हे आहेत देशातले सर्वांत धक्कादायक 9 निकाल; या दिग्गजांना बसला दणका

हे आहेत देशातले सर्वांत धक्कादायक 9 निकाल; या दिग्गजांना बसला दणका

या निवडणुकीतले काही निकाल ऐतिहासिक आणि काही धक्कादायक ठरणारे आहेत. देशभरातले हे आहेत 9 मोठे पराभव.

  • Share this:

मुंबई, 23  मे : लोकसभा निवडणूक 2019 चा ऐतिहासिक निकाल अंतिम टप्प्यात आला आहे. निवडणूक आयोगातर्फे अद्याप अधिकृतपणे निकाल जाहीर झालेला नसला, तरी निकालाचा कल स्पष्ट झाला आहे आणि मोदी लाट नव्हे तर त्सुनामी असल्याप्रमाणे भाजपच्या पारड्यात ऐतिहासिक यश पडलं आहे. या निवडणुकीतले काही निकाल ऐतिहासिक आणि काही धक्कादायक ठरणारे आहेत. महाराष्ट्रात काँग्रेसला एकही जागा मिळवणं शक्य झालेलं नाही. हा एक मोठा धक्का. त्याचप्रमाणे या निवडणुकीत काही मोठ्या नेत्यांना पराभव पचवावा लागणार असं चित्र आहे.

राहुल गांधी - अमेठी (उत्तर प्रदेश)

काँग्रेसचा बालेकिल्ला असलेल्या अमेठीमधून काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी पिछाडीवर आहेत.


काँग्रेसचा बालेकिल्ला असलेल्या अमेठीमधून काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी पिछाडीवर आहेत. काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी उत्तर प्रदेशातल्या त्यांच्या परंपरागत मतदारसंघातून पराभवाच्या मार्गावर आहेत. भाजपच्या स्मृती इराणी यांना या मतदारसंघात आघाडी मिळाली आहे. इराणींची मतआघाडी थोडी असली, तरी हा देशातला सर्वांत धक्कादायक निकाल ठरण्याच्या मार्गावर आहे.

अशोक चव्हाण - नांदेड (महाराष्ट्र)

अशोक चव्हाण हे महाराष्ट्र काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष स्वतः नांदेडमधून पराभावच्या मार्गावर आहेत. महाराष्ट्रात काँग्रेसची एकही जागा निघाली नाही आणि पराभवाचं खापर चव्हाण यांच्यावरच फुटण्याची चिन्हं आहेत. प्रतापराव पाटील चिखलीकर हे भाजपचे उमेदवार नांदेडमधून विजयी झाले आहेत.

कन्हैय्या कुमार - बेगुसराय (बिहार)

बिहारमधल्या बेगुसरायची निवडणूक कन्हैय्या कुमारच्या उमेदवारीमुळे गाजली. दिल्लीच्या जवाहरलाल नेहरू विद्यापीठातला विद्यार्थी नेता कन्हैय्या कुमार टुकडे टुकडे गँग या भाजपच्या टीकेमुळे चर्चेत आला. कन्हैय्या कुमार यांना सीपीआयने उमेदवारी दिली आणि त्यांच्याविरोधात भाजपने हिंदुत्ववादी चेहऱ्याचे गिरिराज सिंह यांना उभं केलं. गिरिराज सिंह या मतदारसंघात एक लाखांहून अधिक मताधिक्याने आघाडीवर आहेत.

ज्योतिरादित्य शिंदे - गुना  (मध्य प्रदेश)

मध्य प्रदेशात काँग्रेसचा दारुण पराभव झाला. मुख्यमंत्री कमलनाथ यांचा मुलगा नकुल नाथ यांच्याव्यतिरिक्त एकाही नेत्याला विजय मिळवता आला नाही. मोठा फटका बसला ज्योतिरादित्य शिंदे यांना. गुनामध्ये भाजपचे उमेदवार के. पी. यादव यांच्यापेक्षा ते 50,000 मतापेक्षा अधिक मतांन पिछाडीवर आहेत. ज्योतिरादित्य यांच्यावर स्वतःच्या मतदारसंघाव्यतिरिक्त पश्चिम उत्तर प्रदेशाची जबाबदारी होती.

शत्रुघ्न सिन्हा - काँग्रेस (पटनासाहिब)

ऐन निवडणुकीच्या आधी भाजप सोडून काँग्रेसमध्ये प्रवेश केलेले अभिनेते शत्रुघ्न सिन्हा पटनासाहिब मतदारसंघात पिछाडीवर आहेत. त्यांच्याविरोधात भाजपने केंद्रीय मंत्री रविशंकर प्रसाद यांना उमेदवारी दिली होती. पहिल्यांदाच लोकसभेची निवडणूक लढवणारे रविशंकर प्रसाद भाजपचे जुने विश्वासू नेते आहेत.

मल्लिकार्जुन खर्गे - गुलबर्गा (कर्नाटक )

कर्नाटकची ही महत्त्वाची जागा काँग्रेसचे दिग्गज नेते मल्लिकार्जुन खरगे लढवत होते. भाजपने उभे केलेले उमेश जाधव तसे फारसे परिचित नाव नव्हते. तरीही मोठ्या फरकाने जाधव आघाडीवर आहेत.

राज बब्बर - फतेपूर सिक्री  (उत्तर प्रदेश)

उत्तर प्रदेशातली ही महत्त्वाची जागा काँग्रेसकडून राज बब्बर यांच्यासारखा नामांकित चेहरा लढवत होता. पण राजकुमार चहर या भाजप उमेदवाराने राज बब्बर यांचा दणदणीत पराभव केला.

दिग्विजय सिंह  - भोपाळ (मध्य प्रदेश)

भोपाळची लढत प्रथमपासून चर्चेत होती. भाजपने साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांना उमेदवारी दिल्यापासून ही लढत चुरशीची झाली होती. प्रज्ञासिंह ठाकूर यांच्या वादग्रस्त वक्तव्यांनी त्यांच्यावर सर्व बाजूंनी टीका झाली, तरीही त्यांनी या मतदारसंघात काँग्रेसच्या दिग्विजय सिंहांसारख्या तगड्या उमेदवाराविरोधात मोठी आघाडी घेतली.

कविता - निजामाबाद (तेलंगणा)

तेलंगणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांची मुलगी आणि विद्यमान खासदार के. कविता या निजामाबाद मतदारसंघात पिछाडीवर आहेत. भाजपच्या अरविंद धर्मपुरी यांना त्यांच्यापेक्षा  40000 मतं जास्त मतं मिळाली आहेत. केसीआर यांचा हा मोठा धक्का मानला जात आहे.

महाराष्ट्रातही भाजप-शिवसेना युतीने बाकी सर्व आघाड्यांना पुरतं झोपवलं आहे, असं आत्ता हाती आलेले कल सांगतात. निवडणूक आयोगाने जाहीर केलेल्या अधिकृत आकडेवारीनुसार, एकाही जागेवर सध्या काँग्रेस आघाडीवर नाही. राष्ट्रवादीचे 4 उमेदवार आघाडीवर आहेत. तर युती 43 जागांवर आघाडीवर आहे.

निवडणूक आयोगाच्या वेबसाईटवर याची अधिकृत आकडेवारी दिली जात आहे. या आकडेवारीनुसार महाराष्ट्रातल्या 48 पैकी सर्व जागांचे कल जाहीर झाले आहेत. त्यापैकी तब्बल 43 जागांवर युतीचे उमेदवार आघाडीवर आहेत.

निवडणूक आयोगाच्या ताज्या आकडेवारीनुसार 48जागांचे कल असे आहेत

543 जागांसाठी 7 टप्प्यात मतदान झाले होते. पहिल्या टप्प्यात 20 राज्यातील 91 जागांसाठी 11 एप्रिल रोजी, दुसऱ्या टप्प्यात 12 राज्यातील 95 जागांवर 18 एप्रिल रोजी, 23 एप्रिल रोजी 15 राज्यातील 117 मतदारसंघात, चौथ्या टप्प्यात 29 एप्रिल रोजी 9 राज्यातील 71 जागांवर, 6 मे रोजी पाचव्या टप्प्यात 7 राज्यातील 51 मतदारसंघात, सहाव्या टप्प्यात 12 मे रोजी 7 राज्यात 59 जागांवर तर अखेरच्या टप्प्यात 19 मे रोजी 8 राज्यातील 59 मतदारसंघात मतदान झाले होते.

VIDEO : शरद पवारांचा EVM मशीनवरून यू-टर्न, म्हणाले...

First published: May 23, 2019, 4:28 PM IST

ताज्या बातम्या