासाठी टीव्ही आणि म्युझिक सिस्टीम अशा सुविधा आहेत. वृद्धांना सकाळचा नाष्टा आणि दोन वेळचं जेवण देण्यासाठी दोन महिलांची नियुक्ती करण्यात आली आहे. वृद्धांच्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी वेळोवेळी डॉक्टर्स येतात. वृद्धांच्या देखभालीचं काम एक युवक करतो. मूल-बाळ नाही किंवा नातलग सेवा करू इच्छित नाही, असे बहुतांश वृद्ध येथे दाखल आहेत. ज्या वृद्धांना मुलं आहेत, त्यांना येथे बोलावून त्यांचं समुपदेशन करून त्यांच्यासोबत वृद्धांना परत घरी पाठवून दिलं जातं. काही वृद्धांचं वय जास्त असल्यानं किंवा गंभीर आजारामुळे त्यांची सेवा करणं कठीण जातं. आजारपणामुळे काही वृद्ध अंथरुणातच मूत्रविसर्जन करतात. काही वृद्धांना जेवणानंतर आपलं ताटदेखील उचलता येत नाही, अशा व्यक्तींची सेवाही आम्ही करतो. हा वृद्धाश्रम प्रत्यक्षात सुरू झाल्यानंतर मी 13 जून 2016 रोजी अन्नग्रहण केलं. तोपर्यंत मी केवळ फलाहार घेत होते,` असं उषा छापेला यांनी सांगितलं.
हे ही वाचा-..म्हणून जुळी मुलं जन्माला येतात; शास्त्रज्ञांनी सांगितलं कारण
`पतीच्या पेन्शनमधून हा वृद्धाश्रम मी चालवते. माझा मुलगा घनःश्याम छापेला आऊवा स्कूलमध्ये प्राचार्य, तर दुसरा मुलगा डॉ. दिनेश रॉय छापेला हा राजसमंदमध्ये एसडीएम आहे. गरज पडल्यावर माझी दोन्ही मुलं मला आर्थिक मदत करतात. काही व्यापारीदेखील वृद्धाश्रमासाठी मदत देतात,` असं उषा छापेला यांनी सांगितलं.
या वृद्धाश्रमात पत्नीसह राहत असलेल्या मांगीलाल यांनी सांगितलं, की `मी सहा ते सात महिन्यांपासून येथे आहे. येथे जेवण, औषधं वेळच्या वेळी दिली जातात. उषा छापेला या आमच्यासाठी मदर तेरेसांप्रमाणेच आहेत.` बगडीनगर येथील कवराईदेवी आणि मिश्रीलाल यांनी सांगितलं, की `आम्हाला मूलबाळ नाही. त्यामुळे आम्ही या वृद्धाश्रमात राहतो. आजारी पडल्यास वैद्यकीय सेवा वेळेत मिळते. उषा छापेला यांचा सेवाभाव अगदी मदर तेरेसा (Mother Teresa) यांच्याप्रमाणेच आहे.`
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Depression, Old man, Positive story