नवी दिल्ली, 25 जुलै : भारतीय नवरी, अमेरिकेचा नवरा किंवा लंडनची नवरी आणि आफ्रिकेचा नवरा, अशा अनेक प्रेमकथा आपण आजपर्यंत पाहिल्या आहेत. प्रेमात लोक आपला देशही सोडून जाऊ शकतात हे काही नवं नाही. अनेक जोडपे असेही असतात जे दोघंही एकाच देशातील असूनसुद्धा उत्तम भविष्यासाठी एखाद्या विकसित देशात संसार थाटणं पसंत करतात. अशा सर्वप्रकारच्या प्रेमकथांना मागे टाकून सध्या गाजतेय ती सीमा-सचिनची अनोखी लव्हस्टोरी. सीमानंतर आता प्रियकरासाठी भारत सोडून पाकिस्तानात गेलेली अंजूदेखील चर्चेत आहे. परिणामी, अशा प्रकरणांमध्ये लोकांचा रस वाढला आहे. लोक अशा खळबळ माजवणाऱ्या आणखी प्रेमकथा आहेत का, याचा शोध गुगलवर घेऊ लागले आहेत. त्यामुळे आज आपण सीमा-सचिन आणि अंजूसह आणखी एक रोमांचक प्रेमकथा जाणून घेणार आहोत.
प्रियकरासाठी आपला देश सोडून जाणाऱ्यांच्या यादीत सध्याच्या घडीला पहिल्या क्रमांकावर आहे ती सीमा गुलाम हैदर. पाकिस्तानी सीमा आपल्या नवऱ्याला सोडून चार मुलांना घेऊन भारतात प्रियकराला भेटायला आली. तिने नोएडात राहणाऱ्या सचिन मीणा या तरुणाशी लग्न केलं. पबजी खेळातून दोघांची ओळख झाली होती. दोघांनी एकमेकांना नंबर दिला होता. मग हॉट्सअॅपवर ते बोलू लागले आणि हळूहळू प्रेमात पडले. सीमाने सचिनला पाकिस्तानात भेटायला बोलवलं. मात्र सचिन पाकिस्तानात गेला नाही, मग सीमा स्वतः भारतात यायला तयार झाली. सीमा आणि सचिनची पहिली भेट यावर्षी मार्च महिन्यात नेपाळची राजधानी असलेल्या काठमांडूत झाली. त्यानंतर मे महिन्यात सीमा आपल्या चार मुलांना घेऊन पाकिस्तानातून दुबईमार्गे विमानाने काठमांडूत दाखल झाली. तिथून ती सचिनसोबत बसने ग्रेटर नोएडात आली. दोघांनी नेपाळच्या पशुपतीनाथ मंदिरात लग्न केल्याचा दावा केला आहे. सचिन फक्त एक मोहरा? सीमाचा उद्देश वेगळाच? वाचा महत्त्वाची अपडेट
प्रेमासाठी भारतात आली पोलंडची मड्डम
पोलंडची 45 वर्षीय बारबरा पोलाक ही महिला तिचा प्रियकर शादाब मलिक याला भेटायला भारतात आली. आनिया पोला या आपल्या पाच वर्षीय मुलीला घेऊन तिने झारखंडची हजारीबाग गाठली. बारबरा आणि शादाब 2021 साली इंस्टाग्रामवरून एकमेकांच्या प्रेमात पडले होते. याच प्रेमातून दोघं अनेकदा मुंबईत भेटायचे. मात्र 26 जून, 2023 रोजी बारबरा थेट संसार थाटण्यासाठीच मुंबईमार्गे हजारीबागेत आली आहे.
भारतीय अंजू पाकिस्तानात गेली
पाकिस्तानातून सीमा जशी भारतात आली, तशीच भारतातून अंजू नामक तरुणी तिच्या प्रियकराला भेटायला पाकिस्तानात गेली आहे. ती खैबर-पख्तुनख्वात दाखल झाल्याचं कळतं आहे. दोघांमध्ये जवळपास 4 वर्षांपूर्वी फेसबूकवरून मैत्री झाली होती. मिळालेल्या माहितीनुसार, 34 वर्षीय अंजूचं लग्न झालेलं आहे. मात्र तिचा पाकिस्तानात एक मित्र आहे, याची साधी कुणकुणही तिच्या नवऱ्याला कधी लागली नाही. ती राजस्थानच्या अलवर जिल्ह्यातील भिवाडीची रहिवासी आहे. अंजू एका महिन्याच्या ट्यूरिस्ट व्हिसावर प्रियकराला भेटायला पाकिस्तानात गेली आहे. सीमासह आता तीदेखील मोठ्या चर्चेत आलीये.