तिरुवनंतपुरम, 11 जुलै: देशातील कोरोना रुग्णांच्या (covid-19) संख्येत केरळचा (Kerala) क्रमांक वरचा आहे. कोरोनाचा धोका अजूनही कायम आहे. त्यातच राज्यात आणखी एका व्हायरसचा धोका निर्माण झाला आहे. केरळमध्ये आत्तापर्यंत झिका व्हायरसचे (Zika virus) 15 पेशंट्स सापडले आहेत. नाथनकोडमधील एका 40 वर्षाच्या महिलेला झिका व्हायरसची लागण झाल्याची माहिती केरळच्या आरोग्यमंत्री वीणा जॉर्ज (Veena George) यांनी दिली आहे. या परिस्थितीवर आम्ही संपूर्ण लक्ष ठेवून असल्याचं त्यांनी सांगितले. एकूण 27 जणांचे नमुने तपासणीसाठी प्रयोगशाळेत पाठवण्यात आले आहेत, अशी माहिती त्यांनी दिली. दरम्यान केरळचे मुख्यमंत्री पिनरायी विजयन (Pinarayi Vijayan) यांनी झिका व्हायरस राज्यात पसरणार नाही, असा दावा केला आहे. या व्हायरसचा सामना करण्यासाठी सर्व जिल्ह्यांमधील आरोग्य सेवा यंत्रणा सज्ज असल्याचं त्यांनी सांगितलं. झिका व्हायरसचा इतिहास जागतिक आरोग्य संघटनेनं दिलेल्या माहितीनुसार झिका व्हायरसचा प्रादुर्भाव हा डासांपासून होतो. युगांडामध्ये 1947 साली पहिल्यांदा झिका व्हायरस हा माकडांच्या शरीरात आढळून आल्याची नोंद करण्यात आली होती. त्यानंतर 1952 साली हा व्हायरस माणसांच्या शरीरात आला. आतापर्यंत अफ्रिका, अमेरिका आणि आशिया खंडात या व्हायरसची माणसांना लागण झाल्याच्या घटना घडल्या आहेत. महिलेला एकाच वेळी कोरोनाच्या 2 व्हेरिएंटची लागण; 5 दिवसात जे घडलं त्यानं शास्त्रज्ञही हादरले काय आहेत लक्षण? ताप, अंगावर पुरळ उठणं, अंगदुखी, सांधेदुखी आणि डोकेदुखी ही झिका व्हायरसची लक्षणं आहेत. यातील अनेक लक्षणं ही कोरोनाचीदेखील आहेत. केरळमधील रुग्णांना ही लक्षणं दिसू लागल्यानंतर त्यांची कोरोना चाचणी करण्यात आली होती. पण त्यांना कोरोना नसल्याचं दिसून आल्यानंतर वेगळी चाचणी कऱण्यात आली. त्यातून त्यांना ‘झिका’ची लागण झाल्याचं दिसून आलं. हा आजार जीवघेणा नसला तरी त्याचं लवकर निदान होऊन उपचार सुरू होणं गरजेचं असल्याचं डॉक्टर सांगतात.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

)







