मुंबई, 26 नोव्हेंबर : भारतीय रेल्वेने (Indian Railway) कोविड काळात वाढवलेल्या प्लॅटफॉर्म तिकीटांच्या (Platform ticket price News) किमती पुन्हा कमी करण्याचा निर्णय गुरुवारी (25 नोव्हेंबर) घेतला आहे. कोविड-19 (Covid 19) महामारीच्या काळात प्लॅटफॉर्म तिकीटांच्या किमतीमध्ये वाढ करण्यात आली होती. गुरुवारी रेल्वे विभागाच्या वतीने सांगण्यात आलं, की आता प्लॅटफॉर्म तिकीट पूर्वीप्रमाणेच 10 रुपयांना असेल. प्लॅटफॉर्मवर लोकांची गर्दी होऊ नये, यासाठी रेल्वे विभागाने प्लॅटफॉर्म तिकीटांच्या किंमती वाढवल्या होत्या.
मध्यरेल्वेने (Central Railway) बुधवारी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (CSMT), दादर, लोकमान्य टिळक टर्मिनस (LTT), ठाणे, कल्याण आणि पनवेल स्थानकांवरच्या प्लॅटफॉर्म तिकीट दरात कपात केली. मध्य रेल्वेच्या अधिसूचनेनुसार, 'कोविड-19 महामारीमुळे लागू करण्यात आलेल्या निर्बंधांमध्ये येत असलेली शिथिलता लक्षात घेऊन सीएसएमटी, दादर, एलटीटी, ठाणे, कल्याण आणि पनवेल स्थानकांवरील प्लॅटफॉर्म तिकीटांची किंमत 50 रुपयांवरून कमी करण्यात आली आहे. हे तिकीट पुन्हा 10 रुपये करण्याचा निर्णय घेतला आहे.'
वाचा : आधार कार्डवर मिळवा एलपीजी कनेक्शन, वाचा काय आहे प्रक्रिया
रेल्वेत पुन्हा दिले जाणार जेवण
गेल्या शुक्रवारी, रेल्वे विभागाने जाहीर केलं होतं, की रेल्वेमध्ये अन्न तयार करण्यास पुन्हा सुरू केली जाणार आहे. कोरोना व्हायरसमुळे ही सेवा बंद करण्यात आली होती. रेल्वे विभागाने एका पत्रात इंडियन रेल्वे केटरिंग अँड टुरिझम कॉर्पोरेशनला (IRCTC) रेल्वेसेवा पूर्ववत करण्यासाठी गाडीमधल्या प्रवाशांना जेवण देणं पुन्हा सुरू करण्यास सांगितलं होतं.
कोरोनामुळे लागू करण्यात आलेल्या लॉकडाउनबाबतचे निर्बंध शिथिल करण्यात आले आहेत. त्यामुळे आता प्रवाशांना पूर्वीप्रमाणेच सुविधा मिळण्यास सुरुवात होईल, अशी अपेक्षा आहे. कोरोना साथीच्या काळात रेल्वेगाड्यांमध्ये जेवण देण्याची सुविधा बंद करण्यात आली होती.
वाचा : मध्य रेल्वेचा मोठा निर्णय, या स्टेशनवरील प्लॅटफॉर्म तिकीटमध्ये कपात
दरम्यान, मध्य रेल्वेने म्हटलं आहे, की ज्या उपनगरीय रेल्वे प्रवाशांनी कोरोना लशीचे दोन्ही डोस घेतले आहेत, ते आता रेल्वेच्या अनारक्षित तिकीट प्रणाली (UTS) अॅपद्वारे त्यांच्या मोबाइल फोनवर एकल प्रवास आणि सीझन तिकीटं बुक करू शकतात. हे अॅप राज्य सरकारच्या युनिव्हर्सल पास प्रणालीशी जोडण्यात आलं आहे.
कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू लागल्यानंतर लॉकडाउन लागू करण्यात आलं होतं. बरेच दिवस प्रवासी रेल्वेगाड्या बंद होत्या. गर्दी टाळण्यासाठी प्लॅटफॉर्म तिकीटांच्या किमतीदेखील वाढवण्यात आल्या होत्या. आता कोरोनामुळे लागू करण्यात आलेले निर्बंध शिथिल होत असून, हळूहळू परिस्थिती पूर्वपदावर येऊ लागली आहे. रेल्वेने वाढवलेली प्लॅटफॉर्म तिकीटाची किंमतदेखील कमी केली असल्याने प्रवाशांना दिलासा मिळाला आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Indian railway, Railway