दिल्ली , 02 डिसेंबर: दिल्लीतील जवाहरलाल नेहरू युनिव्हर्सिटी (जेएनयू) पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. गुरुवारी जेएनयू कॅम्पसमधील अनेक भिंतींवर ब्राह्मणविरोधी घोषणा लिहिल्याचं निदर्शनास आलं. युनिव्हर्सिटीतील अधिकाऱ्यांनी या घटनेचा निषेध करणारं निवेदन जारी केलं आहे. कॅम्पसमध्ये विशिष्ट जातीच्या विद्रुपीकरणामागे 'अज्ञात घटक' जबाबदार आहे, असं अधिकाऱ्यांचं म्हणणं आहे. या घटनेच्या चौकशीचे आदेश देण्यात आले आहेत. ‘हिंदुस्थान टाइम्स’नं याबाबत वृत्त प्रसिद्ध केलं आहे.
जेएनयू कॅम्पसमधील 'स्कूल ऑफ इंटरनॅशनल स्टडीज-II' विभागाच्या इमारतीच्या भिंतींवर जातीवाचक घोषवाक्यं आढळून आली. नलिनकुमार महापात्रा, राज यादव, प्रवेश कुमार आणि वंदना मिश्रा यांच्यासह अनेक ब्राह्मण प्राध्यापकांच्या चेंबरवरील भिंतींवर 'शाखेकडे परत जा' असं वाक्य लिहिण्यात आलं होतं.
युनिव्हर्सिटीतील अधिकाऱ्यांनी काढलेल्या निवेदनात, 'विद्यापीठ सर्वांचं आहे,' अशी ग्वाही देण्यात आली आहे. "कुलगुरू, प्राध्यापक शांतीश्री डी. पंडित यांनी या घटनेची गंभीर दखल घेतली आहे. प्रशासन कॅम्पसमधील अशा प्रवृत्तींचा निषेध करतं," असंही या निवेदनात म्हटलं आहे.
SBI PO 2022 परीक्षेच्या तारखा जाहीर; कधी जारी होणार Admit Cards? समोर आली अपडेट
"डाव्या विचारसरणीच्या आणि स्वत:ला लिबरल म्हणवून घेणाऱ्या गँग्ज त्यांच्या मतांपासून भिन्न असलेल्या प्रत्येक आवाजाला धमकावतात. सर्वांना समान वागणूक देणारे, परस्पर आदरभाव असणारे, सभ्यता राखणारे प्रतिनिधी निवडण्याचं आवाहन ते EC मध्ये करतात. मात्र, प्रत्यक्षात त्याच्या विरुद्ध वागतात. त्यांनी घातलेला धुडगूस आणि केलेली तोडफोड निषेधार्ह आहे," असं ट्विट जेएनयूतील शिक्षकांच्या फोरमने केलं आहे.
अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेनं (अभाविप) या घटनेचा निषेध केला आहे. अभाविपच्या मते या तोडफोडीच्या आणि जातिवाचक घोषणा लिहिण्याच्या प्रकरणामागे डाव्या विचारसरणीच्या लोकांचा हात आहे. "कम्युनिस्ट गुंडांकडून शैक्षणिक संस्थांमध्ये सर्रासपणे होत असलेल्या तोडफोडीचा अभाविप निषेध करतं. कम्युनिस्टांनी जेएनयूतील स्कूल ऑफ इंटरनॅशनल स्टडीज-II इमारतीच्या भिंतींवर अपशब्द लिहिले आहेत. मुक्त विचारसरणीच्या प्राध्यापकांना धमकावण्यासाठी त्यांच्या चेंबरची विटंबना केली आहे," असं जेएनयूतील अभाविपचे अध्यक्ष रोहित कुमार म्हणाले आहेत.
क्या बात है! लाखो रुपये पॅकेज त्यात वर्क फ्रॉम होम जॉब्स; Wipro मध्ये बंपर ओपनिंग्स
जेएनयूमध्येही अनेकदा अशी प्रकरणं समोर आली आहेत. तिथे सतत वेगवेगळ्या मुद्द्यांवर घोषणाबाजी केली जाते. काही वर्षांपूर्वी कॅम्पसमध्ये देशविरोधी घोषणा दिल्याचं प्रकरण घडलं होतं. त्यावेळी अनेक विद्यार्थ्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला होता.
जेएनयूमधील जातिवाचक घोषणांचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. त्यामुळे इंटरनेटवर 'ब्राह्मीण लाइव्हज् मॅटर' असा ट्रेंड सुरू झाला आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Career, Career opportunities, Delhi, JNU