इम्फाल, 20 जुलै : मणिपूरमध्ये 4 मे रोजी दोन महिलांची विवस्त्र अवस्थेत धिंड काढल्याचा व्हिडिओ समोर आला आहे. एका समुदायातील काही पुरुषांनी दुसऱ्या समुदायातील दोन स्त्रियांची नग्नावस्थेत धिंड काढल्याचं या व्हिडिओमध्ये दिसत आहे. हा धक्कादायक व्हिडिओ इंडिजिनस ट्रायबल लीडर्स फोरमनं (ITLF) प्रसारित केला आहे. आदिवासी समुदायांच्या दुर्दशेकडे लक्ष वेधण्यासाठी गुरुवारी निषेध मोर्चा काढण्याची घोषणा करण्यापूर्वी आयटीएलएफनं हा व्हिडिओ समोर आणला. राजकीय नेते, चित्रपट कलाकार आणि देशभरातील नागरिकांनी मणिपूरमध्ये घडलेल्या घृणास्पद कृत्याबद्दल संतापजनक प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदींनीही यावर प्रतिक्रिया दिली आहे. मोदी म्हणाले की, मणिपूरमधील लेकींसोबत जे कृत्य घडलं ते माफ करण्यासारखं नाही. मणिपूरमधील घटना ही हृदय पिळवटून टाकणारी आणि संतापजनक आहे. मुख्यमंत्री कधी बदलणार: काँग्रेस 4 मे रोजी मणिपूरमध्ये काही पुरुषांकडून दोन महिलांना नग्न करून त्यांची धिंड काढल्याचा व्हिडिओ समोर आला आहे. या प्रकरणानंतर नरेंद्र मोदी सरकार ‘ऑल इज वेल’ असं वागणं कधी थांबवणार? असा प्रश्न करत काँग्रेसनं गुरुवारी केंद्र सरकारवर टीका केली. मुख्यमंत्री एन. बिरेन सिंग यांची गच्छंती कधी होणार, याबाबतही काँग्रेसनं प्रश्न उपस्थित केला आहे. काँग्रेसचे सरचिटणीस जयराम रमेश म्हणाले की, मणिपूरमध्ये पूर्ण जातीय हिंसाचार सुरू होऊन 78 दिवस झाले आहेत. दोन स्त्रियांना नग्न करून धिंड काढण्यात आली. त्यांच्यावर कथित बलात्कार केल्याच्या भयंकर घटनेला 77 दिवस झाले आहेत. अज्ञात व्यक्तींविरुद्ध एफआयआर दाखल करून 63 दिवस झाले आहेत तरीदेखील या प्रकरणातील दोषी अद्याप फरार आहेत. या गावात चहा पाणी नव्हे तर लाठीने होणार स्वागत, नेमका काय आहे हा प्रकार? धक्कादायक आणि घृणास्पद: अक्षय कुमार “मणिपूरमधील महिलांवरील अत्याचाराचा व्हिडिओ पाहून मी हादरलो आहे. मला आशा आहे की दोषींना इतकी कठोर शिक्षा मिळेल की, जेणेकरून भविष्यात कोणीही पुन्हा असं भयानक कृत्य करण्याचा विचार करणार नाही,” असं ट्विट बॉलिवूड अभिनेता अक्षय कुमारनं केलं आहे. भयंकर प्रकार: स्मृती इराणी “मणिपूरमधील दोन महिलांच्या लैंगिक अत्याचाराचा भयानक व्हिडिओ निषेधार्ह आणि अत्यंत अमानवीय आहे. मुख्यमंत्री @NBirenSingh जी यांच्याशी मी बोलले आहे. या प्रकरणाचा सध्या तपास सुरू आहे आणि पीडितांना न्याय मिळवून देण्यात कोणतीही कसर सोडली जाणार नाही, असं आश्वासन त्यांनी दिलं आहे,” असं ट्विट केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांनी केलं आहे. मणिपूरमध्ये ‘भारता’वर हल्ला होत असताना भारत गप्प बसणार नाही: राहुल गांधी काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी बुधवारी मणिपूरमधील परिस्थितीबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर निशाणा साधला. महिलांचा व्हिडिओ समोर आल्यानंतर ते म्हणाले की, ईशान्येकडील राज्यात ‘भारताच्या एकसंघ संकल्पनेवर हल्ला होत असताना भारत गप्प बसणार नाही’. “पोलिसांनी सांगितलं की, थौबल जिल्ह्यातील नॉन्गपोक सेकमाई पोलीस स्टेशनमध्ये अज्ञात सशस्त्र गुन्हेगारांच्या विरोधात अपहरण, सामूहिक बलात्कार आणि हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पंतप्रधानांचं मौन आणि निष्क्रियतेमुळे मणिपूर अराजकतेकडे जात आहे. मणिपूरमध्ये एकसंघ भारताच्या संकल्पनेवर, देशाच्या एकात्मतेवर हल्ला होत असताना भारत गप्प बसणार नाही,” असं गांधी यांनी ट्विटमध्ये म्हटलं आहे. लज्जास्पद, निंदनीय: अरविंद केजरीवाल दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी बुधवारी वांशिक हिंसाचारग्रस्त मणिपूरमध्ये काढण्यात आलेल्या दोन महिलांच्या विवस्त्र धिंडीचा निषेध केला. पंतप्रधान नरेंद्र मोदींना राज्यातील प्रचलित परिस्थितीकडे लक्ष देण्याचं आणि दोषींवर कठोर कारवाई करण्याचं आवाहन केलं. “मणिपूरमधील घटना अत्यंत लज्जास्पद आणि निषेधार्ह आहे. भारतीय समाजात अशा प्रकारचं घृणास्पद कृत्य सहन केले जाऊ शकत नाही,” असं आम आदमी पक्षाचे (आप) राष्ट्रीय संयोजक आणि दिल्लीचे मुख्यमंत्री असलेल्या केजरीवाल यांनी हिंदी ट्विटमध्ये म्हटलं आहे. ‘क्राइम अगेन्स्ट ह्युमॅनिटी’: मणिपूरचे मुख्यमंत्री 4 मे रोजी पुरुषांच्या एका गटानं कथितरित्या दोन महिलांची नग्नावस्थेत धिंड काढल्याच्या व्हिडिओवर बुधवारी मणिपूरचे मुख्यमंत्री एन. बिरेन सिंग यांनी प्रतिक्रिया दिली. त्यांनी या प्रकरणातील सहभागींना फाशीची शिक्षा देण्याचं आश्वासन दिलं. CNN-News18 शी बोलताना ते म्हणाले, “हा मानवतेविरुद्धचा गुन्हा आहे. जर तो खरा ठरला, तर राज्य सरकार दोषींना पकडण्यात आणि त्यांना फाशीची शिक्षा देण्यात कोणतीही कसर सोडणार नाही. हा एक घृणास्पद गुन्हा आहे आणि मी त्याचा तीव्र निषेध करतो.” तृणमूल काँग्रेस मणिपूरचा मुद्दा संसदेत मांडणार संसदेच्या अधिवेशनादरम्यान मणिपूरमधील वांशिक कलहाचा मुद्दा संसदेत मांडणार असल्याची घोषणा बुधवारी , तृणमूल काँग्रेसनं केली. ईशान्येकडील राज्यातील पुरुषांच्या गटानं दोन स्त्रियांवर कथित लैंगिक अत्याचार आणि सार्वजनिक अपमान केल्याच्या दुःखद घटनेचा पक्षानं तीव्र निषेध केला. पाच टीएमसी खासदारांच्या शिष्टमंडळानं, हिंसाचारानं सर्वात प्रभावित झालेल्या जिल्ह्यांपैकी एक असलेल्या चुराचंदपूर आणि इम्फाळ व्हॅलीला भेट दिली. तिथे त्यांनी प्रत्येकी दोन मदत शिबिरांची पाहणी केली. या नेत्यांनी राजभवनात जाऊन राज्यपाल अनुसुया उकिये यांचीही भेट घेतली. टीएमसीचे लोकसभा खासदार कल्याण बॅनर्जी यांनी पत्रकारांशी संवाद साधला आणि भेटीदरम्यान अनुभवलेल्या लोकांच्या वेदना आणि दुःख सर्वांसमोर मांडलं. व्हॅलीमध्ये आणि खोऱ्यातील मदत शिबिरांना मिळणारी मदत सामग्री अपुरी असल्याचं त्यांनी सांगितलं. मदत शिबिरांना पुरेशा मदतीची तातडीची गरज आहे, यावर त्यांनी भर दिला.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.