मुंबई, 03 नोव्हेंबर: मलेरिया हा एक गंभीर स्वरूपाचा संसर्गजन्य आजार आहे. मलेरियाची लागण डासांमुळे होते. आफ्रिकेत हा आजार होण्याचं प्रमाण लक्षणीय आहे. आग्नेय आशियातल्या मलेरियाच्या एकूण केसेसमध्ये भारताचा वाटा 77 टक्के आहे. मलेरियाचा संसर्ग रोखण्यासाठी जागतिक पातळीवर संशोधन सुरू आहे. मलेरियाच्या अनुषंगाने आफ्रिकेत एक संशोधन करण्यात आलं. या संशोधनातून काही ठोस निष्कर्ष समोर आले आहेत. आफ्रिकेत एका औषधाच्या ट्रायल घेण्यात आल्या. हे औषध एकदा घेतल्यानंतर किमान सहा महिन्यांपर्यंत मलेरियापासून बचाव होतो, असं संशोधकांना दिसून आलं आहे. कमी कालावधीसाठी या अँटीबॉडीज अर्थात प्रतिपिंडं प्रभावी मानली जात आहेत.
जागतिक आरोग्य संघटनेने दिलेल्या माहितीनुसार, 2020 मध्ये जगभरात मलेरियाच्या 24 कोटी केसेस आढळल्या. या कालावधीत फक्त आफ्रिकी देशांमध्ये मलेरियामुळे 6.27 लाख जणांचा मृत्यू झाला आहे. आफ्रिकी देशांमध्ये मलेरियाचा प्रादुर्भाव चिंतेचा विषय ठरत असताना मलेरियापासून बचावासंदर्भात आफ्रिकेच्या संशोधकांना एक मोठं यश मिळालं आहे. आफ्रिकेत एका औषधाच्या ट्रायल घेण्यात आल्या. हे औषध एकदा घेतल्यानंतर सहा महिन्यांपर्यंत मलेरियापासून बचाव होऊ शकतो. नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ हेल्थ क्लिनिकल ट्रायलच्या संशोधनात दिसून आलं, की या अँटीबॉडी औषधाचा एक डोस घेतल्यास सहा महिन्यांपर्यंत मलेरिया होत नाही. हे अँटीबॉडी औषध 24 आठवड्यांच्या कालावधीत मलेरियापासून बचावाकरिता 88.2 टक्के प्रभावी आहे.
हेही वाचा - #HumanStory: मूल होत नसणाऱ्या मित्रासाठी दिले Sperm, ताटातूट होती वेदनादायक
मालीमधल्या बामको इथल्या युनिव्हर्सिटीज ऑफ सायन्सेस, टेक्निक्स अँड टेक्नोलॉजी युनिव्हर्सिटीचे शिक्षक डॉ. कसूम कायेंताओ यांच्या नेतृत्वाखाली मलेरियासंदर्भात संशोधन करण्यात आलं. त्यात आफ्रिकेतल्या कालिफाबोगू आणि टोरोडो गावांमध्ये ट्रायल घेतल्या गेल्या. `हे अँटीबॉडी सर्वच व्यक्तींसाठी सुरक्षित नाही,` असं डॉ. कायेंताओ यांनी सांगितलं. ते म्हणाले, 'ट्रायलमध्ये एका थेंबाच्या माध्यमातून हे अँटीबॉडी औषध देण्यात आलं. औषध देण्याची ही पद्धत काहीशी कठीण आहे. कारण या पद्धतीनं मोठ्या लोकसंख्येला औषध देणं केवळ अशक्य आहे; पण या औषधाचे निष्कर्ष उत्साह वाढवणारे आहेत. त्यामुळे या औषधाची चाचणी प्रौढांसोबतच मुलांवरदेखील केली जात आहे'.
हे अँटीबॉडी औषध एका वेगळ्या पद्धतीनं काम करतं. मलेरिया पसरवणाऱ्या डासांपासून मानवी शरीरात पोहोचणाऱ्या परजीवींचं चक्र याद्वारे खंडित होतं. या अँटीबॉडीज डासांच्या चाव्याद्वारे मानवाच्या लिव्हरपर्यंत पोहोचणाऱ्या अविकसित परजीवींना लक्ष्य करतात. त्यामुळे या औषधाने अनेक महिने मलेरिया टाळता येऊ शकतो, असं या संशोधनातल्या निष्कर्षावरून दिसतं. मलेरिया टाळण्यासाठी ज्याप्रमाणे इतर उपायांचा वापर केला जातो, त्याच पद्धतीने हे औषध वापरण्याचा विचार असल्याचं अहवालात म्हटलं आहे.
या संशोधनात सहभागी 330 प्रौढांपैकी काही जणांना अँटीबॉडीजचा वेगवेगळा डोस देण्यात आला. 24 आठवड्यांपर्यंत दर दोन आठवड्यांनी या प्रौढांची तपासणी करण्यात आली. यात जे आजारी पडले त्यांच्यावर उपचार करण्यात आले. हे संशोधन द न्यू इंग्लंड जर्नलमध्ये प्रकाशित करण्यात आलं आणि सिअॅटलमधल्या अमेरिकन सोसायटी ऑफ ट्रॉपिकल मेडिसीन अँड हायजीन 2022 च्या वार्षिक बैठकीत सादर करण्यात आलं.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Who