श्रीनगर, 6 मे : काश्मीर खोऱ्यात सुरक्षा दलांना एक मोठं यश मिळालं आहे. कुख्यात दहशतवादी आणि हिज्बुल मुजाहिदीनचा प्रमुख कमांडर रियाझ नायकू (Riyaz Naikoo) याचा सुरक्षा दलांशी झालेल्या चकमकीत अखेर खात्मा झाला. रियाझ नायकू हा गेले अनेक दिवस काश्मीर खोऱ्यात दहशत पसरवत होता. त्याच्यावर 12 लाखाचं इनाम जाहीर करण्यात आलं होतं. पोलीस आणि सुरक्षा दलाला लक्ष्य करत त्याने काश्मीरमध्ये अनेक कारवाया केल्या होत्या. दक्षिण काश्मीरमध्ये सुरक्षा दलाशी झालेल्या चकमकीत रियाझ मारला गेला. दहशवाद्यांना रियाझच्या खात्म्यामुळे धक्का बसण्याची शक्यता आहे.
Jammu and Kashmir: Hizbul Commander Riyaz Naikoo has been eliminated by security forces in an encounter. pic.twitter.com/ewPE5ux7Ae
रियाझ नायकू हा 2010 पूर्वी गणिताचा शिक्षक म्हणून काम करत असे. मूलतत्त्ववादी चळवळीकडे तो ओढला गेला. काश्मीर खोऱ्यात अशांतता पसरवण्यासाठी हिज्बुल मुजाहिदीनने रियाझला हालाशी धरलं आणि तो या संघटनेत मोठा होत गेला. मुलांना गणित शिकवणारा एक शिक्षक हातात शस्त्रास्त्र घेऊन सुरक्षा दलांना लक्ष्य करू लागला.
2016 मध्ये बुरहान वाणीच्या अंतानंतर रियाझ नायाकूचं नाव पुढे आलं होतं. तो काश्मीर खोऱ्याच्या दहशतवादाचा नवा चेहरा बनला होता. पोलिसांच्या कुटुंबीयांचं अपहरण, कुणी दहशतवादी मारला गेल्यानंतर त्याच्या अंत्ययात्रेच्या वेळी बंदुकीची सलामी देणं अशा कारवायांनी तो चर्चेत होता. काश्मीरमध्या युवा पिढीला दहशतवादाकडे खेचून घेण्याचं काम तो करत होता.
सुरक्षा दलांनी या दहशतवादाला नेमकं हेरून त्याला संपवलं.
गुप्तचर संस्थांच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, आज सकाळी 9 वाजता या क्रूर दहशतवाद्याचा खात्मा झाला. त्यानंतर हा रियाझ नायकूच आहे याची ओळख पटवण्यासाठी पुढचे साडेपाच तास खर्ची पडले. रियाझला संपवण्यासाठी सुरक्षा दलांनी विशेष पिनपॉइंटेड ऑपरेशन केलं होतं. काल रात्रीपासून ही कारवाई सुरू होती. पुलवामाजवळच ही कारवाई झाली.