मुंबई, 08 ऑक्टोबर : यूपीएससीसारख्या स्पर्धा परीक्षा पास होणं सोपं नसतं. त्यासाठी जिद्द, चिकाटी आणि रिस्क घेण्याची तयारी असावी लागते. यूपीएससी परीक्षेसाठी गलेलठ्ठ पगाराच्या नोकऱ्या सोडून अभ्यास करण्याऱ्या अनेक अधिकाऱ्यांची उदाहरणं आपल्याकडे आहेत. यामध्ये आयएएस अंकिता जैन यांचाही समावेश होतो. अंकिता जैन यांनी आपली यूपीएससीची मार्कशीट इन्स्टाग्रामवर शेअर केली आहे. त्यामुळे त्या जास्त चर्चेत आल्या आहेत. कम्प्युटर सायन्समध्ये बीटेकची पदवी मिळवलेल्या अंकिता यांनी लाखो रुपये पगाराच्या नोकरीवर पाणी सोडून यूपीएससीचा अभ्यास सुरू केला होता. अंकिता यांनी यूपीएससी परीक्षेची तयारी 2017मध्ये सुरू केली होती. पहिल्याच प्रयत्नात त्यांना यश मिळालं नाही. दुसऱ्या प्रयत्नात त्यांना 270 वी रँक मिळाली. त्यामुळं आयएएससाठी त्यांची निवड होऊ शकली नाही आणि त्यांनी इंडियन अकाउंट सर्व्हिस जॉइन केली. तिथे असतानाही त्यांनी अभ्यास सुरूच ठेवला; मात्र तिसऱ्या प्रयत्नातही अंकिता यांना यश मिळालं नाही. 2020मध्ये अंकिता यांनी आपली बहीण वैशालीसह परीक्षेची तयारी केली आणि यश मिळवलं. चौथ्या प्रयत्नात अंकिता यांनी देशभरातून तिसरी रँक मिळवून आयएएस होण्याचं स्वप्न पूर्ण केलं. त्या वर्षी वैशाली यांना 21वी रँक मिळाली होती. दोघी बहिणींनी एकत्र नोट्समधून अभ्यास केला होता. हेही वाचा - देशातल्या प्रत्येक मुलीला केंद्र सरकार देतंय दीड लाख रुपये; काय आहे सत्य? लहानपणापासून अभ्यासात हुशार असलेल्या अंकिता यांनी इयत्ता 12वी नंतर दिल्ली टेक्नॉलॉजिकल युनिव्हर्सिटीमध्ये प्रवेश घेतला. तिथे अंकिता यांनी कम्प्युटर सायन्समध्ये बीटेक ही पदवी मिळवली. त्यानंतर 2016 मध्ये त्यांनी गेट (GATE) परीक्षा दिली व देशात पहिली रँक मिळवली. शिक्षण पूर्ण झाल्यानंतर त्यांना खासगी कंपनीत लाखो रुपये पॅकेज असलेली नोकरी मिळाली; मात्र यूपीएससी परीक्षेसाठी अंकिता यांनी ती नोकरी सोडली. कोणत्याही स्पर्धा परीक्षेच्या तयारीसाठी पोषक वातावरण असेल तर अभ्यास करणं सोपं जातं, असं म्हटलं जातं. अंकिता जैन यांच्या बाबतीत ही गोष्ट खरी ठरली. दिल्लीच्या रहिवासी असलेल्या अंकिता जैन यांना त्यांचे पती आयपीएस अभिनव त्यागी यांनी सहकार्य केलं. सध्या 28 वर्षांच्या असलेल्या अंकिता यांनी आयपीएस अभिनव त्यागी यांच्याशी लग्न केलेलं आहे. दिल्ली टेक्नॉलॉजिकल युनिव्हर्सिटीमध्ये शिकत असताना दोघांची भेट झाली होती. अभिनव 2019मध्ये यूपीएससी परीक्षा उत्तीर्ण झाले. अभिनव यांनी अंकिताला अभ्यासामध्ये फार मदत केली. त्यांनी आपल्या पत्नीसाठी नोट्स तयार केल्या होत्या. अंकिता जैन यांचे पती आयपीएस अभिनव त्यागी सध्या महाराष्ट्र केडरमध्ये कार्यरत आहेत.
अंकिता जैन म्हणजे आग्र्यातले प्रसिद्ध भूलतज्ज्ञ (Anesthesiologist) डॉ. राकेश त्यागी आणि डॉ. सविता त्यागी यांची सून.