बंगळुरू, 12 फेब्रुवारी : एखाद्या व्यक्तीला रोजच्या जगण्याची भ्रांत असेल आणि कमाईचे सर्व मार्ग थांबले किंवा संपले असतील तर त्याला काय करावं लागू शकतं याचं दुर्दैवी उदाहण एका बस कंडक्टरच्या (Bus Conductor) बाबतीत घडलं आहे. 38 वर्षांच्या या कंडक्टरनं फेसबुकवरुन (Facebook) चक्क स्वत:ची किडनी (Kidney) विकण्याचा प्रस्ताव ठेवला आहे. कर्नाटक सरकारच्या राज्य परिवहन सेवेतील (KSRTC) हा दुर्दैवी बस कंडक्टर असून हनुमंत कालगेर असं त्यांचं नाव आहे. मासिक वेतनामध्ये कपात होत असल्यानं जगण्यासाठी आवश्यक असलेला रोजचा खर्च करणं देखील त्यांना अवघड होत असल्यानं त्यांनी अखेर किडनी विक्रीचा प्रस्ताव फेसबुकच्या माध्यमातून जगासमोर ठेवला आहे.
(वाचा : ‘ शेतात जाण्यासाठी हेलिकॉप्टर हवं, लोन आणि लायसन्स द्या’ शेतकरी महिलेचं राष्ट्रपतींना पत्र )
काय आहे फेसबुक पोस्ट? ‘मी एक परिवहन कर्मचारी आहे. माझ्याकडं घरभाडे देण्यासाठी आणि किराना भरण्यासाठी पैसे नाहीत. त्यामुळे मी किडनी विकायला तयार आहे,’ अशी फेसबुक पोस्ट हनुमंत यांनी लिहली असून त्यासोबत त्यांचा फोन नंबर देखील दिला आहे. हनुमंत हे उत्तर-पूर्व कर्नाटक रस्ते वाहतूक कॉर्पोरेशनच्या गंगावती डेपोमध्ये कंडक्टर आहेत. घर भाडे, किराना सामान, मुलांचं शिक्षण आणि आई-वडिलांची औषध या सर्व खर्चांसाठी मासिक पगार हाच आपला एकमेव आधार असल्याचं ते सांगतात. त्याचबरोबर चौथीत शिकणाऱ्या आपल्या मुलाला त्यानं आजी आजोबांच्या घरी शिक्षणासाठी पाठवून दिलं आहे. अखेर प्रशासनाला जाग कर्नाटक परिवहन सेवेत गेल्या 20 वर्षांपासून काम करत असलेल्या हनुमंत यांची ही फेसबुक पोस्ट चांगलीच व्हायरल झाली. कोप्पल विभागाचे कंट्रोलर एस.ए. मुल्ला यांच्यापर्यंत ही पोस्ट गेली. त्यानंतर त्यांनी तातडीनं याची दखल घेतली. त्यांनी हनुमंत आणि त्यांच्या कुटुंबीयांना भेटून तातडीनं मदत करण्याचं आश्वासन दिलं आहे. त्याचबरोबर हनुमंत आणि त्याच्या सर्व सहकाऱ्यांचे थकित वेतन लवकरच दिले जाईल असं आश्वासनही मुल्ला यांनी दिलं आहे.