जामताडा, 28 फेब्रुवारी : चोर काय चोरी करेल याचा नेम नाही. असाच एक चोर शेतातील कोबी चोरण्यासाठी रात्रीच्या अंधारात गेला होता पण विहिरीत पडल्यामुळे या चोराला जेलची हवा खावी लागली.
झारखंडमधील जामताडा जिल्ह्यातील नारायणपूर पोलीस स्टेशनच्या हद्दीतील धरमपूर गावात ही घटना घडली. हा चोर रात्रीच्या अंधाराचा फायदा घेऊन एका शेतकऱ्याच्या शेतात पोहोचला. पण, अंधारामुळे अंदाजा न आल्यामुळे तो थेट विहिरीत पडला. रात्रभर तो विहिरीतच अडकून होता. सकाळी जेव्हा शेतकरी शेतात पोहोचला तेव्हा त्याला हा तरुण विहिरीत आढळला. त्यानंतर शेतकऱ्याने पोलिसांनी माहिती देऊन बोलावून घेतलं.
पोलिसांनी या चोराला बाहेर काढलं आणि चौकशी केली असता या चोराने आपण कोबी चोरण्यासाठी आलो होतो आणि विहिरीत पडलो अशी कबुली दिली. शहादत मियाँ असं या चोराचं नाव आहे. तन्वीर अन्सारी यांच्या शेतात हा चोरटा कोबी चोरण्यासाठी आला होता.
या प्रकरणी शेतकरी तन्वीर अन्सारी यांनी नारायणपूर पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली आहे. त्यांच्या तक्रारीनुसार, पोलिसांनी शहादतला ताब्यात घेतलं. कोर्टात त्याला हजर केले असता त्याला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली. त्याची रवानगी थेट जेलमध्ये करण्यात आली.
नारायणपूर पोलीस स्टेशनचे अधिक्षक अजित कुमार यांनी सांगितलं की, शहादत हा कोबी चोरण्याच्या इराद्याने शेतात आला होता. परंतु, रात्रीच्या अंधारात त्याला उघडी विहीर दिसली नाही. त्यामुळे तो विहिरीत पडला होता. याबद्दलची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून विहिरीतून या चोराला बाहेर काढलं आणि ताब्यात घेतलं.
आरोपी तरुण हा धरमपूर गावात राहणार आहे. या आधीही त्याने शेतात पिकांची चोरी केली होती, आता पुन्हा एकदा त्याने चोरीचा प्रयत्न केला होता, पण त्याच्याच चुकीने सापडला, अशी माहिती शेतकऱ्याने दिली.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Youth