इंदौर, 21 एप्रिल : मध्य प्रदेशात इंदौर शहर कोरोनाचा हॉटस्पॉट बनलं आहे. शहरामध्ये कोरोनाच्या रुग्णांची संख्येत वाढ होत चालली आहे. सोमवारी आलेल्या आकडेवारीनुसार कोरोनाग्रस्तांची संख्या 900 पेक्षा जास्त झाली आहे. तर मृतांचा आकडा 52 वर पोहोचला आहे. प्रादुर्भाव वाढत असतानाही लोक लॉकडाऊन पाळत नसल्याचं दिसून येत आहे. सकाळच्या वेळेत अनेक संवेदनशील भागामध्ये विनाकारण फिरणाऱ्या नागरिकांना पोलिसांनी लाठीचा प्रसाद दिला. चेकिंग करत असताना नागरिकांकडे आवश्यक कागदपत्र आणि योग्य कारण देत नसतील त्यांच्यावर पोलीस कारवाई करत आहेत. काही ठिकाणी लोकांना पोलिसांनी खाकी वर्दीचा दणकाही दिला. दरम्यान, सराफा टीआयचा एक व्हिडिओ समोर आला आहे. यामध्ये विनाकारण फिरणाऱ्यांना टीआयने अद्दल घडवल्याचं दिसत आहे.
व्हिडिओमध्ये सोबत फिरणाऱ्या दोघांना सराफा टीआय अमृता सोलंकी यांनी वेगळीच शिक्षा दिली. त्यांनी स्वत: संबंधितांना न मारता त्यांनाच एकमेकांना काठीने मारायला सांगितलं. व्हिडिओमध्ये अमृता सोलंकी म्हणतात की, ‘तुम्ही कोणाकडेही माझी तक्रार करा, मार त्याला.. आता समजलं लॉकडाऊनमध्ये बाहेर पडल्यावर कसं वाटतं. जेव्हा पोलिसवाले मरतात तेव्हा आम्हाला कसं वाटतं… डॉक्टर मरतात तेव्हा.. तुम्हाला फिरायचं आहे… मार’ हे वाचा : डॉक्टर दाम्पत्याला सलाम, काळजाच्या तुकड्याला कुलुपबंद करून जावं लागतं रुग्णालयात इंदौरमध्ये परिस्थिती हातळण्यासाठी केंद्रीय दल दाखल झाले आहे. त्यानंतर अधिकाऱ्यांची बैठक झाली आणि त्यात सांगण्यात आलं की, लॉकडाऊनची कडक अंमलबजावणी झाली पाहिजे. त्याशिवाय प्रादुर्भाव रोखता येणार नाही. कोणत्याही प्रकारची सूट द्यायची नाही असे आदेशही देण्यात आले आहेत. हे वाचा : प्रेरणादायी! लॉकडाऊनमध्ये कामाचा सदुपयोग, ‘हा’ वल्ली तयार करतोय कोरोना लायब्ररी संपादन - सूरज यादव