नवी दिल्ली, 3 नोव्हेंबर : गेल्या काही दशकांपासून 'ग्लोबल वॉर्मिंग'च्या समस्येमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. आता हळूहळू त्याचे परिणाम दिसू लागले आहेत. ऋतुचक्रातील अनियमितता हा ग्लोबल वॉर्मिंगचाच एक भाग आहे. ग्लोबल वॉर्मिंगच्या समस्येवर उपाय म्हणून कार्बनचं कमी उत्सर्जन आणि मोठ्या प्रमाणात वृक्ष लागवड हे दोन महत्त्वाचे पर्याय आहेत. तेलंगणातील एका व्यक्तीनं यातील दुसरा पर्याय स्वीकारला आहे.
ग्लोबल वॉर्मिंग म्हणजे काय? हे जगाला माहिती होण्यापूर्वीच या व्यक्तीनं वृक्षांचं महत्त्व जाणलं होतं. तेलंगणातील निजामाबाद जिल्ह्यात राहत असलेल्या रावुतला जनार्दन यांना सर्व जण 'ग्रीन मॅन' या नावानं ओळखतात. कारण, जनार्दन यांनी आपलं जीवन पर्यावरणाच्या रक्षणासाठी समर्पित केलं आहे. सध्या ते सर्व स्तरांतील लोकांसाठी एक प्रेरणास्थान बनले आहेत.
मूळचे सिरीकोंडा येथील रावुतला जनार्दन गेल्या दोन दशकांपासून निजामाबादमधील पद्माराव नगरमध्ये वास्तव्याला आहेत. पूसाला गल्ली येथे ते प्रिटिंग प्रेस चालवतात. 1990-91मध्ये, इयत्ता दहावीत असताना जनार्दन वर्तमानपत्र वाचायचं. देशातील बेरोजगारी आणि उपासमार यापेक्षा पर्यावरणाचं प्रदूषण ही फार मोठी समस्या आहे. पर्यावरण प्रदूषण केवळ भारतापुरतं मर्यादित नाही, तर संपूर्ण मानवजातीला ही गोष्ट प्रभावित करते, याची जाणीव त्यांना वर्तमानपत्र वाचून झाली. त्यानंतर त्यांनी पर्यावरण रक्षणाचा वसा घेतला.
आपल्या आसपास झाडांची संख्या वाढावी यासाठी त्यांनी वृक्ष लागवड सुरू केली. आपल्या या 'ग्रीन मिशन'ला अधिक बळ मिळावं यासाठी जनार्दन यांनी 'सिरिवेनेला ग्रीन सोसायटी' नावाची एनजीओ सुरू केली. वृक्षारोपण करून पर्यावरणाचं संरक्षण करता येऊ शकत याबाबत लोकांमध्ये जागरूकता निर्माण व्हावी यासाठी त्यांनी प्रयत्न केले.
वृक्षारोपणाचा संदेश लोकांपर्यंत अधिक प्रभावीपणे पोहचावा यासाठी, जनार्दन यांनी कपडे, दुचाकी, टोपी, पेन, वह्या अशा सर्व वस्तू हिरव्या रंगाच्याच वापरण्यास सुरुवात केली. त्यांच्या उदात्त कार्याची जाणीव असलेले स्थानिक लोक त्यांना 'ग्रीन' जनार्दन म्हणतात.
न्यूज 18 ला दिलेल्या मुलाखतीत जनार्दन यांनी सांगितलं की, त्यांनी गेल्या 15 वर्षांत जिल्ह्यात सुमारे दोन लाख वृक्षांची रोपं लावली आहेत. लागवड केलेल्या वृक्षांची देखभाल करण्याची जबाबदारी स्थानिक लोकांवर सोपवली आहे. स्थानिक लोकांनीही त्यांना या कामात सहकार्य केलं. राज्यभरातील वृक्षांची संख्या वाढावी यासाठी त्यांनी राज्य सरकारच्या प्रतिष्ठित ‘हरिता हराम’ कार्यक्रमातही भाग घेतला.
ते पुढे म्हणाले की, मातीपासून बनवलेल्या इको-फ्रेंडली गणेशमूर्तींची चळवळ त्यांनीच सुरू केली आहे. 2010 मध्ये त्यांनी स्वत: मूर्ती तयार केल्या आणि त्या लोकांना वाटल्या होत्या. वृक्षांचं महत्त्व आणि पर्यावरण रक्षणाबाबत त्यांनी अनेक पुस्तकं लिहून प्रकाशित केली आहेत. याशिवाय, जनार्दन यांनी आतापर्यंत 900 पुस्तकं वितरितही केली आहेत.
"आपल्या कुटुंबाच्या गरजांसाठी पुरेसा पैसा मिळवून आपलं उर्वरित जीवन पर्यावरण रक्षणासाठी समर्पित करणं हीच आपली महत्त्वाकांक्षा होती", असं जनार्दन म्हणतात.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.