अहमदाबाद, 21 जानेवारी: MBA-PGP च्या दुसऱ्या वर्षात शिकणाऱ्या विद्यार्थिनीच्या आत्महत्येमुळे अहमदाबादमध्ये खळबळ माजली आहे. बुधवारी या घटनेमुळे आयआयएम अहमदाबाद (IIM Ahmedabad) कॅम्पसमध्ये तणावाचं वातावरण होतं. द्रिष्टी कान्हानी या 25 वर्षीय तरुणीने हा अत्यंत टोकाचा निर्णय घेतला. सहा दशकं जुन्या असणाऱ्या या कॅम्पसमध्ये पहिल्यांदाच अशाप्रकारे आत्महत्येची घटना घडल्याने सर्वांसाठी हा मोठा धक्का होता. द्रिष्टी जुन्या IIM-A कॅम्पसमध्ये 8 नंबरच्या खोलीत राहत होती. ती बिहारच्या मुजफ्फरपूरहून शिक्षणासाठी याठिकाणी आली होती.
बुधवारी पंख्याला लटकलेल्या अवस्थेत द्रिष्टीचा मृतदेह सापडला होता, मात्र त्याठिकाणाहून कोणतीही सुसाइड नोट सापडली नाही आहे. त्यामुळे तिने असं टोकाचं पाऊल का उचललं असावं यामागचं कारण मात्र अद्याप अस्पष्ट आहे. पोलिसांकडून तिच्या कुटुंबीयांना कळवण्यात आलं असून याबाबत अधिक तपास आणि चौकशी सुरू आहे.
(हे वाचा-मुंबईत मांत्रिकांचा अघोरी खेळ, वृद्ध महिलेकडून उकळले 40 लाख रुपये)
टाइम्स ऑफ इंडियाने सॅटेलाइट पोलिसांच्या हवाल्याने अशी माहिती दिली आहे की, ही घटना बुधवारी दुपारी 2.30 वाजण्याच्या सुमारास घडली आहे. यावेळी तिच्या मैत्रिणी तिच्या खोलीचं दार ठोठावत होत्या, पण तिने त्यांच्या हाकांना आवाज दिला नाही. शेवटी त्यांनी दरवाजा तोडला आणि त्यांना पंख्याला लटकलेल्या अवस्थेत द्रिष्टीचा मृतदेह आढळून आला. या मीडिया अहवालानुसार सूत्रांची अशी माहिती मिळते आहे की बुधवारी सकाळपासूनच द्रिष्टीचे काहीतरी बिनसले होते. ती जेवणासाठीही बाहेर आली नाही त्यामुळे तिच्या मैत्रिणींचा संशय वाढला आणि त्यांनी तिची खोली गाठली.
(हे वाचा- धक्कादायक! जागेच्या वादातून गमावला जीव, गळा चिरून 30 वर्षीय तरुणाची निघृण हत्या)
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार विद्यार्थिनींनी त्यानंतर कॅम्पसमधील सुरक्षा प्रमुख आणि डॉक्टरांना याबाबत माहिती दिली. त्यांनीच पोलिसांना फोन करून घटनास्थळी बोलावले होते. पोलिसांनी अशी माहिती दिली आहे की, फॉरेन्सिक अधिकाऱ्यांनी देखील तिचा मृत्यू बुधवारीच झाल्याचे म्हटले आहे. पण त्याठिकाणी कोणतीही सुसाइड नोट सापडली नसल्याने इतर अँगल्सनी या प्रकरणाचा तपास सुरू आहे. या मुलीचा फोन पोलिसांनी ताब्यात घेतला असून, त्याचा तपास केला जात आहे. शिवाय तिचे WhatsApp चॅट देखील तपासले जाणार आहेत. तिचा मृतदेह सोला सिव्हिल हॉस्पिटलमध्ये शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला आहे. याप्रकरणी पोलिसांनी अपघाती मृत्यूची नोंद केली आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Suicide