नवी दिल्ली 7 जून: कोरोनाचं संकट आलेलं असताना निवडणूक प्रचार कसा होणार अशी चर्चा देशात सुरू आहे. ही चर्चा सुरू असतानाच केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी पहिल्यांदाच व्हर्च्युअल रॅली करत बिहारमधल्या जनतेला संबोधित केलं. बिहारमध्ये पुढच्या वर्षी विधानसभेच्या निवडणुका आहेत. त्या पार्श्वभूमीवर त्यांनी ही रॅली करत काँग्रेसवर जोरदार प्रहार केले आणि मुख्यमंत्री नितीश कुमार यांचं तोंड भरून कौतुक केलं. काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांच्यावरही अमित शहांनी जोरदार टीका केली. ते सध्या फक्त मुलाखती घेत असून दुसरं कामच त्यांना राहिलेलं नाही अशी टीकाही त्यांनी केली.
काँग्रेसवर हल्लाबोल करताना ते म्हणाले, काँग्रेस फक्त आरोपांचं राजकारण करत आहे. मजुर घराकडे परतत असताना तुम्ही काय केलं? तेव्हा तुम्ही कुठे होता? केंद्र सरकारने रेल्वेने लाखो मजुरांना आपल्या इच्छित स्थळी पोहोचवलं. त्यांच्या निवाऱ्याची आणि अन्नाची व्यवस्था केली.
कोरोनाच्या लढाईत आज सर्व देश पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या मागे असल्याचंही त्यांनी सांगितलं. नितिश कुमार यांच्या नेतृत्वाखाली बिहारने मोठा विकास केल्याचंही त्यांनी सांगितलं.