नवी दिल्ली, 5 एप्रिल : हवामान विभागाने (India Meteorological Department) मार्च महिना ऐतिहासिकदृष्ट्या उष्ण राहिल्याची माहिती दिली आहे. हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, मागील 121 वर्षांच्या इतिहासात मार्च तिसरा सर्वात उष्ण महिना ठरला आहे. हवामान विभागाच्या आढावा बैठकीत असं समोर आलं की, मार्च महिन्यात संपूर्ण देशाचं कमाल सरासरी तापमान 32.65 डिग्री सेल्सियस होतं. मार्च महिन्यात देशातील अनेक भागात तापमान 40 डिग्री सेल्सियसवर पोहोचलं होतं. यावर्षी होळीच्या दिवशीही गरमीने हा रेकॉर्ड मोडला आहे. मार्च महिन्यातच मे महिन्याप्रमाणेच उन्हाळा जाणवला. होळीच्या दिवशी दिल्लीच्या सफदरजंगमध्ये सर्वाधिक 40.1 डिग्री तापमानाची नोंद करण्यात आली. हे 1945 नंतर मार्च महिन्यातील सर्वाधिक तापमान ठरलं आहे. 76 वर्षांत पहिल्यांदाच, मार्चमध्ये दिल्लीचं तापमान 40 च्या पार गेलं. हवामान शास्त्रज्ञांच्या म्हणण्यानुसार, दिल्लीत 1945 नंतर पहिल्यांदा इतकी उष्णतेची लाट पाहायला मिळाली. 29 मार्चला दिल्लीत 40.1 डिग्री सेल्सियसपर्यंत तापमानाची नोंद झाली. यापूर्वी मार्च महिन्यात असं कधीही झालं नव्हतं, असं हवामान जाणकारांचं म्हणणं आहे. दरम्यान, विदर्भासहित महाराष्ट्रातील काही भागात उष्णतेच्या लाटेच्या (Heat Wave) इशारा देण्यात आला आहे. त्यामुळे विदर्भकरांना तीव्र उकाड्याच्या त्रासाला सामोरं जावं लागणार आहे.
(वाचा - डेटा यूजबाबत Airtel ने पाठवलं 12 लाखांचं बिल; SMS पाहून ग्राहकाला हार्ट अटॅक )
पुढील 24 तासांत दक्षिणपूर्व राजस्थान, तामिळनाडू आणि पूर्व विदर्भातील नागरिकांना हवामान विभागाकडून सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. या भागात पुढील चोवीस तासांत उष्णतेची लाट येण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहेत. त्यामुळे दुपारच्या वेळी घरातून बाहेर पडल्यास उष्माघातासारख्या आजारांना सामोरं जावू लागू शकतं. त्यामुळे आवश्यक कारणासाठी घराबाहेर पडत असाल, तर भरपूर पाणी पिण्याचा सल्ला वेधशाळेनं दिला आहे.