नवी दिल्ली, 19 मे : कोरोनाव्हायरसचं संक्रमण रोखण्यासाठी देशातील लॉकडाऊन 31 मेपर्यंत वाढवण्यात आला आहे. चौथ्या लॉकडाऊनमध्ये लग्न सोहळ्यांना (wedding) काही अटींनुसार परवानगी देण्यात आली. यामध्ये मास्क घालणं बंधनकारक आहे. त्यामुळे आता कोरोना लॉकडाऊनमधील या लग्नसोहळ्यात (marriage) वधू--वरांसाठी खास चांदीचा फेस मास्क (Silver face mask) तयार करण्यात आला आहे.
महाराष्ट्र आणि कर्नाटकाच्या सीमेवरील बेळगावात राहणारे सोनार संदीप सागाओंकर यांनी हा चांदीचा मास्क बनवणं सुरू केलं आहे. खरंतर लॉकडाऊनमुळे त्यांचा व्यापार ठप्प झाला होता. त्यात मास्कची गरज पाहून त्यांनी त्या दिशेनं आपला व्यापार पुन्हा सुरू केला. लॉकडाऊनमध्ये होत असेल्या लग्नांसाठी त्यांनी चांदीचा फेस मास्क तयार केला आहे.
हे वाचा - गाणी ऐकून बरे होणार कोरोना रुग्ण; 'या' रुग्णालयाने सुरू केले उपचार
संदीप म्हणाले, "कोरोनाच्या महासाथीमुळे इतर व्यापारांप्रमाणे माझ्या व्यापारावरही परिणाम झाला. त्यानंतर मी चांदीचा फेस मास्क बनवण्यातचा विचार केला आणि हा व्यापार सुरू केला"
संदीप यांनी सांगितल्यानुसार, एका चांदीच्या फेस मास्कचं वजन 25 ते 35 ग्राम आहे. याची किंमत 2500 ते 3500 रुपयांपर्यंत आहे. हा मास्क N95 मास्कप्रमाणे आहे. खरेदीसाठी काही दिवस आधी ऑर्डर द्यावी लागते.
संदीप यांच्यानंतर असे इतर स्थानिक सोनारही असे मास्क तयार करू लागलेत. सोन्याचे भाव वाढल्यानं चांदीची मागणी वाढली आहे.
"या चांदीच्या मास्कला मोठ्या प्रमाणात मागणी आहे. कित्येक लोक लग्नात गिफ्ट म्हणूनदेखील हा मास्क खरेदी करत आहेत. मी आतापर्यंत एका आठवड्यात जवळपास 100 पेक्षा अधिक मास्क विकले आणि अजूनही ऑर्डर येत आहेत", असं संदीप यांनी सांगितलं.
हे वाचा - कोरोना व्हायरसला रोखणारं औषध सापडलं, चीनच्या लॅबोरेटरीचा दावा
लॉकडाऊन 4 मध्ये गृह मंत्रालयाने लग्न समारंभाला परवानगी दिली आहे. मात्र या सोहळ्यात 50 पेक्षा जास्त लोकांना उपस्थित राहता येणार नाही. लग्न सोहळ्यामध्ये सोशल डिस्टन्सिंगचे पालन करणे बंधनकारक आहे.
याआधीच्या लॉकडाऊनमध्ये लग्न सोहळ्यांना परवानगी नव्हती. त्यावेळी अनेकांनी घरच्या घरी लग्न केलं. त्यावेळी वधू आणि वराने आपल्या चेहऱ्यावर मास्क लावून लग्न केल्याचं आपण पाहिलं आहे.
संपादन - प्रिया लाड