सोनिया मिश्रा, प्रतिनिधी रुद्रप्रयाग, 21 जून : उत्तराखंडतील प्रसिद्ध अशा केदारनाथ मंदिराच्या गाभाऱ्यात सोन्याऐवजी पितळी मुलामा देण्यात आल्याचा आरोप करण्यात आला आहे. काही दिवसांपासून हा वाद चांगलाच तापलाय. याबाबत आता कुठे वातावरण शांत होतंय तर, आणखी एका प्रकरणावरून मंदिरात खळबळ उडाली आहे. भाविकांनी मंदिर समितीला चांगलंच धारेवर धरलंय. सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल झाला असून या व्हिडिओमध्ये एक महिला चक्क मंदिराच्या गाभाऱ्यात शिवलिंगावर नोटा उधळताना दिसतेय. पांढऱ्या साडीतल्या या महिलेच्या कृत्यावर नेटकऱ्यांनी संतप्त प्रतिक्रिया दिल्या असून तिच्यावर कडक कारवाई करण्याची मागणी केली आहे. विशेष म्हणजे ही महिला शिवलिंगावर पैसे उडवताना पुजारीदेखील तिथे उपस्थित होते. ते गाभाऱ्यात पूजा करत होते, मात्र त्यांनी या महिलेला असं करण्यापासून थांबवलं नाही. दरम्यान, ही महिला किन्नर असल्याचं समोर आलं आहे. तिचं नाव निशा असून तिने शिवलिंगावर तब्बल 10 लाख रुपये उडवल्याचं बोललं जात आहे.
रुद्रप्रयागच्या पोलीस अधीक्षक विशाखा अशोक भदाणे यांनी याबाबत सांगितलं, ‘घडलेल्या प्रकारामुळे देश-विदेशातील भाविकांच्या भावना दुखावल्या गेल्या आहेत. याप्रकरणी तक्रार दाखल करण्यात आली असून तपास करण्यात येईल. त्यानंतर कारवाई केली जाईल.’ तर, बद्रीनाथ-केदारनाथ मंदिर समितीकडूनही याप्रकरणी तीव्र प्रतिक्रिया आली असून अध्यक्ष अजेंद्र अजय यांनी यासंदर्भात रुद्रप्रयागचे जिल्हाधिकारी आणि पोलिसांशी चर्चा करून प्रकरणाची सखोल चौकशी आणि कारवाई करण्याची मागणी केली आहे. International Yoga Day 2023: योग विद्येचा जन्म कसा झाला? योगाचे जनक कोण? योगाचा प्रचार-प्रसार कोणी केला दरम्यान, निशा यांनी ‘न्यूज18’शी बोलताना सांगितलं की, ‘बाबांचा आदेश होता म्हणून मी माझ्या आयुष्याची पूर्ण कमाई त्यांच्या मंदिरात अर्पण केली. असं करणं चूक आहे, याची मला कल्पनाही नव्हती. शिवाय मला त्यावेळी कोणी थांबवलंसुद्धा नाही. मी जाणूनबुजून कोणाच्याच भावना दुखवलेल्या नाहीत. मात्र जर असं झालं असेल, तर मी माफी मागते.’