नवी दिल्ली, 18 जुलै : अनेकांना कारची खूप आवड असते. अनेक भारतीयांकडे एकापेक्षा एक सरस अशा लक्झरी कार्सचं कलेक्शन आहे. यामध्ये उद्योगपतींपासून सेलिब्रिटींचा समावेश आहे. असेही शेकडो भारतीय आहेत ज्यांच्याकडे रोल्स रॉयस आणि रेंज रोव्हरसह जगभरातील मोठ्या ब्रँड्सच्या कोट्यवधी रुपयांच्या कार आहेत. परंतु गोष्ट जेव्हा बुगाटी कंपनीच्या सुपरकार्सची येते तेव्हा मात्र ही संख्या झपाट्याने कमी होते. कारण ही कार प्रचंड महाग आहे. बुगाटी कार कोट्यवधी रुपयांना मिळते. असे अनेक भारतीय आहेत की, ज्यांच्याकडे 10-12 कोटी रुपयांची बुगाटी आहे. तसेच अमेरिकेत राहणारे एनआरआय मयूर श्री यांच्याकडे बुगाटी शिरॉन ही सुपरकार आहे. जिची किंमत तब्बल 21 कोटी रुपये आहे. ‘नवभारत टाइम्स’ने यासंदर्भात वृत्त दिलं आहे.
बुगाटी शिरॉन कारचे फीचर्स
बुगाटी शिरॉन ही सुपरकार जगभरात केवळ 100 लोकांकडेच आहे, असं म्हणतात. या कारमध्ये 8.0-लिटर क्वॉड-टर्बोचार्ज्ड W16 इंजिन आहे. हे इंजिन 1479 bhpची कमाल पॉवर आणि 1600 न्यूटन मीटरचा पिकअप टॉर्क जनरेट करू शकतं. बुगाटी शिरॉनचा सर्वाधिक स्पीड 420 किमी प्रतितास आहे. ही कार केवळ 2.3 सेकंदात 0-100 किमी प्रतितास स्पीड गाठू शकते. या सुपरकारचे लूक आणि फीचर्स असे आहेत की, कोणीही या कारच्या प्रेमात पडल्याशिवाय राहणार नाही. प्रेम की कट? आता समोरासमोर होणार चौकशी! सीमा हैदर संशयाच्या घेऱ्यात
मयूर श्रीजवळ आलिशान गाड्यांचा ताफा
बुगाटी शिरॉन ही गाडी असलेले मयूर श्री हे एकमेव एनआरआय भारतीय असल्याचं म्हटलं जातं. कदाचित भारतातही कोणाकडे ही कार नसेल. त्यांनी या गाडीसाठी थोडेथोडके नव्हे तर तब्बल 21 कोटी रुपये खर्च केले आहेत. मयूर श्रीने ही सुपरकार स्वतःसाठी घेतली नव्हती, तर वडिलांना भेट म्हणून दिली होती. त्याच्या कार कलेक्शनमध्ये लॅम्बॉर्गिनी, अॅस्टन मार्टिन, पोर्श, मॅकलरेन, रोल्स रॉइस इत्यादींसह जगभरातील लक्झरी कार आहेत. मयूर श्री हे रिअल इस्टेट व्यवसायिक आहेत. अमेरिकेपूर्वी ते आफ्रिकेत राहायचे, तिथे त्यांचा व्यवसाय असल्याचंही म्हटलं जातं. तिथेही ते प्रसिद्ध आहेत.