इम्फाल, 14 नोव्हेंबर: मणिपूरमध्ये (Manipur Attack) शनिवारी (13 नोव्हेंबर) एक हृदयाद्रावक घटना घडली. आसाम रायफल्सचे (Assam Rifles) कमांडिंग ऑफिसर विप्लव त्रिपाठी यांच्या ताफ्यावर अतिरेकी हल्ला झाला. या हल्ल्यात भारताचं खूप मोठं नुकसान झालंय. कर्नल विप्लम त्रिपाठी यांच्यासह सात जणांचा दुर्देवी मृत्यू झाला आहे. यामध्ये आसाम रायफल्सचे जवान सुमन स्वारगिरी (Suman Swargiay) यांचा देखील समावेश आहे. स्वारगिरी यांच्या निधनाची बातमी त्यांच्या कुटुंबियांना देण्यात आलीय. या दुखद घटनेमुळे त्यांच्या कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. स्वारगिरी पुढच्या महिन्यात आपल्या घरी येणार होते. त्यांच्या मुलाचा डिसेंबर महिन्यात तिसरा वाढदिवस होता. पण त्यांचा अशाप्रकारे करुण अंत झाल्याने कुटुंबासह नातेवाईकांमध्ये शोककळा पसरली आहे. हल्ल्याच्या घटनेच्या एक तास आधीच स्वारगिरी यांची त्यांच्या पत्नीसोबत फोनवर बातचित झाली होती. या घटनेमुळे स्वारगिरी यांची पत्नी पूर्णपणे खचली आहे. तिचा आक्रोश पाहून संपूर्ण गाव हळहळतंय. ‘मुलाच्या वाढदिवसाला घरी येणार होते’ शहीद सुमन स्वारगिरी यांचं कुटुंब आसामच्या बक्सा जिल्ह्यातील थेकेराकुची येथे वास्तव्यास आहे. त्यांना हल्ल्याबाबतची माहिती आज (11 नोव्हेंबर) सकाळी मिळाली. संबंधित घटनेची माहिती मिळाल्यानंतर त्यांच्या घरात मोठी खळबळ उडाली. घरातील कर्त्या पुरुषाच्या निधनाची बातमी ऐकल्यानंतर कुटुंबियांनी आक्रोश सुरु केला. सुमन यांच्या निधनाची बातमी वाऱ्यासारखी पंचक्रोशीत पसरली. स्थानिक माध्यमकर्मी सुमन यांच्या घरी दाखल झाले. यावेळी काही माध्यमकर्मींनी सुमन यांच्या पत्नी जुरी यांच्याशी बातचित करण्याचा प्रयत्न केला. जुरी यांनी सांगितलं की, सुमन 8 जुलैला घरी आले होते. त्यावेळी ते काही दिवस थांबले आणि परत 15 जुलैला आपलं कर्तव्य बजावण्यासठी निघून गेले. तसेच सुमन यांनी काही तासांपूर्वीचं आपल्याशी फोनवर बातचित केली होती. त्यावेळी त्यांनी मुलाच्या वाढदिवसासाठी सुरु असलेल्या लगबगीबाबत विचारपूस केली होती. तसेच घरातील सर्वांच्या तब्येतीची चौकशी केली होती, अशी माहिती जुरी यांनी दिली. हेही वाचा- ट्रॅक्टरच्या धडकेत वाचले पण ट्रकनं चिरडलं; जीवलग मित्रांचा रस्त्यावरच तडफडून गेला प्राण जुरी नेमकं काय म्हणाली? “मी त्यांना सांगितलं होतं की डिसेंबर महिन्यात तुम्ही जेव्हा घरी याल तेव्हा तुमच्याशी मनसोक्त गप्पा मारेन. मुलाच्या तिसऱ्या वाढदिवसाच्या निमित्ताने घरी येईन, असं त्यांनी मला वचन दिलं होतं. पण त्यानंतर फोन कट झाला. त्यांनी सांगितलेलं की, ड्यूटीहून कॅम्पसकडे परततोय, नंतर बोलेन. पण त्यानंतर त्यांचा फोनच आला नाही. जेव्हा फोन आला तेव्हा समजलं की, सुमन हे जखमी झाले आहेत. त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरु आहेत”, असं म्हणत जुरी यांनी हंबरडा फोडला. हेही वाचा- नागपुरातील महिलेची मध्य प्रदेशात विक्री; 16 महिन्यांनी भयावह अवस्थेत आढळली पीडित सुमन 2011 सालापासून सैन्यात कार्यरत शहीद जवान सुमन स्वारगिरी हे 2011 साली सैन्यात भरती झाले होते. त्याआधी चार वर्षांपूर्वी काही समाजकंटकांनी त्यांच्या पित्याची घरात घुसून गोळी झाडून हत्या केली होती. ते स्थानिक पीस पार्टीचे सदस्य होते. पित्याच्या निधनानंतर सुमनच कुटुंबाचे कर्ताधर्ता होते. पण त्यांचा अतिरेकी हल्ल्यात मृत्यू झाल्याने कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.