रजत भट्ट, प्रतिनिधी गोरखपूर, 21 जुलै : उत्तर प्रदेशच्या गोरखपूर जिल्ह्यातून एक अत्यंत संतापजनक घटना समोर आली आहे. एका व्यक्तीने 5 कुत्र्यांना विष देऊन ठार मारलं. त्याच्या या अमानुष कृत्याने परिसरात सर्वत्र संतापाची लाट उसळली आहे. परंतु तो मात्र फरार आहे. मिळालेल्या माहितीनुसार, गंगाराम असं या नराधमाचं नाव आहे. गोरखपूरच्या प्लाझा हॉटेलसमोर असलेल्या कॉम्प्लेक्समध्ये तो मोबाईलचं दुकान चालवतो. या कॉम्प्लेक्समध्ये 5 ते 6 कुत्र्यांची ये-जा असायची. तेथील इतर दुकानदार त्यांचे लाड करायचे, त्यांनी अन्नपाणी द्यायचे. परंतु गंगाराम मात्र कायमच त्यांचा द्वेष करायचा. त्याने कुत्र्यांना विष दिल्याचं सीसीटीव्हीमध्ये कैद झालं आहे.
गंगारामने काही दिवसांपूर्वीच कुत्र्यांवर रॉकेल ओतलं होतं. त्यामुळे त्यांना प्रचंड त्रास झाला होता, मात्र ते परिसरातून पळून गेले नाहीत. उलट गंगारामविरोधात इतर दुकानदार एकत्र आले आणि कुत्र्यांना त्रास देण्यावरून त्याच्याशी भांडू लागले. याच रागातून त्याने टोकाचं पाऊल उचललं. अंध आई-वडिलांना खांद्यावर घेऊन लेक निघाले देवदर्शनाला, सूनबाईसुद्धा आहेत सोबत! सोमवारी गंगारामने 5 कुत्र्यांना विष दिलं. पोटात विष गेल्याने एकामागून एक कुत्रे जमिनीवर कोसळले. या घटनेनंतर गंगारामने दुकान उघडलेलं नाही. कॉम्प्लेक्स परिसरातही तो कुठे दिसत नाही. तो फरार झाला आहे. इतर दुकानदारांनी याविरोधात आक्रोश व्यक्त केला. जोपर्यंत गंगारामवर कारवाई होणार नाही, तोपर्यंत कुत्र्यांवर अंत्यसंस्कार करणार नाही, असा पवित्रा त्यांनी घेतला आहे. कुत्र्यांचे मृतदेह घेऊन जाण्यासाठी महानगरपालिकेचे कर्मचारी आले होते. मात्र दुकानदारांनी त्यांना मृतदेह दिले नाहीत, तर कॉम्प्लेक्समध्येच बर्फाच्या लाद्यांवर ठेवले आहेत. दरम्यान, याप्रकरणी पोलिसांत तक्रार दाखल करण्यात आली असून सखोल तपासानंतर गुन्हेगाराला शिक्षा केली जाईल, असं पोलिसांनी सांगितलं आहे.