रुपेश कुमार भगत, प्रतिनिधी गुमला, 6 जुलै : आई झाल्यावर स्त्रीला जगातल्या कोणत्याही गोष्टीपेक्षा आपलं बाळ प्रिय असतं, असं म्हटलं जातं. आईचा जीव बाळातच असतो याचा जिवंत प्रत्यय झारखंडच्या गुमला जिल्ह्यातून आला आहे. येथे गुट्वा परसा टोळी गावातील मुलीपाठोपाठ आईचाही मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. 19 वर्षीय सुगंती कुमारीला काही दिवसांपासून श्वासोच्छवासाचा त्रास होत होता. त्रास प्रचंड वाढल्याने कुटुंबीयांनी तिला जवळच्याच आरोग्य केंद्रात दाखल केलं. मात्र तिची गंभीर प्रकृती पाहता तेथील डॉक्टरांनी तिला गुमला सदर रुग्णालयात हलविण्यास सांगितलं. कुटुंबीयांनी ताबडतोब तिला डॉक्टरांनी सांगितलेल्या रुग्णालयात नेण्याची तयारी केली. ते रुग्णवाहिकेतून तिला घेऊन निघालेसुद्धा, मात्र…
गुमला सदर रुग्णालयात नेतानाच वाटेत सुगंतीचा मृत्यू झाला. डोळ्यांसमोर मुलीला जीव सोडताना पाहून सुगंतीची आई रोपनी देवी (65 वर्ष) यांची प्रकृती अतिशय खालावली. त्यांची मनःस्थितीही ढासळली. सर्वजण सुगंतीच्या जाण्याचा धक्का पचवतात, तोच रोपनी देवींनीही मृत्यूला कवटाळलं. एकत्र दोन मृत्यूंनी त्यांच्या कुटुंबियांवर अक्षरशः दुःखाचा डोंगर कोसळला. मात्र दोघींमध्ये जरातरी जीव शिल्लक असेल, या भाबड्या आशेने त्यांनी दोघींना रुग्णालयात नेलं. परंतु दुर्दैवाने डॉक्टरांनी त्यांचा मृत्यू झाल्याचं स्पष्ट केलं. प्राणप्रतिष्ठापनेसाठी अयोध्येतील राम मंदिर सज्ज; पहिल्यांदाच PHOTOS आले समोर मिळालेल्या माहितीनुसार, सुगंतीवर गुमला सदर रुग्णालयात उपचार सुरू होते. 2 दिवसांपूर्वीच तिला घरी आणलं होतं. डॉक्टरांनी ती बरी असल्याचं सांगितलं होतं. मात्र घरी येताच श्वसनाचा त्रास पुन्हा सुरू झाला होता. दरम्यान, घरातील दोन सदस्य गमावल्याने सुगंतीच्या कुटुंबीयांची रडून रडून अतिशय वाईट अवस्था झाली आहे. तसेच या घटनेने अख्खं गावही हळहळलं आहे.