नवी दिल्ली, 19 नोव्हेंबर : गेल्या दोन वर्षांपासून जगभरात थैमान घातलेल्या कोरोना महामारीबाबत अनेक देशांमध्ये संशोधन सुरू आहे. कोरोनावर औषध शोधण्यासोबतच शास्त्रज्ञ यातून बऱ्या झालेल्या व्यक्तींच्या आरोग्यातल्या बदलांचाही अभ्यास करत आहेत. आता ब्रिटनमध्ये करण्यात आलेल्या एका नवीन अभ्यासात असं दिसून आलं आहे, की ज्यांची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली होती, अशा व्यक्तींमध्ये मानसिक आजार, थकवा आणि निद्रानाशाचा धोका वाढतो आहे. मँचेस्टर युनिव्हर्सिटीच्या (University of Manchester) संशोधकांनी ब्रिटनमध्ये फेब्रुवारी ते डिसेंबर 2020 दरम्यान कोविडची लागण झालेल्या 2,26,521 नागरिकांच्या आरोग्यासंबंधीच्या नोंदींचं विश्लेषण केलं. अमेरिकन मेडिकल असोसिएशन म्हणजेच जामा (JAMA) नेटवर्क ओपन जर्नलमध्ये प्रकाशित झालेल्या या अभ्यासाचे निष्कर्ष असं दर्शवतात, की थकव्याची समस्या घेऊन डॉक्टरांकडे आलेल्या व्यक्तींच्या संख्येत सहा पटींनी वाढ झाली आहे. पॉलिमरेझ चेन रिअॅक्शन (PCR) चाचणीत पॉझिटिव्ह आलेल्या व्यक्तींचा त्यात समावेश आहे. कोरोना न झालेल्या व्यक्तींच्या तुलनेत कोरोना पॉझिटिव्ह आढळलेल्या व्यक्तींमध्ये निद्रानाशाची समस्या तीन पटींनी वाढली आहे. ज्यांना यापूर्वी कधीही निद्रानाशाची समस्या नव्हती, अशा व्यक्तीही निद्रानाशाच्या समस्येवर उपचार करण्यासाठी डॉक्टरांपर्यंत येऊ लागले आहेत. वाचा : औरंगाबादमधील बोगस कोविड रुग्ण प्रकरण: तपासणीत ‘त्या’ तरुणाचा अहवाल कोविड निगेटिव्ह अभ्यासात काय आढळलं? पीसीआर चाचणीमध्ये कोविड पॉझिटिव्ह आढळलेल्या 83 टक्के नागरिकांमध्ये मानसिक आजारांत (Mental Illness) वाढ झाली आहे; मात्र कोविड-19 मुळे थेट मानसिक आजारही होत आहेत का, असा संशोधकांसमोर संभ्रम आहे; पण हे शक्य आहे. कारण महामारीमुळे मानसिक ताण वाढला आहे. मँचेस्टर विद्यापीठाचे डॉ. मॅथियास पियर्स (Matthias Pierce) म्हणतात, ‘थकवा हा थेट कोविड-19 चा परिणाम आहे आणि या आजारात निद्रानाशाचा धोकाही वाढतो.’ वाचा : IIT बॉम्बेचा Alert: घराच्या आत ‘या’ ठिकाणी Coronaचा धोका 10 पट जास्त ‘या’ रुग्णांसाठी कोरोना ठरू शकतो जीवघेणा यापूर्वी करण्यात आलेल्या अभ्यासांमध्ये असं समोर आलं होतं, की झोपेसंबंधी आजार (Sleep Disorders) असलेल्या रुग्णांमध्ये कोरोना व्हायरस (Coronavirus) प्राणघातक ठरू शकतो. आताच्या अभ्यासात असं समोर आलं आहे, की झोपेत असताना श्वासोच्छावासाचा त्रास (Breathing problems while sleeping) आणि हायपोक्सियामुळे (Hypoxia) ग्रस्त असलेल्या रुग्णांना कोरोनाची लागण झाल्यास त्यांना हॉस्पिटलमध्ये अॅडमिट करावं लागण्याची, तसंच त्यांच्या मृत्यूची शक्यता 31 टक्के जास्त असते. कोरोना या विषाणूने जगभरात थैमान घातले होते. आतादेखील काही देशांमध्ये कोरोनाची परिस्थिती चिंताजनक आहे. कोरोना संसर्गातून बरे झालेल्या काही रुग्णांना अद्यापही विविध शारीरिक समस्या उद्भवत असल्याचे प्रकार समोर आले आहेत. त्यातच हे संशोधन समोर आलं आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.