मराठी बातम्या /बातम्या /देश /क्या बात है! लवकरच उभारली जाणार 'साई युनिव्हर्सिटी'; साई ट्रस्टला आपल्या संपत्तीचा 85 टक्के हिस्सा देणारे के. व्ही. रामाणी करणार निर्माण

क्या बात है! लवकरच उभारली जाणार 'साई युनिव्हर्सिटी'; साई ट्रस्टला आपल्या संपत्तीचा 85 टक्के हिस्सा देणारे के. व्ही. रामाणी करणार निर्माण

देशभरातल्या जवळपास 450 साई मंदिरांना ट्रस्टतर्फे निधी देण्यात आला आहे.

देशभरातल्या जवळपास 450 साई मंदिरांना ट्रस्टतर्फे निधी देण्यात आला आहे.

देशभरातल्या जवळपास 450 साई मंदिरांना ट्रस्टतर्फे निधी देण्यात आला आहे.

  आपल्या देशात अनेक दिग्गज उद्योजक त्यांच्या दातृत्वासाठी प्रसिद्ध आहेत. समाजाप्रति आपले काही तरी कर्तव्य आहे, याची जाणीव ठेवून आपली संपत्ती फक्त कुटुंबासाठी राखून न ठेवता त्यातला जास्तीत जास्त हिस्सा समाजाला देण्याची परोपकारी प्रवृत्ती सरसकट आढळत नाही. फार कमी जण या वृत्तीचा अंगीकार करून आपली बहुतांश संपत्ती समाजाच्या कल्याणासाठी, देशाच्या जडणघडणीसाठी काही तरी मोलाचे काम करण्यासाठी वापरतात. यासाठी फिलाँथ्रॉपी हा शब्द आता प्रचलित झाला आहे. अमेरिकेतील मायक्रोसॉफ्टचे अध्यक्ष बिल गेट्स (Bill Gates) जगातले एक नामांकित फिलाँथ्रॉपिस्ट (Philanthropist)आहेत. त्याच धर्तीवर आपल्या देशात टाटा उद्योगसमूहाचे मानद अध्यक्ष रतन टाटा, विप्रोचे अझीम प्रेमजी, इन्फोसिसचे नारायण मूर्ती, महिंद्रा समूहाचे आनंद महिंद्रा अशा अनेक व्यक्ती फिलाँथ्रोपिस्ट म्हणून ओळखल्या जातात. याच मांदियाळीत आणखी एक नाव पुढे आलं आहे, ते म्हणजे सॉफ्टवेअर उद्योजक (Entrepreneur) के. व्ही. रामाणी (K.V. Ramani).

  देशातल्या सॉफ्टवेअर उद्योगातली शिखर संघटना असलेल्या नॅसकॉमचे (Nasscom) सह-संस्थापक आणि सॉफ्टवेअर उद्योजक के. व्ही. रामाणी 2004 मध्ये फ्युचर सॉफ्टवेअर आणि ह्यूजेस सॉफ्टवेअर या आपल्या व्यवसायातून बाहेर पडले, तेव्हा त्यांनी एक जगावेगळी कृती केली. रामाणी यांनी आपल्या संपत्तीतला 12 टक्के हिस्सा कुटुंबासाठी ठेवला आणि 85 टक्क्यांहून अधिक रक्कम त्यांनी स्थापन केलेल्या श्री साई ट्रस्टमध्ये (Shree Sai Trust) ठेवली. त्या वेळी या निधीची किंमत सुमारे 325 ते 350 कोटी रुपये होती. श्री साई ट्रस्ट कोणत्याही देणग्या स्वीकारत नाही. हजारो पदवीधरांना शिष्यवृत्ती, आपत्कालीन वैद्यकीय सेवांची गरज असलेल्या 4000 नागरिकांना मदत आणि दिवसाला 5 हजार जणांना जेवण पुरवण्याचं काम या ट्रस्टमार्फत केलं जातं. देशभरातल्या जवळपास 450 साई मंदिरांना ट्रस्टतर्फे निधी देण्यात आला आहे.

  आता 70 वर्षीय के. व्ही. रामाणी भारतात जगविख्यात स्टॅनफोर्ड विद्यापीठाच्या (Stanford University) तोडीस तोड विद्यापीठ उभारण्याच्या कार्यात व्यग्र आहेत. यासाठी त्यांनी आंतरविद्याशाखीय आणि बहुविद्याशाखीय अभ्यासक्रमांची सुविधा असणाऱ्या साई विद्यापीठाची (Sai University) स्थापना केली असून, ते या साई विद्यापीठाचे संस्थापक-कुलगुरू आहेत. चेन्नईतल्या (Chennai) जुन्या महाबलिपुरम मार्गावर हे विद्यापीठ उभं राहिलं असून, ऑगस्ट 2021 पासून ते कार्यान्वितही झालं आहे. कायदेविषयक पदव्युत्तर अभ्यासक्रमाव्यतिरिक्त लिबरल आर्ट्स, विज्ञान आणि तंत्रज्ञानातले तीन पदवी अभ्यासक्रम इथे सुरू होणार आहेत.

  या विद्यापीठाविषयीचा त्यांचा दृष्टिकोन, भारताची शिक्षण क्षेत्रातली कामगिरी आदी विषयांवर मनीकंट्रोलशी त्यांनी सविस्तर चर्चा केली. 'आम्ही शिक्षण हा व्यवसाय म्हणून नाही, तर सेवा म्हणून करत आहोत. त्यामुळे आम्हाला त्यातून एक रुपयाही कमवायचा नाही. उलट हा उपक्रम यशस्वी होण्यासाठी त्यात आणखी पैसा घालायचा आहे,' असं रामाणी यांनी स्पष्ट केलं.

  साई विद्यापीठ सुरू करण्याचा मुख्य उद्देश आणि दृष्टिकोन स्पष्ट करताना ते म्हणाले, 'भारताला उच्च-शिक्षण क्षेत्रात मोठ्या सुधारणांची आवश्यकता आहे. गेल्या 75 वर्षांत, स्वातंत्र्यानंतर, जगातल्या पहिल्या 50मध्ये एकही भारतीय विद्यापीठ नाही, याची मोठी खंत आहे. त्यामुळे देशात जागतिक स्तरावर प्रतिष्ठेची उच्च शिक्षण संस्था निर्माण करण्याचं आमचं ध्येय आहे. जगातल्या दुसऱ्या क्रमांकाची लोकसंख्या असलेल्या आपल्या देशात तरुणाईची संख्या सर्वाधिक आहे. या तरुणांना आधुनिक तंत्रज्ञान, सेवा आणि उद्योगांमध्ये चांगलं उच्च शिक्षण आणि संधी देण्याचं आमचं उद्दिष्ट आहे.'

  मोदी सरकारकडून दिवाळी भेट, पेट्रोल 5 तर डिझेलवर 10 रुपये उत्पादन शुल्क कपात

  'या वर्षी 55,000 भारतीय विद्यार्थ्यांना यूएस स्टुडंट व्हिसा देण्यात आला, जो आतापर्यंतचा सर्वाधिक आकडा आहे. आपल्या देशातलं अव्वल टॅलेंट परदेशात जात आहे आणि आम्ही त्यांना येथे संधी देऊ शकत नाही, याची आपल्याला लाज वाटली पाहिजे. उच्च शिक्षणासाठी परदेशात जाणारा विद्यार्थी वर्षाला सुमारे 25 ते 30 लाख रुपये खर्च करतो, ज्यामुळे दर वर्षी 13,000 कोटी रुपयांचं परकीय चलन बाहेर जातं. आपण आपल्या देशातल्या तरुणांच्या गरजा पूर्ण करू शकत नाही. तेव्हा ब्रेन ड्रेनबद्दल (Brain Drain) तक्रार करण्यात काही अर्थ नाही. हा एक मूलभूत दोष आहे. साई विद्यापीठ निर्माण करून आम्ही हे आव्हान पेलण्याचा प्रयत्न करत आहोत,' असं ते म्हणाले.

  भारतातली उच्च शिक्षणाची बाजारपेठ आधीच शाळा-महाविद्यालयांनी भरलेली आहे. त्यात साई विद्यापीठाचं वेगळेपण काय असेल, हे सांगताना रामाणी म्हणाले, 'परदेशातले विद्यार्थी आणि प्राध्यापकांपैकी एक तृतीयांश किंवा एक चतुर्थांश भारत किंवा चीनमधील आहेत. त्यांचं परदेशात जाण्याचं कारण काय आहे, याचा आम्ही विचार केला. केवळ भौतिक पायाभूत सुविधा, अभ्यासक्रम आणि प्रयोगशाळा हे त्यांच्या परदेशात जाण्याचं कारण नव्हतं, तर संपूर्ण शिक्षणाचं वेगळं वातावरण, शैक्षणिक अभिव्यक्तीचं स्वातंत्र्य, विद्यार्थ्यांना चौकशी करण्याचं, शिकण्याचं आणि वादविवाद करण्याचं स्वातंत्र्य हेदेखील त्यामागचं महत्त्वाचं कारण आहे. ही तफावत आम्हाला दूर करायची आहे. पायाभूत सुविधांव्यतिरिक्त आम्ही विद्यापीठातल्या सर्वोच्च प्राध्यापकांमध्ये गुंतवणूक करत आहोत. आमच्या फॅकल्टीपैकी 50 टक्के फॅकल्टी आंतरराष्ट्रीय असतील. इतर 50 टक्के भारतीय विद्याशाखांना एक तर विद्यार्थी, प्राध्यापक किंवा संशोधक म्हणून आंतरराष्ट्रीय एक्स्पोजर मिळेल, जेणेकरून ते त्यांच्या सर्वोत्तम पद्धती, त्यांचं विद्यापीठाबद्दलचे ज्ञान आणि शिक्षण प्रणाली आमच्यापर्यंत पोहोचवतील.'

  'हे करताना फक्त एक इमारत उभी करून विद्यापीठ असल्याचा दावा आम्ही करत नाही. तमिळनाडू सरकारच्या आदेशानुसार आम्ही येत्या सात वर्षांत 100 एकर जमिनीवर जवळपास 25 लाख चौरस फूट बांधकाम करणार आहोत. या विद्यापीठाला प्रवर्तक किंवा संस्थापकाचं नव्हे, तर साई (भारतीय आध्यात्मिक गुरू) यांचं नाव दिलं जाणार आहे. इथे जागतिक दर्जाच्या पायाभूत सुविधा निर्माण करणार आहोत. केवळ वर्गखोल्याच नाही, तर प्रयोगशाळा, प्राध्यापक आणि विद्यार्थ्यांची निवासस्थानं, मैदानं आणि करमणुकीच्या जागा जागतिक दर्जाच्या असतील. आंतरराष्ट्रीय शहरांशी आमची स्पर्धा असेल. आंतरराष्ट्रीय विद्यापीठांशी विद्यार्थी आणि प्राध्यापक आदान-प्रदान उपक्रमही राबवले जातील,' असं त्यांनी सांगितलं.

  'या वर्षी आम्ही पदवीचे दोन आणि पदव्युत्तर दोन अभ्यासक्रम सुरू करत आहोत. पहिला स्कूल ऑफ लिबरल आर्ट्स अँड सायन्सेसचा अभ्यासक्रम आहे. हार्वर्डमधून कॉग्निटिव्ह न्यूरोसायन्समध्ये पीएचडी केलेले आणि अमेरिकेतल्या तीन आयव्ही लीग विद्यापीठांमध्ये विविध पदांवर कार्यरत असलेले जमशेद भरूचा हे या विद्यापीठाचे कुलगुरू आहेत. त्यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही विद्यार्थी मिळवू शकू याची खात्री आहे,' असंही त्यांनी स्पष्ट केलं.

  'आमच्याकडे पहिल्या सत्रात एक फाउंडेशन कोर्स असेल. त्यात विद्यार्थी गंभीर विचार, विश्लेषणात्मक विचार, तार्किक विचार, संगणक कौशल्यं, संभाषण कौशल्य, लेखी आणि मौखिक संभाषण कौशल्यं शिकतील. पुढील सेमिस्टरमध्ये विद्यार्थी त्यांच्या आवडीचे मुख्य आणि दुय्यम विषय निवडू शकतील. इतर महाविद्यालयांप्रमाणे इथे दोन सेमिस्टरमध्ये 10 ते 12 विषय नसतील. इथे विद्यार्थी अर्थशास्त्र हा मुख्य विषय आणि भौतिकशास्त्र हा पूर्णपणे वेगळा विषय दुय्यम म्हणून घेऊ शकतात. आज भारतीय महाविद्यालयांमध्ये हे शक्य नाही; परंतु आयव्ही लीग शाळांमध्ये ही एक प्रमाणित पद्धत आहे,' असं रामाणी यांनी सांगितलं.

  'सध्या देशात अनेक यशस्वी उद्योजक पायाभूत सुविधा आणि मनुष्यबळ विकसित करण्यासाठी शिक्षण क्षेत्रात गुंतवणूक करत आहेत. क्रेया विद्यापीठ (krea University) त्याचंच एक उदाहरण आहे; मात्र ते लिबरल आर्ट्सचं विद्यापीठ आहे. ते बहुविद्याशाखीय, आंतरविद्याशाखीय नाही. आम्ही स्टॅनफोर्डचं मॉडेल समोर ठेवलं आहे. आमच्याकडे केवळ कलाच नाही, तर लिबरल आर्ट्स, विज्ञान, कायदेविषयक अभ्यासक्रम आहेत. लवकरच अभियांत्रिकी आणि व्यवस्थापन अभ्यासक्रम सुरू होईल. येत्या 4-5 वर्षांत एक हॉस्पिटल आणि एक वैद्यकीय कॉलेज असेल. त्यामुळे हे खऱ्या अर्थाने बहुविद्याशाखीय/आंतरविद्याशाखीय विद्यापीठ आहे. आम्ही विद्यार्थ्यांना उद्योजक, जागतिक शास्त्रज्ञ किंवा जागतिक विजेते बनण्याच्या दृष्टीने विचार करण्यासाठी प्रवृत्त करत आहोत. साहजिकच सर्व अभ्यासक्रम एकाच वेळी सुरू होऊ शकत नाहीत. परंतु येत्या सहा वर्षांत आमच्याकडे सर्व अभ्यास शाखा उपलब्ध असतील आणि अभ्यासक्रमांची संख्याही मुबलक असेल, जेणेकरून विद्यार्थ्यांना निवडीसाठी अधिक पर्याय असतील. या कामात अनेकांचे सहकार्य लाभत आहे,' असं रामाणी यांनी स्पष्ट केलं.

  'साई विद्यापीठासाठी इन्फोसिसचे सह-संस्थापक नारायण मूर्ती यांना मदत करण्याची आम्ही विनंती केली. ते यूएस, फ्रान्स आणि जपानसह जगभरातल्या किमान पाच किंवा सहा आयव्ही लीग शाळांच्या बोर्डावर आहेत. उच्च शिक्षण क्षेत्रातल्या सर्वोत्तम मार्गदर्शनासाठी भारतातल्या मणिपाल या उत्तम खासगी विद्यापीठाचे टी. व्ही. मोहनदास पै यांचं सहकार्य घेतलं. लॉ स्कूलसाठी भारताचे माजी सरन्यायाधीश एम. एन. व्यंकटाचलिया यांना गव्हर्निंग कौन्सिलमध्ये राहण्याची विनंती केली. प्रत्येक शाखेसाठी तज्ज्ञांचे मार्गदर्शन घेतलं असून, आयआयटी मुंबई आणि आयआयएम अहमदाबादच्या गव्हर्निंग बोर्डावर असलेले आशंक देसाई आणि भारताच्या अणुऊर्जा आयोगाचे प्रमुख अनिल काकोडकर आणि इतर मान्यवरांचा त्यात समावेश आहे,' असंही रामाणी यांनी सांगितलं.

  शैक्षणिक पातळीवर सर्व नियोजन करण्यात आलं आहे, तसंच या उपक्रमासाठी लागणाऱ्या प्रचंड आर्थिक निधीचंही नियोजन करण्यात आलं आहे. त्याबाबत माहिती देताना रामाणी म्हणाले, 'या विद्यापीठाचं व्यवस्थापन सांभाळण्यासाठी आमचा पुढच्या सात वर्षांसाठी नेमका रोलआउट प्लॅन तयार आहे. सात वर्षांच्या अखेरीस आम्ही एक संपूर्ण विद्यापीठ म्हणून कार्यरत होऊ. विद्यापीठ बांधण्यासाठी 750 कोटी रुपये खर्च असून, त्यापैकी 300 कोटी रुपये मी स्थापन केलेल्या ट्रस्टमधून येतील. डेट इक्विटी 1:1 ठेवण्याची आणि वित्तीय संस्थांकडून सुमारे 300 कोटी रुपये कर्ज घेण्याची आमची योजना आहे. त्यासाठी अनेक वित्तीय संस्थांनी आमच्याशी संपर्क साधला असून, भारतातल्या या उच्च शिक्षणाच्या योजनेत सहभागी होण्याची इच्छा प्रदर्शित केली आहे. सुमारे 50 कोटी रुपये आम्ही प्रायोजक आणि देणगीदारांकडून उभारण्याची योजना आखत आहोत. दोन वर्षं यशस्वीपणे विद्यापीठ चालवल्यानंतरच आम्ही त्यांच्याशी संपर्क साधणार आहोत.'

  'यशस्वी होण्यासाठी तुमच्याकडे काही तरी यूएसपी (USP) असणं आवश्यक आहे. इतरांपेक्षा वेगळं असणं आवश्यक आहे. तेच आम्ही इथेही करण्याचा प्रयत्न करत आहोत. आपल्या देशात झुंडीची मानसिकता आहे; पण मी नेहमीच वेगळा मार्ग निवडला. जेव्हा भारतातला प्रत्येक जण सॉफ्टवेअर सेवा निर्यात करत होता, तेव्हा मी ते करायचं नाही असा निर्णय घेतला. उच्च शिक्षण क्षेत्रातदेखील मी हाच दृष्टिकोन ठेवला आहे,' असं त्यांनी सांगितलं.

  'यासाठी आजही या वयात असं काम करण्यासाठी प्रेरणा देतात ते शिर्डीचे साईबाबा. माझ्या वयाच्या २३ व्या वर्षी ते माझ्या आयुष्यात आले. गेल्या ४७ वर्षांपासून मी साईबाबांचा भक्त आहे. एकदा मी सुट्टीत साई मंदिरात काही तरी प्रार्थना करायला गेलो होतो. कुटुंबातील एक सदस्य आजारी होता आणि मी लवकरात लवकर बरं होण्यासाठी प्रार्थना करत होतो. दोन तासांत ती व्यक्ती बरी झाली. तेव्हापासून मी साईबाबांचा भक्त झालो. मी व्यवसायात यशस्वी झालो ते भौतिकशास्त्राच्या प्राध्यापकांमुळे. मी शाळा-कॉलेजात असताना बॅकबेंचर होतो. कॉलेजमध्ये असताना एकदा आमच्या भौतिकशास्त्राच्या प्राध्यापकांनी आम्हा उनाड अशा आठ विद्यार्थ्यांपैकी सात जणांना बोलावले आणि आम्ही सर्व जण आंध्र प्रदेशात वैद्यकीय प्रतिनिधी म्हणून काम करावं असं सांगितलं. कडक उन्हात डॉक्टरांना भेटून आम्ही औषधं विकण्याचं काम केलं. आज आम्ही सर्व जण व्यावसायिक जीवनात यशस्वी आहोत. आम्ही नुकतीच आमच्या त्या प्राध्यापकांची त्यांच्या निधनापूर्वी भेट घेतली,' असं रामाणी यांनी सांगितलं.

  Dating Website वर असण्याचा चारित्र्याशी संबंध नाही, कोर्टाची लक्षवेधी टिप्पणी

  'तुमच्या मूलभूत गरजा पूर्ण करण्यासाठी पैसा अत्यंत आवश्यक आहे. तुमच्याकडे कुटुंब, घर, अन्न, वैद्यकीय सेवा, कार, टेलिव्हिजन यांसारख्या काही लक्झरी गोष्टी असणं आवश्यक आहे. चांगलं आयुष्य जगण्यासाठी पैशाची गरज असते; पण आवश्यकतेपेक्षा जास्त पैसा वाईट आहे. पैशांची गरज आणि पैशांची हाव यातील सीमारेषा अत्यंत फिकट आहे. ती प्रत्येक व्यक्तीसाठी, प्रत्येक कुटुंबासाठी वेगळी आहे. एका विशिष्ट टप्प्यापर्यंत, पैसा तुमचं रक्षण करतो. तुम्हाला अन्न, निवारा, कपडे, औषधोपचार, तुम्हाला आवश्यक असलेल्या इतर गोष्टींसाठी एका विशिष्ट टप्प्यापर्यंत पैशांची गरज आहे; पण त्यापलीकडे तुम्हाला पैशाची चिंता वाटू लागते. तुम्हाला मन:शांती लाभत नाही. हे लक्षात घेणं आवश्यक आहे,' असा विचारही त्यांनी मांडला.

  First published:
  top videos

   Tags: Saibaba