भोपाळ, 12 फेब्रुवारी : शेतात जाण्यासाठी हेलिकॉप्टर हवं आहे. हेलिकॉप्टर (Helicopter) खरेदीसाठी लोन आणि ते चालवण्यासाठी लायसन्स द्या, अशी मागणी एका शेतकरी (Farmer) महिलेनं थेट राष्ट्रपतींना (President) केली आहे. या महिलेला हेलिकॉप्टर हे हौस म्हणून नको आहे. त्यांनी राष्ट्रपतींना केलेल्या मागणीला त्यांच्या संघर्षाची आणि सरकारी दरबारी झालेल्या उपेक्षांची दुखती किनार आहे.
काय आहे प्रकरण?
मध्य प्रदेशातील (Madhya Pradesh) मंदासौर (Mandsaur) जिल्ह्यातील बसंती बाई लोहार या शेतकरी महिलेनं हे पत्र राष्ट्रपतींना लिहलं आहे. त्यांनी थेट राष्ट्रपतींना पत्र लिहण्याचं कारण म्हणजे त्यांचा शेतात जाण्याचा रस्ता काही गावगुंडांनी बंद केला आहे. हा रस्ता सुरु व्हावा म्हणून त्यांनी सरकार दरबारी अनेकदा खेटे घातले. मात्र त्यांच्या मागणीची कुणीही दखल घेतली नाही. त्यामुळे त्यांनी अखेर शेवटचा उपाय म्हणून थेट राष्ट्रपतींना पत्र लिहिले आहे.
काय आहे पत्राचा मजकूर?
बसंती बाई यांनी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांना लिहलेल्या पत्रात आपली व्यथा मांडली आहे. या पत्रात त्या म्हणतात “माझी 0.41 हेक्टर जमीन आहे. त्या छोट्या जमिनीची संसाराचा गाडा हाकण्यासाठी मला मदत होते. मात्र गेल्या अनेक दिवसांपासून या शेतामध्ये जाण्याचा रस्ता गावातील गुंड परमानंद पाटीदार आणि त्यांचा मुलगा लवकुश पाटीदार यांनी बंद केला आहे. शेतामध्ये जाणारा रस्त्यावर खड्डा खोदला आहे. त्यामुळे शेतामध्ये जाणं अवघड झालं आहे. मी शेती देखील करु शकत नाही. शेतामध्ये जाणारा रस्ता तयार करा या मागणीसाठी मी अनेक कार्यालायात हेलपाटे घातले. तिथं कुणीही माझी तक्रार ऐकली नाही. कृपया मला हेलिकॉप्टर खरेदी करण्यासाठी कर्ज द्यावं. तसंच ते चालवण्यासाठी लायसन्स उपलब्ध करुन द्यावं. ज्यामुळे मी माझ्या शेतामध्ये जाऊ शकेल.
जिल्हाधिकारी काय म्हणतात?
राष्ट्रपतींना लिहिलेल्या पत्रावर जिल्हाधिकारी मनोज पुष्प यांना विचारले असता त्यांनी हे प्रकरण एसडीओ आणि तहसीलदाराकडं सोपवलं असल्याचं सांगितलं आहे. शेतामध्ये जाणारा एक रस्ता दुसऱ्या बाजूनं असून दुसऱ्या रस्त्याचा वाद सुरु आहे, त्यावर लवकरच तोडगा काढण्यात येईल असं त्यांनी स्पष्ट केले.
नायब तहसीलदाराला नोटीस
News 18 ने शेतकरी महिलेची व्यथा दाखवताच प्रशासनाला जाग आली आहे. या प्रकरणात नायब तहसीलदार सविता राठोड यांना कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली आहे. राठोड यांना घटनास्थळी जावून अहवाल सादर करण्याचा आदेश प्रशासनानं दिला आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Agriculture, Farmer, Letter to president, Madhya pradesh, President ramnath kovind