• Home
  • »
  • News
  • »
  • national
  • »
  • 'आत्मनिर्भर भारताचं उदाहरण...', पहिली स्वदेशी विमानवाहू नौका नौदलात होणार दाखल

'आत्मनिर्भर भारताचं उदाहरण...', पहिली स्वदेशी विमानवाहू नौका नौदलात होणार दाखल

'ही विमानवाहू नौका म्हणजे देशाचा अभिमान असून, 'आत्मनिर्भर भारत'चं झळाळतं उदाहरण आहे,' असे उद्गार संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी काढले आहेत.

  • Share this:
नवी दिल्ली, 25 जून: 'भारताची पहिली स्वदेशी विमानवाहू नौका (Indigenous Aircraft Carrier) पुढच्या वर्षी नौदलात (Navy) समाविष्ट होणार आहे. त्या नौकेची युद्धक्षमता, पोहोच आणि वैविध्यपूर्ण गुणधर्म यांमुळे देशाचं संरक्षण सामर्थ्य मोठ्या पटीत वाढणार आहे,' अशी माहिती संरक्षणमंत्री राजनाथ सिंह (Rajnath Singh) यांनी शुक्रवारी (25 जून) दिली. 'ही विमानवाहू नौका म्हणजे देशाचा अभिमान असून, 'आत्मनिर्भर भारत'चं झळाळतं उदाहरण आहे,' असे उद्गार संरक्षणमंत्र्यांनी काढले. या नौकेची बांधणी कुठपर्यंत आली आहे, याचा आढावा घेण्यासाठी राजनाथ सिंह यांनी शुक्रवारी कोचीन (Cochin) बंदरातल्या एर्नाकुलम (Ernakulam) इथल्या धक्क्याला भेट दिली. त्यानंतर ते पत्रकारांशी बोलत होते. 'या प्रकल्पाला NDA सरकारच्या काळात मंजुरी मिळाली होती. कोविडच्या (Covid) प्रादुर्भावामुळे अनेक कामं ठप्प झालेली असतानाही नौकेचं काम वेगाने प्रगतिपथावर आहे. पुढच्या वर्षी ही नौका नौदलात समाविष्ट होणं, म्हणजे भारतीय स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवी वर्षात देशाला दिलेली मानवंदनाच होय,' असं राजनाथसिंह म्हणाले. 'या नौकेची युद्धक्षमता, पोहोच आणि वैविध्यपूर्ण गुणधर्म यांमुळे देशाच्या संरक्षणदलाचं सामर्थ्य मोठ्या पटीत वाढणार आहे. तसंच, सागरी क्षेत्रात भारताची उद्दिष्टं साध्य करण्यासही या नौकेचा उपयोग होणार आहे,' असं संरक्षणमंत्री म्हणाले. पहिल्या स्वदेशी विमानवाहू नौकेच्या उभारणीचं काम प्रत्यक्ष पाहता येणं, त्याचा आढावा घेणं, ही एक आनंदाची बाब असल्याचे उद्गारही त्यांनी काढले. हे वाचा-अख्ख्या विमानात केवळ एक प्रवासी, जाणून घ्या बिझनेसमनचा सुपर अमेझिंग सोलो प्रवास राजनाथ सिंह यांनी कारवारमध्ये प्रोजेक्ट सीबर्डचाही (Project Seabird) आढावा घेतला. भविष्यात भारतीय नौदलाचा सर्वांत मोठा नाविक तळ (Naval Base) येथे होणार आहे. भारतीय नौदलाच्या हिंदी महासागरातल्या, तसंच त्यापुढच्या मोहिमांना साह्यभूत ठरेल, अशा सोयी आणि पायाभूत सुविधा या तळाकडून पुरवल्या जाणार आहेत. 'नौदल सक्षम करण्यास, मजबूत करण्यास सरकार कटिबद्ध आहे. सरकारचं लक्ष्य निश्चित आहे, हे दर्शविण्यासाठी या दोन प्रकल्पांची उदाहरणं पुरेशी आहेत,' असं राजनाथ सिंह म्हणाले. 'स्वदेशी उद्योगांचं महत्त्व ओळखून त्यांचा उपयोग करून घेणं, अत्याधुनिकीकरण याला आमचं प्राधान्य आहे. भारतीय शिपयार्ड्समध्ये 44पैकी 42 युद्धनौका बांधल्या जात आहेत, हे त्याचं एक उत्तम उदाहरण आहे,' असं सिंह म्हणाले. हे वाचा-मोठी बातमी! Twitter ने रविशंकर प्रसादांचं अकाउंट केलं ब्लॉक,एका तासानं झालं सुरू डिझाइन, बांधकामात वापरलेलं स्टील, महत्त्वाची शस्त्रं आणि सेन्सर्स यांचा विचार केला, तर स्वदेशी विमानवाहू नौका 75 टक्के भारतीय आहे. डिफेन्स अॅक्विझिशन कौन्सिलने नुकचंच स्ट्रॅटेजिक पार्टनरशिप मॉडेलअंतर्गत प्रोजेक्ट 75-Iच्या प्रस्तावाला मंजुरी दिली आहे. त्यामुळे उत्पादन, बांधकामाच्या खास स्वदेशी तंत्रज्ञानाच्या विकसनाला अधिक वाव मिळेल, असंही सिंह यांनी स्पष्ट केलं. यामुळे भारतीय नौदलाची मोहिमांची व्याप्ती वाढणार असून, सागरी हद्दीच्या संरक्षणाला अधिक बळ मिळणार आहे. कोणत्याही प्रकारच्या आव्हानाला तोंड देण्यासाठी भारती नौदल सज्ज आहे, असं सिंह यांनी सांगितलं. 'गलवान खोऱ्यात चीनसोबतचं वातावरण तंग होतं, तेव्हा नौदल (Navy) ज्या पद्धतीने तैनात करण्यात आलं होतं, त्यातून असा संदेश गेला, की आम्हाला शांतता हवी आहे; पण कोणत्याही प्रसंगास तोंड देण्यास आम्ही सज्ज आहोत,' असं सिंह यांनी सांगितलं. कोविड काळातही भारतीय नौदलाने उत्तम कामगिरी बजावल्याबद्दल सिंह यांनी कौतुक केलं. ऑपरेशन समुद्र सेतू वनच्या माध्यमातून परदेशातल्या भारतीयांना परत आणण्यात आलं. ऑपरेशन समुद्र सेतू टूच्या माध्यमातून लिक्विड मेडिकल ऑक्सिजन (Liquid Medical Oxygen) आणण्यात आला. तौक्ते चक्रीवादळावेळी नौदलाच्या स्त्री-पुरुष जवानांनी दाखवलेलं शौर्यही अतुलनीय आहे, असं सिंह म्हणाले. प्रादेशिक शांतता आणि स्थैर्य राखण्यासाठी पंतप्रधानांनी SAGAR अर्थात सिक्युरिटी अँड ग्रोथ फॉर ऑल इन दी रीजन हा दृष्टिकोन ठेवला आहे. त्या अनुषंगाने आमचे प्रयत्न सुरू आहेत, असं राजनाथसिंह यांनी सांगितलं.
First published: