मेरठ, 10 एप्रिल : कोरोना व्हायरसविरोधात (Coronavirus) लढण्यासाठी सर्वजण एकवटले आहेत. प्रत्येक जण या लढाईत आपली काही मदत व्हावी यासाठी प्रयत्नशील आहे. अशावेळी मेरठ जिल्ह्यामधील सैन्यदलातील निवृत्त ज्युनिअर कमिशनर ऑफिसर (CGO) मोहिंदर सिंह यांनी निवृत्तीनंतरही त्यांंची देशसेवा सुरूच ठेवली आहे. त्यांनी त्यांना मिळालेली ग्रॅच्युटी,पेन्शन आणि आतापर्यंत साठवलेल्या कमाईतून एकूण 15.11 लाख रुपये पंतप्रधान साहाय्यता निधीमध्ये दान केले आहेत. या देशभक्ताने दान केल्यानंतर अशी प्रतिक्रिया दिली आहे की- मला जे मिळालं आहे ते देशानेच दिले आहे. आता गरज आहे तर मी देशाचे पैसे परतफेड करत आहे. (हे वाचा- ‘मुलांना जवळ घेण्यासाठी जीव तुटतो पण…’, कोरोना पॉझिटिव्ह नर्स आईची कहाणी ) निवृत्त CGO मोहिंदर सिंह 1971च्या भारत-पाक युद्धाचे साक्षीदार राहिले आहेत. त्यांनी आज देशाला गरज असताना थेट ते पत्नीबरोबर पंजाब आणि सिंधमधील बँकेत पोहोचले आणि हा चेक बँक मॅनेजरना सुपूर्द केला. यावेळी मोहिंदर सिंह यांनी सांगितले की, माझं वय 85 वर्ष झाले आहे. आता मी हा पैसा घेऊन कुठे जाणार आहे. पैशाचा वापर लोकांच्या कल्याणासाठी होईल यातच मला आनंद आहे. या दाम्पत्याची दोन मुलं आणि एक मुलगी परदेशात नोकरी करतात. तर एक मुलगी दिल्लीत वास्तव्यास आहे. मेरठमध्ये 11 ठिकाणी कोरोनाचा हॉटस्पॉट मेरठ जनपदमध्ये 11 ठिकाणांना कोरोनाचा हॉटस्पॉट घोषित करण्यात आले आहे. याठिकाणी पूर्णपणे लॉकडाऊन करण्यात आले आहे. याठिकाणच्या जागांची वेळोवेळी ड्रोनद्वारे पाहणी करण्यात येत आहे. जर एखादा व्यक्ती बाहेर पडलेला दिसला आणि कॅमेऱ्यात कैद झाला तर त्याचं काही खरं नसतं. मेरठ झोनचे एडीजी प्रशांत कुमार या सर्व ड्रोनच्या हालचालींवर लक्ष ठेऊन आहेत. पोलीस कंट्रोल रुममधून सर्वांवर नजर ठेवण्यात येत आहे. (हे वाचा- एप्रिल अखेरीस कोरोनापासून होणार सुटका? असा आहे मोदी सरकारचा प्लॅन ) मेरठचे जिल्हाधिकारी अनिल ढिंगरा यांनी दिलेल्या माहितीनुसार ड्रोनचा वापर याकरता करण्यात येत आहे, जेणेकरून लोकं छतावर एकत्र जमणार नाहीत. नाहीतर कठोर शासन करण्यात येणार असल्याची माहिती त्यांनी न्यूज 18शी बोलताना दिली आहे. संपादन-जान्हवी भाटकर
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.