अहमदाबाद 08 डिसेंबर : गुजरात विधानसभा निवडणुकीच्या मतमोजणीला सकाळी आठ वाजल्यापासून सुरुवात होणार आहे. 182 जागांवर झालेल्या मतदानाची आज मतमोजणी आहे. 37 मतदान केंद्रांवर मतमोजणी होणार आहे. सत्ताधारी भाजपसह काँग्रेस आणि आपची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. काँग्रेसचं पूर्ण लक्ष 'भारत जोडो यात्रे'वर असलं तरी गुजरात आणि हिमाचल प्रदेशमधील विधानसभा निवडणुकीच्या मतमोजणीत चांगला निकाल मिळण्याची काँग्रेसला आशा आहे. देशातील सर्वात जुना पक्ष आपला कमी होत चाललेला जनआधार टिकवण्यासाठी सतत धडपडत आहे. अशात काँग्रेसने मतमोजणीपूर्वीच आपल्या आमदारांबाबतही मोठा निर्णय घेतला आहे.
निवडणुकीच्या निकाल लागताच घोडेबाजार टाळण्यासाठी काँग्रेस आमदारांना तात्काळ राजस्थानमध्ये हलवणार आहे. सत्ता स्थापनेच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस एक पाऊल पुढे टाकत असल्याचं दिसत आहे. काँग्रेसला हिमाचल प्रदेशात विजय मिळाला आणि गुजरातमध्ये आम आदमी पक्ष असूनही काँग्रेस प्रमुख विरोधी पक्ष राहिला, तर ही त्यांच्यासाठी अत्यंत सुखद बाब असेल.
हिमाचल प्रदेशात सत्तेत न आल्यास आणि गुजरातमधील प्रमुख विरोधी पक्षाचे स्थान गमावल्यास काँग्रेसचे संकट अधिक गडद होऊ शकते. दिल्ली महापालिका निवडणुकीत काँग्रेसला बुधवारी केवळ नऊ जागा मिळाल्याने मोठा धक्का बसला. आम आदमी पक्षाला 134 आणि भारतीय जनता पक्षाला 104 जागा मिळाल्या.
सोमवारी अनेक वृत्तवाहिन्यांनी दाखविलेल्या एक्झिट पोलने गुजरातमध्ये भाजपला मोठा विजय मिळण्याची शक्यता वर्तवली आहे, तर हिमाचलमधील निकाल भाजप किंवा काँग्रेसच्या बाजूने जाऊ शकतात. हिमाचल प्रदेशात काँग्रेसचा विजय झाला तर ती त्यांच्यासाठी संजीवनी ठरेल, कारण प्रदीर्घ काळानंतर त्यांना स्वत:च्या जोरावर राज्याची सत्ता मिळणार आहे.
सध्या राजस्थान आणि छत्तीसगडमध्ये त्यांची सरकारे आहेत. काँग्रेसचे माजी प्रवक्ते संजय झा म्हणतात की, हिमाचल प्रदेशातील विजय काँग्रेससाठी उत्साहवर्धक असेल. ते म्हणाले की हिमाचलमधील विजय काँग्रेसला 2023 आणि 2024 साठी आशा देईल, परंतु 'भारत जोडो यात्रे'नंतर पक्षाला याचा फायदा होतो की नाही यावर बरेच काही अवलंबून आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Gujarat, Rahul gandhi