नवी दिल्ली, 8 नोव्हेंबर : तामिळनाडूत झालेल्या भीषण दुर्घटनेत देशाचे चीफ ऑफ डिफेन्स जनरल बिपीन रावत यांचं निधन झालं आहे. भारतीय वायूदलाने ट्विट करत याबबात माहिती दिली आहे. जनरल बिपीन रावत, त्यांच्या पत्नी मधुलिया रावत यांच्यासह विमानात असलेल्या आणखी 11 जणांचं दुर्देवी निधन झालं आहे. या निधनामुळे देशाचं खूप मोठं नुकसान झालं आहे. या अपघातात सहभागी असलेल्या 14 जणांपैकी 13 जणांचा मृत्यू झाला आहे. तर एक जण गंभीर जखमी असल्याची माहिती आहे. या दुर्घटनेत भारतीय वायुसेनेचे ग्रुप कॅप्टन वरुण सिंग जखमी झाले आहेत. त्यांच्यावर सध्या रुग्णालयात उपचार सुरु आहेत. वरुण सिंग हे खूप शूर आहेत. त्यांनी 2020 मध्ये मोठ्या संकटातून तेजस लढाऊ विमान वाचविलं होतं. त्यांच्या या कार्यामुळे त्यांना या वर्षीच्या स्वातंत्र्यदिनी शौर्य चक्राने सन्मानित करण्यात आलं आहे.
दुर्घटनाग्रस्त हेलिकॉप्टरमध्ये एकूण 14 जण प्रवासी करत होते. यामध्ये बिपीन रावत, बिपीन रावत यांच्या पत्नी, लष्कराचे काही अधिकारी तसेच इतर सुरक्षारक्षक, कमांडोज उपस्थित होते. अपघातानंतर तात्काळ घटनास्थळी मदतकार्य सुरू करण्यात आले होते. दुपारी 12 वाजून 40 मिनिटांनी ही दुर्घटना घडली होती. हेलिकॉप्टर कोसळताच आग लागली. घटनास्थळी बचाव आणि मदतकार्य वेगाने सुरू करण्यात आले होते. या घटनेबाबत संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना माहिती दिली आहे.
हेही वाचा : CDS बिपीन रावत यांना घेऊन जाणारं लष्कराचं हेलिकॉप्टर क्रॅश! अपघाताचे भीषण PHOTOS आले समोर
डीएस बिपीन रावत हे आपल्या पत्नीसोबत एका कार्यक्रमासाठी तमिळनाडूला गेले होते. वेलिंग्टन येथे आर्म्ड फोर्सेजचं कॉलेज आहे. जेथे सीडीएस बिपीन रावत यांचं लेक्चर होतं. तेथून ते हेलिकॉप्टरने कुन्नूर येथे येत असताना कुन्नूर येथे त्यांच्या हेलिकॉप्टरला अपघात झाला आहे.
कुन्नूर येथून बिपीन रावत हे दिल्लीला जाणार होते. मात्र, कुन्नूर येथे पोहोचण्यापूर्वीच त्यांच्या हेलिकॉप्टरला अपघात झाला. या अपघातानंतर लष्कराने चौकशीचे आदेश दिले आहेत. असं म्हटलं जात आहे की, ज्या ठिकाणी ही दुर्घटना घडली आहे त्या परिसरात घनदाट जंगल आहे. या घटनास्थळावरचे फोटोज आणि व्हिडीओ सुद्धा समोर आले आहेत.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.