गोविंद कुमार, प्रतिनिधी गोपालगंज, 8 जुलै : आजकाल स्वतःचा जोडीदार स्वतः निवडण्याकडे सर्वांचा कल असतो. मात्र ‘त्या’ दोन व्यक्ती लग्नाआधी एकमेकांना कितीही जवळून ओळखत असल्या किंवा एकमेकांवर अगदी जीव ओवाळून टाकत असल्या तरीही भांडणांचं प्रमाण प्रेमविवाहात अधिक असल्याचं दिसून येतं. बिहारच्या अशाच एका जोडप्याने किरकोळ भांडणांतून थेट आत्महत्येचं टोक गाठलं. दोघांनीही विष पिऊन आयुष्य संपवण्याचा प्रयत्न केला. सुदैवाने दोघंही थोडक्यात वाचले असून सध्या त्यांच्यावर अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, गोपालगंज जिल्ह्यातील श्यामपूरचे रहिवासी असलेल्या आलोक कुमार आणि निशा कुमारी यांच्यात गुरुवारी रात्री स्वयंपाक झाल्यानंतर काहीतरी किरकोळ गोष्टीवरून बाचाबाची झाली. हा वाद एवढा पुढे गेला की दोघांनीही विष प्यायलं. त्यांच्या घरात भयाण शांतता जाणवल्यावर शेजारच्यांनी येऊन पाहताच दोघं बेशुद्ध अवस्थेत जमिनीवर पडलेले दिसले. तेव्हा तातडीने त्यांना जवळच्या सदर रुग्णालयात दाखल करण्यात आलं. दीड तासांच्या उपचारांनंतर गंभीर प्रकृती पाहता डॉक्टरांनी त्यांना रात्रीच गोरखपूरच्या वैद्यकीय महाविद्यालयात हलविण्यास सांगितलं. आता त्यांच्यावर वैद्यकीय महाविद्यालयाच्या अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत.
आलोक कुमार याने काही महिन्यांपूर्वीच निशा कुमारीशी प्रेमविवाह केला होता. दोघांचा राजा-राणीचा संसार सुरू होता. त्यांनी विष प्यायलं तेव्हादेखील त्यांच्या घरात जेवण बनलं होतं, म्हणजे संध्याकाळपर्यंत परिस्थिती व्यवस्थित होती. मात्र अचानक असं काय झालं की, दोघांनीही थेट आत्महत्येचा विचार केला. नक्की त्यांच्यात भांडण झालं की अजून काही कारण आहे, याचा तपास पोलीस करत आहेत. शिवाय शेजारीही काही बोलण्यास तयार नाहीत. 15 वर्षांची नीतू सिंह 21 वर्षांच्या ऋषि कपूरच्या पडली प्रेमात; लग्नात घडलं असं काही की दोघेही झाले बेशुद्ध दरम्यान, ‘प्रेम आंधळं असतं असं म्हटलं जातं, जे काही अंशी सत्य आहे. परंतु आयुष्य शांततेत, सुखात जगायचं असल्यास स्वप्नांच्या जगात वाहून न जाता, वास्तविक परिस्थितीचं भान ठेऊन डोळस प्रेम करावं, तरच प्रेमविवाह यशस्वी होतात. तसेच आयुष्य संपवण्यापेक्षा समोर असलेल्या अडचणीवर मात करण्यासाठी शक्य तितके प्रयत्न करावे’, असा सल्ला पोलिसांनी दिला आहे.