नवी दिल्ली, 8 जुलै : देशात कोरोनाची दुसरी लाट (Second wave) ओसरत असताना आणि भविष्यातील तिसऱ्या लाटेची भीती व्यक्त होत असताना यावरून होणारे वाद मात्र थांबण्याची चिन्हं दिसत नाहीत. काढा (Kadha) प्यायल्यामुळे देशातील कोरोना रुग्णांची संख्या आटोक्यात आल्याची प्रतिक्रिया नवे आयुष राज्यमंत्री मुंजापारा महेंद्रभाई (Munjapara Mahendrabhai) यांनी दिली आहे. देशात ऍलोपथी डॉक्टरांवर टीका करणाऱ्या रामदेव बाबांच्या वक्तव्यावरून उठलेलं वादळ खाली बसतं न बसतं तोच एक नवा वाद यामुळं उभा राहण्याची चिन्हं आहेत.
PM Modi has taught me one thing - face any crisis. There was a sizeable reduction of COVID patients due to 'kadha'. Homeopathy, Modi's yoga have a big role in saving patients from COVID. Opposition members take medicines from me: Munjapara Mahendrabhai, MoS, Ministry of AYUSH. pic.twitter.com/ALlS1yUOUI
— ANI (@ANI) July 8, 2021
काय म्हणाले मुंजापारा महेंद्रभाई
मुंजापारा महेंद्रभाई यांना मंत्रिमंडळ विस्तारात स्थान देण्यात आलं असून आयुष मंत्रालयाचं राज्यमंत्रीपद त्यांच्याकडं सोपवण्यात आलं आहे. याशिवाय महिला आणि बालकल्याण विभागाचं राज्यमंत्रीपदही त्यांना देण्यात आलं आहे. पदग्रहण केल्यानंतर माध्यमांशी बोलताना महेंद्रभाई यांनी कोरोनाची दुसरी लाट आटोक्यात येण्याचं श्रेय काढा आणि मोदींचा योगा याला दिलं आहे. पंतप्रधान नरेद्र मोदींनी आपल्याला कुठल्याही परिस्थितीला कसं सामोरं जायचं, ते शिकवलं. काढ्यामुळे देशात कोरोनाची लाट आटोक्यात आली असून त्याचं श्रेय होमिओपथीला द्यायला हवं,असं ते म्हणाले. योगामुळे कोरोनापासून रुग्णांचा बचाव झाला, असंही ते म्हणाले. विरोधकदेखील आपल्याकडून औषधं घेतात, असं सांगत त्यांनी एकच खळबळ उडवून दिली.
हे वाचा -शाळेची पहिली घंटा ! वाचा कोणकोणत्या राज्यात कशी आहे शाळेची परिस्थिती
पुन्हा वादाच्या दिशेने
ऍलोपथी हे विज्ञान नसल्याची टीका काही दिवसांपूर्वी बाबा रामदेव यांनी केल्यानंतर देशात वाद निर्माण झाला होता. स्वतः बाबा रामदेव हे आयुर्वेदिक डॉक्टरही नसताना कुठल्या अधिकारानं ते बोलतात, असा सवाल इंडियन मेडिकल असोसिएशननं उपस्थित केला होता. भारतात तिन्ही वैद्यकीय शाखा गुण्यागोविंदानं आपापलं काम करत असताना बाबा रामदेवांच्या वक्तव्यामुळं नाहक वादाला तोंड फुटत असल्याची टीका त्यांच्यावर झाली होती. त्यानंतर बाबा रामदेवांनी आपलं वक्तव्य मागे घेत डॉक्टर हेच ईश्वराचा अवतार असल्याचं सांगत आपण स्वतः कोरोनाची लस टोचून घेणार असल्याची घोषणा केली होती. त्यानंतर आता आयुष राज्यमंत्री मुंजापारा महेंद्रभाई यांच्या वक्तव्यामुळे नव्या वादाला तोंड फुटण्याची शक्यता आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Coronavirus, Union cabinet, Yoga